मेहनतीचे फळ ( Value of Hardwork )

        लघुकथा - मेहनतीचे फळ

दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने सुरेश गावी जाण्यास निघाला होता. सकाळीच पुण्यावरून आलेल्या बसने तो उतरला आणि गावाकडून येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत बसस्थानकावर थांबला होता. त्याच बस स्थानकावर थोड्या अंतरावर एक व्यक्ती आपल्या सामानसह उभा असलेला सुरेशने पाहिलं आणि ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. म्हणून तो जास्तच निरखून पाहू लागला. थोड्या वेळाने त्या व्यक्तीची नजर देखील सुरेशवर पडली आणि दोघांची नजरानजर झाली. क्षणाचा विलंब न लावता सुरेशने " मनोज, ए मनोज, तू मनोज आहेस ना ! " असे म्हणाला. त्यावर पुढील व्यक्ती देखील, " होय मी मनोज आहे, तू सुरेश ना ! " सुरेश ने देखील प्रत्युत्तरमध्ये होय म्हटलं. त्यांच्या गप्पा झाल्या. ते दोघे एकाच शाळेत शिकलेले, एकाच वर्गातले एकत्र शाळेला ये-जा करणारे आणि एकत्र डबा खाणारे, जिवलग मित्र. त्यामुळे एकमेकांना ओळखण्यात जास्त वेळ गेला नाही. सुरेशने विचारलं, " मनोज सध्या कुठं आहेस ? काय करतोस ?" यावर मनोज म्हणाला, " मी सी आर पी एफ मध्ये आहे आणि तू काय करतोस ? " यावर सुरेश म्हणाला, " मी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, पुण्यात असतो." दोघेही एकमेकांना हस्तांदोलन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आपापल्या गावाकडे जाण्यास निघाले. 
मनोज आणि सुरेश त्या शाळेतील दोन्ही रत्ने होती. सुरेश अभ्यासात हुशार होता तर मनोज मैदानावर चॅम्पियन होता. दोघेही त्या शाळेत माध्यमिकमध्ये असतांना आले होते. सुरेश मध्यमवर्गीय घरातून होता. सुरेशचे गाव शाळेपासून दहा किमी दूर होते तर मनोजचे गाव पाच किमी दूर होते. सुरेश आपल्या सायकलने शाळेत येत होता तर मनोज पायी येत होता. मनोजची घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्याच्या घरात आई बाबा आणि एक छोटी बहीण होती. राहायला झोपडी सारखे घर होते, त्याला शेती नव्हती, त्याचे आई-बाबा इतरांच्या शेतात मजुरी करून आपले घर चालवित होते. मनोजचे गाव झाल्यानंतर सुरेशचे गाव होते. शाळेला येतांना रोजच त्यांची रस्त्यावर गाठभेट होत असे. त्यामुळे शाळा सुटल्यावर घरी जातांना मनोज आणि सुरेश एका सायकलवर शाळेत येत असत. शाळेत येतांना मात्र त्यांची गाठभेट होत नसत, कारण मनोजला घरातून निघण्यास उशीर व्हायचा. आई-बाबा शेतात काम करायला जात असल्याने मनोज घरातील सर्व कामे करायचा, तोपर्यंत त्याला उशीर व्हायचा. तो रोज सकाळी घर ते शाळा धावत-पळत यायचा. रोज पाच किमी अंतर तो दहा मिनिटात पळत पळत यायचा. शाळेत येईपर्यंत तो घामाघूम व्हायचा. कधी कधी राष्ट्रगीत संपून गेल्यावर यायचा त्यामुळे पी टी च्या सरांकडून मार देखील खायचा. पण त्याला काही वाटायचं नाही. दुपारच्या वेळी ते दोघे एकत्र डबा खायचे. मनोजचा डबा म्हणजे एका चिंधीत तो भाकर आणि त्यावर लाल भडक चटणी आणायचा. त्याच्या जेवण्यात भाजी नसायची. तर सुरेश आपल्या डब्यात पोळी-भाजी आणायचा. दोघेही एकमेकाना डबा शेअर करायचे. सुरुवातीला आपला डबा शेअर करण्यास मनोज थोडा शरमला होता कारण त्याच्या डब्यात चटणी-भाकर होती. पण सुरेशला त्याची तीच चटणी-भाकर गोड लागायची. कधी कधी तर सुरेश पूर्ण डबा अदलाबदल करायचा.  
मनोज अभ्यासात जेमतेम होता. मैदानावर मात्र तो प्रत्येक खेळात सहभागी व्हायचा आणि वर्गाला जिंकून द्यायचा. रनिंगमध्ये तर कोणालाही जिंकू द्यायचा नाही. सर्वप्रकारच्या रनिंगमध्ये त्याचे नाव प्रथम क्रमांकाचे ठरलेले होते. त्याची मैदानावरील प्रगती पाहून सरांनी त्याचे नाव एन. सी. सी. मध्ये घेतलं. एनसीसीमुळे त्याला अजून एक त्रास होऊ लागला. एनसीसीसाठी शाळेत सकाळी येऊन तो परत घरी जायचा आणि पुन्हा परत शाळेत यायचा. त्यामुळे पूर्वी जो पाच किमी धावत पळत यायचा तो आता पंधरा किमी झाला होता. यामुळे त्याची धावण्याची गती देखील वाढली होती. तो पायाला भिंगरी लावल्यासारखे पळायचा. रनिंगच्या स्पर्धेत त्याने जिल्हास्तरीय पहिलं बक्षीस ही मिळविला होता. कबड्डी, क्रिकेट आणि खोखो यासारख्या सांघिक खेळात ही त्याने शाळेचे नाव उज्ज्वल केले होते. सुरेशला मनोजचा खूप अभिमान होता की तो त्याचा मित्र आहे. सुरेश अभ्यासात शाळेचे नाव उज्ज्वल करत होता. शालांत परीक्षेत सुरेश ने मेरिट मिळविला तर मनोज कसाबसा पास झाला होता. 
दहावीनंतर आज दहा वर्षांनी त्यांची भेट झाली होती. सुरेश पुढील शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी गेला होता. विज्ञान शाखेतून त्याने चांगले मार्क मिळवित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि मनोज इथल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मनोजने कॉलेजमध्ये देखील मैदान गाजविला होता. विभाग स्तरावर त्याला बक्षीस मिळाले होते. त्याची गरिबी त्याला बक्षीस मिळवून देत होती. त्याला मिळालेल्या बक्षीस आणि प्रमाणपत्राच्या आधारावर त्याची सीआरपीएफ मध्ये निवड झाली. त्याने कधीही आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केलं नाही आणि धावण्यावर जास्त लक्ष दिलं म्हणून तो यशस्वी झाला. मनोजला यशस्वी झालेलं पाहून सुरेशला ही अत्यानंद झाला होता. त्याला त्यावेळी त्यांच्या शिक्षकाने बोललेले एक वाक्य आठवलं, ' आपणाला जी गोष्ट छान जमते, त्या गोष्टीत जीव ओतून मेहनत करावी, केलेल्या मेहनतीचे फळ नक्की मिळते.'

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
दिनांक 16 नोव्हेंबर 2023 
वेळ 12:10 pm

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान