कादंबरी - लक्ष्मी
कादंबरी - लक्ष्मी
प्रस्तावना -
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेला असताना इथे घरात बसून मनाची ही घालमेल चालू झाली होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले पण लॉकडाऊनचा काळ वाढू लागला तसा मनाची बेचैनी देखील वाढू लागली. दिवसभर घरात बसून काय करावं ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक पर्याय डोळ्यासमोर उभे होते. टीव्ही पाहणे, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, जुन्या संग्रहातील फोटो अल्बम पाहणे, फोनवर गप्पा मारणे आणि पुस्तकाचे वाचन-लेखन करणे. अश्या अनेक पर्यायातून पुस्तक वाचण्याचा पर्याय निवडला. जून महिन्यात लक्ष्मीबाई टिळक लिखित स्मृतिचित्रे हे साडे पाचशे पानांचे पुस्तक रोज थोडे थोडे वाचून पूर्ण केलो. या पुस्तकातील नारायण वामन टिळक यांची पत्नी लक्ष्मीबाई ही लग्नाच्या वेळी निरक्षर होती. पण नारायणराव यांनी तिला साक्षर केले, नुसते साक्षर केले नाही तर तिच्या हातून साहित्य निर्मिती करून घेतली. याच लक्ष्मीबाईचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मला एक कथा बीज सापडले. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समाजाला कथेच्या माध्यमातून सांगावं तसेच या लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून दिनांक 01 जुलै रोजी लक्ष्मी या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. आपल्या लेखन योग्य दिशेने जात आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी काही मित्रांना सोशल मिडियाद्वारे पाठवीत राहिलो. अनेक वाचकांना ही कथा पसंत येऊ लागली. काही वाचकांनी फोन करून लेखनास शुभेच्छा दिल्या. काही जणांनी ही कथा वास्तविक जीवनाशी निगडीत आहे, असे म्हटले. आमच्या जवळच्या एका शिक्षिकेने त्यांच्या जीवनात आलेल्या चढ-उताराची अनेक प्रसंग सांगून मन हलके केले. पुढचा भाग कधी येणार ? हा प्रश्न तर कित्येक वाचकांचा होता. आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनामुळे मी लक्ष्मी कादंबरी पूर्ण करू शकलो. आपले प्रेम असेच कायम लिहिणाऱ्याच्या पाठीवर असू द्यावे म्हणजे साहित्याची नवनिर्मिती होऊ शकेल. पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
जीवनात शिक्षणाचे महत्त्व सांगणारी तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी कादंबरी.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कादंबरी - लक्ष्मी
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
01. मोहनची दहावीची परीक्षा
शिरपूर नावाचं गाव आणि त्या गावात मोहन आपल्या आई सोबत राहत होता. दहावीची परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याचे वडील वारले. अगदी लहानसे घर आणि दोन एकर जमीन एवढंच काय ते त्यांनी मागे ठेवून गेले. ज्यावेळी मोहनचा जन्म झाला होता त्यावेळी त्याच्या बा ने सर्व गावाला जेवू घातलं होतं. मोहनच्या जन्माने त्याला खूप आनंद झाला होता. तो गरीब होता पण खूप कष्टाळू होता. गावातील सर्व लोकांची तो कामे करायचा. समोर येईल ते काम करून आपलं घर चालवायचा. त्याला कशाची लाज, लज्जा किंवा शरम अजिबात वाटत नव्हती. मोहनची आई देखील मोलमजुरी करायची आणि संसाराला हातभार लावायची. गावात कुणाशी त्यांचा भांडण, तंटा, वादविवाद असे काहीच नव्हते त्यामुळे सर्वचजण त्यांच्याशी प्रेमाने वागायचे. एका मुलावरच त्यांनी कुटुंब नियोजन करण्याचा विचार केला. आपण लेकराला पोसू शकत नाही तर जास्तीचे लेकरं कशाला. मोहनालच चांगलं शिक्षण देऊ आणि मोठा साहेब करू असा त्याचा विचार होता. मोहन सहा वर्षाचा झाला की त्याला गावातील शाळेत पहिल्या वर्गात दाखल केला. गुरुजीला म्हणाला, " याला खूप शिकवायचं आहे. गुरुजी तुम्हीच याचे मायबाप चांगलं शिकवा " असे म्हणून तो निघून गेला.
