व्यर्थ न हो बलिदान
व्यर्थ न हो बलिदान
सकाळी सकाळी रेडिओ ऑन केल्या बरोबर ती बातमी कानावर पडली आणि सविताच्या काळजाचे ठोके वाढले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय सैनिक मारल्या गेल्याची ती बातमी होती. सविताने लगेच फोन हातात घेतला आणि एक नंबर डायल करायला लागली. आपने डायल किया हुआ नंबर अबी बंद है, थोडी देर बाद प्रयास करे वारंवार हेच वाक्य तिच्या कानी पडत होता. जशी जशी वेळ जात होता तशी तशी तिची बैचेनी वाढतच जात होती. परम तिचा मुलगा नुकतेच जागी झाला होता. अंथरुणातूच त्याने " आई ए आई " असा आवाज दिला पण तिला काही ऐकू येत नव्हते. तो उठून आईजवळ आला आणि तिचा पदर धरून ओढू लागला त्यावेळी ती भानावर आली. लगेच तिने परमला तोंड धुण्यास सांगून सासू-सासऱ्याकडे वळली. सासू सासरे अंगणात बाजावर शून्य नजरेच्या दृष्टीत आकाशाकडे पाहत बसले होते. तिने दोघांना त्या बातमी विषयी सांगितले तरी ते दोघे गप्पच बसले होते. तिला काही कळत नव्हते. ती म्हणाली, मी ह्यांना फोन लावत आहे मात्र फोन लागतच नाही, बंद आहे असे म्हणत आहे. काय भानगड आहे, मला तर काही सुचत नाही म्हणून ती घरातल्या खांबाला धरून तिथेच बसली. त्यावेळी आपलं मन घट्ट करून सासरा तिला म्हणाला, " विजया ला आता फोन लागणार नाही. त्या पुलवामा हल्ल्यात आपला विजय देखील गेला " हे कानावर पडताच सविताच्या पायाखालून जमीन सरकून गेल्या सारखं झालं. क्षणभर तिला काही सुचले नाही आणि ती बेहोश झाली. लगेच विजय चे आई-बाबा तिच्याजवळ गेले तोंडावर थोडंस पाणी मारल्यावर ती शुद्धीवर आली आणि हुंदके देऊन रडू लागली. आई का रडत आहे हे त्या परम ला काही कळत नव्हते. तो तिच्या जवळ जाऊन ए आई रडू नको ना, बाबांना खूप वाईट वाटते तू रडलीस तर" असे तो म्हणू लागला. बिचारा तो तीन वर्षांचा परम त्याला काय माहीत त्याचे बाबा आता या जगात नाहीत ते. आदल्या दिवशी रात्रीच विजय आणि सविता यांचे फोनवर बोलणे झाले होते. उद्या सकाळी आमची टीम जम्मू काश्मीर ला जात आहे त्यामुळे निदान एक आठवडाभर तरी आपले बोलणे होणार नाही. तेंव्हा आई-बाबा आणि परमची काळजी घे असे म्हणून त्यांचे फोनवरील बोलणे बंद झाली. सविता खूप आनंदात झोपी गेली. रात्री थोडी उशिरा झोपल्यामुले सकाळी जाग यायला वेळ लागली. ती उठण्याच्या अगोदर जम्मू काश्मीरहुन फोन आला होता की, दहशतवादी हल्ल्यात विजय ला वीरमरण आले आहे म्हणून. ही बातमी सविता ला कसे सांगावे म्हणून विजयचे आई -बाबा काळजीत होते. मात्र त्यापूर्वीच सविताने त्या हल्ल्याची बातमी ऐकली. बातमीने संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. प्रत्येकजण विजयच्या घरी येऊन त्यांची सांत्वन करू लागले. थोड्या वेळाने देशपांडे गुरुजी आले, ज्यांच्यामुळे तो भारतीय सैन्यात दाखल झाला होता. गुरूजीला पाहताचा विजयच्या आई बाबांना शोक अनावर झाला. गुरुजींनी त्यांना खूप धीर दिलं. त्यांच्या सोबत इकडच्या तिकडच्या विषयावर गप्पा मारल्या, सर्वत्र स्मशान शांतता होती. गुरुजीला ते शाळेतले दिवस आठवले. सातवी पर्यंत आपल्या घराजवळच्या शाळेतील शिक्षण संपवून विजय गावातीलच दूरच्या जय जवान विद्यालयात शिकण्यासाठी पहिल्या दिवशी आपल्या बाबासोबत गेला होता. शाळेत पहिली भेट देशपांडे सरासोबत झाली. बाबांनी आपला मुलगा विजयची सर्व कहाणी सांगितली, हा अभ्यासात हुशार नाही मात्र खेळण्यात नंबर एक आहे. सर याला थोडी अभ्यासाची गोडी लावा. कसे ही करून दहावीत चांगले मार्क मिळेल असे करा." यावर देशपांडे सरानी बाबाचे हातात हात घेऊन विश्वास दिला की, आपली इच्छा नक्की पूर्ण होईल.
जय जवान विद्यालयात हजारो मुलं शिक्षण घेत होती. पूर्वीच्या शाळेत जेमतेम दोनशे मुलं होती, एका वर्गात 15-20 मुलं आणि इथे मात्र एका वर्गात 50 च्या वर मुलं होती. तरी ही कुठे ही गडबड नाही गोंधळ नाही. सर्व काही शिस्तीत चालत होतं. जे काम सांगितलं गेलं ते काम वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक होते नाहीतर मुख्याध्यापक देशपांडे सर यांच्याकडे जावं लागायचं. सर तसे खूप कडक पण तेवढेच मायाळू होते. शाळेचे नियम समजावून घ्यायला काही दिवस लोटले. एके दिवशी वर्गात सूचना आली की, ज्यांना NCC मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी उद्या सकाळी सात वाजता मैदानावर हजर राहावे. विजयला NCC बाबत उत्सुकता वाटली म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सात वाजता मैदानावर हजर राहिला. पोलिसांच्या ड्रेसमध्ये एक व्यक्ती मुले।ज्याठिकाणी थांबले होते तिकडे येत होते. ते जसे जसे जवळ येऊ लागले तसे चेहरा स्पष्ट दिसू लागला. जवळ आल्यावर विजय आश्चर्यकारक रीतीने त्या व्यक्तीला पाहू लागला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून देशपांडे सर होते. लगेच सर्वांनी रांगेत उभे राहिले. सावधान विश्राम चे आदेश देऊन सरांनी सर्वाना खाली बसायला सांगितले. NCC काय आहे आणि याचे जीवनात काय महत्व आहे हे सर्व समजावून सांगितले. विजयला खूपच आवडले. लगेच त्याने NCC साठी आपले नाव पक्के केले. रोज सकाळी शाळेत NCC चा ड्रेस टाकून सात वाजता यायचे आणि परत घरी जाऊन पुन्हा शाळेचा गणवेश टाकून शाळेत यायचे असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. NCC मध्ये सहभागी झाल्यापासून त्याच्या मनात भारत देशाविषयी आणि भारतीय सैनिकांविषयी खूपच आदर निर्माण झाला होता. NCC मुळे विजय हा देशपांडे सरांचा आवडता विद्यार्थी बनला होता. कारण ही तसेच होते, त्याने एक ही दिवस गैरहजर राहिला नाही, धावण्याच्या शर्यतीत तो सर्वात पुढे असायचा, थंडीच्या दिवसात देखील तो वेळेवर हजर होता. त्याच्यामध्ये असलेली स्फूर्ती सरांनी हेरली होती. शहरातल्या टॉकीज वर बॉर्डर सिनेमा लागला होता. फक्त NCC च्या विद्यार्थ्याना घेऊन देशपांडे सर सिनेमा पाहायला गेले. सिनेमा पाहतांना सर विजयच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होते. भविष्यात हा विद्यार्थी नक्की भारतीय सैनिक दलात समाविष्ट होईल. याची त्यांना खात्री होती. मात्र सरांना एकाच गोष्टीची चिंता होती की, विजय दहावी चांगल्या गुणाने पास व्हावे. सिनेमा संपला. सर्वजण बाहेर आले आणि आपापल्या घरी गेले. विजय मात्र तेथेच घुटमळत होता. सर म्हणाले, विजय काय झालं, जायचं नाही का घरी ? " यावर विजय थोडा वेळ विचार करून म्हणाला, " सर मला सैन्यात भरती होता येईल काय ? " सरांनी लगेच त्याच्या मनातील।सर्व कालवाकालव ओळखून म्हणाले, " ही सैन्यात भरती होता येईल, त्यासाठी दहावीची परीक्षा चांगल्या गुणाने पास होणे अत्यावश्यक आहे." विजयने लगेच " त्यात काय अवघड, मी नक्की चांगल्या गुणाने पास होईन " त्यादिवशी पासून विजय खेळण्याबरोबर अभ्यासकडे ही लक्ष देण्यास सुरुवात केली. देशपांडे सर अधूनमधून त्याच्या प्रगतीकडे लक्ष देऊन होतेच. दहावीची परीक्षा संपली. देशपांडे सर परीक्षा संपल्यावर एकदा विजयच्या घरी आले. विजयच्या आई बाबांशी विजयला सैन्यात भरती होण्याविषयी चर्चा केली. बाबांनी लगेच होकार दर्शविला होता. मात्र विजयची आई सैनिकांत भरती म्हटल्याबरोबर तोंडावर पदर धरून रडत रडत घरात गेली. एकुलता एक मुलगा आहे. याला सैन्यात कसं पाठवावे ? सैन्यात गेलेले माणसं जिवंत येत नाहीत. असे नाना विचार करून ती रडू लागली. विजयने कसे बसे समजावून सांगितल्यावर त्याची आई तयार झाली. काही दिवसानी निकाल लागला. विजय प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याने बारावी देखील चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. त्यानंतर सैन्यात दाखल होण्यासाठी देशपांडे सरांना सोबत घेऊन तो निघाला. जाताना आई-बाबा यांना नमस्कार केला. आई अजूनही रडत होती. विजयचा सर्वच बाबतीत परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे तो CRPF मध्ये निवडला गेला. सहा महिन्यानंतर त्याला सुट्टी मिळाली ते ही दिवाळीच्या मोसमात. दिवाळीला तो घरी आला सोबत खूप फटाके, आई बाबाना कपडे, लहान मुलांना मिठाई आणि मित्रांना अर्थातच मिल्ट्रीची दारू घेऊन आला. त्याच्या येण्याने घरात आनंदी आनंद पसरला. त्याला पाहून आईला खूपच आनंद झाला. दिवाळी झाली. आईने विजयच्या लग्नाचा विषय काढला. बाबानी होकार दिला. विजयला मात्र आताच लग्न करायचे नव्हते. मात्र सविताचं स्थळ चालून आलं होतं, आई बाबा अगोदरच पाहिले होते, त्यांना सविता पटली होती फक्त विजयचा होकार त्यांना हवा होता. विजयने आई बाबांच्या विनंतीला मान देत सविताला पाहायला गेला. सविता ही दिसायला सुंदर आणि बारावी पास झालेली मुलगी होती. पाहताक्षणी विजयला देखील सविता आवडली. त्याने आईला होकार दर्शविला. एका महिन्याने सुट्टी संपणार होती. म्हणून एका महिन्यात लग्न करण्याचे ठरविण्यात आले. खूप घाई गडबडीत पण धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला. विजयच्या आई बाबांना आधार देण्यासाठी आता सविता होती म्हणून विजयला चिंता नव्हती. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच विजय सैन्यात जाण्यास निघाला. यापूर्वी आईचा चेहरा रडवेला होता आता त्यात सविताचा भर पडली. काळजी करू नको रोज सायंकाळी फोन करत जाईन असे म्हणून विजयने सर्वांचा निरोप घेतला. लग्न लागून पाचच दिवसानी विजय निघून गेल्याने सविताला अस्वस्थ वाटू लागले होते. तिच्या मनाची चलबिचल तिच्या सासूने ओळखेल आणि काही दिवस माहेरी जाण्यास परवानगी दिली. सासर-माहेर करत ती दिवस काढत होती. पुन्हा सहा महिन्यांनी विजय सुट्टी घेऊन गावी आला. ते पावसाळ्याचे दिवस होते. महिनाभर सुट्टी मिळाली होती. आई बाबा विजय आणि सविता सर्वजण शेतात जाऊन सरकी लावण्याचे काम केले. देशपांडे सरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसं प्रत्येक सुट्टीत गावी आल्यावर सरांची भेट घेतल्याशिवाय तो राहत नसे. सुट्टीचा एक महिन्याचा काळ कसा संपला हेच कळाले नाही. सुट्टी संपली. तसा विजय आपल्या बॅगची पॅकिंग करून सैन्यात जाण्यास निघाला. परत जातांना आई आणि सविता यांचे डोळे भरलेले होते. काळजी घ्या म्हणून तो बाहेर पडला.
एके दिवशी अचानक सविता पोट दुखू लागले म्हणून कण्ह लागली. आईने तिला दवाखान्यात नेलं तर तेथे आनंदाची बातमी मिळाली की, सविता आई होणार आहे. सर्वाना खूपच आनंद झाला. त्याच रात्री फोनवर ही आनंदाची बातमी विजयला कळाली. तो ही आनंदून गेला. शेतात पीक जसे वाढू लागले तसे सविताचा गर्भात बाळ वाढू लागले. दिवाळीच्या सुट्टीत विजय परत गावी आला. यावेळी देखील त्याने खूप फटाके, कपडे, मिठाई आणि दारू आणली होती. विजयला खास करून आनंद झाला करण तो बाप बनणार होता. सुट्टी संपवून तो परत गेला. दिवाळी संपल्याचा चार पाच महिन्यांनी सविताला गोंडस मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव परम असे ठेवले. विजयच्या घरात आनंदी वातावरण तयार झाले. परमच्या येण्याने सर्वाना करमणूक होऊ लागली. सविता, आई आणि बाबा हे दिवसरात्र त्या परम सोबत खेळण्यात घालवू लागले. पाहता पाहता आता परम तीन वर्षांचा झाला होता. त्याच्या बोबड्या बोलाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावर्षी दिवाळीला विजयला दहा दिवसाची सुट्टी मिळाली होती. यावेळी देखील येतांना त्याने खूप मिठाई, कपडे, फटाके आणि परमसाठी खेळणे आणले होते. बघता बघता दिवाळीचे दहा दिवस संपले होते. सैन्यात जाण्याचा दिवस उगवला. सर्वाना एकदाचे डोळे भरून पाहून घेतला, हवेत हाताने बाय बाय केला आणि निघाला. कधी नाही ते यावेळी परम म्हणाला, "पपा, लवकर या" त्याला नुसते मानेने हो म्हणून विजय निघून गेला. त्याला जाऊन पंधरा वीस दिवस झाले नव्हते की, त्यांची टीम जम्मू काश्मीरला जात असल्याचे रात्री त्याने सविताला फोनवर कळविले होते. तेच शेवटचे बोलणे झाले. पुलवामा हल्ल्यात विजयला देखील वीरमरण आले होते. काही वेळानंतर त्याची डेडबॉडी तिरंग्यात लपेटून शासकीय वाहनात आले. त्यावेळी एकच रडारड सुरू झाली. परमला काहीच कळत नव्हते. त्याला फक्त बाबांचा फोटो तेवढा दिसत होता. शहीद विजय अमर राहे चा नारा सर्वत्र घुमघुमत होता. तीन वर्षांचा परम आपल्या पित्याच्या सरणाला अग्नी दिला. सैनिकांनी तोफेची सलामी दिली. खूप वेळ रोखुन धरलेल्या अश्रूंना विजयच्या बाबानी मोकळी वाट करून दिली. सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा दिला. सर्वांनी अमर रहे .....! अमर रहे .....! असा नारा दिला.
- नासा. येवतीकर, धर्माबाद
9423625769
Comments
Post a Comment