मोहनला शाळेतला पहिला दिवस खूप कठीण गेले. तो घरात मोकळेपणाने खेळलेला, इकडे तिकडे फिरलेला, शाळेत मात्र एकाच जागी बसून राहावं लागलं म्हणून तो खूपच कंटाळला होता. पण हळूहळू त्याला त्याची सवय झाली. नित्यनेमाने तो शाळेत जाऊ लागला. अक्षरे, अंक गिरवू लागला आणि घरात येऊन अभ्यासही करू लागला. हे पाहून मोहनच्या बा ला खूप आनंद झाला. शाळेत जाताना त्याची आई मोहनला रोज तयार करायची. गरम पाण्याने अंघोळ घालायची, छान स्वच्छ कपडे टाकायची, केसाला तेल आणि तोंडाला पावडर लावून छानपैकी टिळा लावायची. त्याचा टापटीपपणा पाहून तो शाळेतील सर्वांचा आवडता विद्यार्थी बनला होता. मोहन तसा हुशारच होता, त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो चटकन लक्षात ठेवायचा. दिवसामागून दिवस सरले मोहन चांगला अभ्यास करत वरच्या वर्गात जात होता. त्याचे आईवडील देखील मोहनच्या सुखासाठी खूप कष्ट करत होते. त्याने मागेल ती वस्तू त्याला आणून देत असत. एकुलता एक मुलगा म्हणून आई खूप लाड करायची पण बाबा मात्र जास्त लाड न करता चुकल्या ठिकाणी मोहनला समज देत असत. त्यामुळे मोहन बाबाला जरासा घाबरत होता. तो सातवी पास झाला. आठवी वर्ग गावात उपलब्ध नव्हते त्यामुळे जवळच्या शहरात जाणे गरजेचे होते. त्यांच्यापुढे मोहनच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरात खोली घेऊन राहण्याची ऐपत नव्हती. काय करावे सुचत नव्हते. शाळेतल्या गुरुजीला त्यांची समस्या कळाली. तेव्हा त्यांनी मधला मार्ग काढला. स्वतः गुरुजीनी मोहनला एक सायकल भेट म्हणून दिली आणि सायकलद्वारे शाळा करण्याचा सल्ला दिला. गुरुजींनी समस्या सोडविली म्हणून ते खूप धन्यवाद दिले.
मोहनची शहरातील शाळेला सायकलवर जाणे येणे सुरू झाले. तो हुशार होता, अभ्यासू होता आणि मेहनती देखील होता त्यामुळे काही दिवसातच त्याने त्या शाळेतील शिक्षकांची मने जिंकली. तो आठवी आणि नवव्या वर्गात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला होता. दहावीचा महत्वाचा वर्ग होता. त्याचे सर्वच मित्र शहरात खोली घेऊन राहत होते आणि त्यांचा अभ्यास जास्त होत होता. मोहन मात्र सायकलवर जाणे-येणे करत असल्याने दहावीचा अभ्यास कमी होऊ लागला. म्हणून त्याने शहरात राहण्याचा विचार केला. आई-बाबांना त्या विषयी तो बोलला मात्र आई बाबाजवळ तेवढे पैसे नव्हते की, त्याला शहरात खोली घेऊन ठेवता येईल. तेव्हा मोहनने 'मी पैश्याची काही व्यवस्था करतो तुम्ही फक्त होकार द्या' असे म्हणाला. काळजावर दगड ठेवून त्यांनी मोहनला होकार दिला. सारी सामानाची बांधाबांध करून मोहन आणि त्याचे बाबा सायकलवर शहराकडे निघाले. मोहनला निरोप देताना आईच्या डोळ्यात गंगायमुना भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी तिने मोहनला निरोप दिला. शहरातल्या खोलीत सर्व सामान टाकून बाबा ही सायकल घेऊन घरी परतले. आता मोहनला सायकलची काही आवश्यकता नव्हती कारण शाळेच्या जवळच त्याने खोली घेतली होती. खोली घेतल्यापासून त्याचा अभ्यास चांगला चालू झाला होता. सकाळी तो शहरात पेपर टाकायचा आणि त्यानंतर शाळा करायचा. कोणाला काही कळू न देता मोहन पेपर टाकण्याचे काम करत होता. त्याच्या बदल्यात जे काही पैसे मिळत होते त्याने त्याचा खोलीचा किराया निघत होता. प्रथम सत्र आणि सराव परीक्षेत तो उत्तम प्रकारे गुण घेतले होते. आज दहावीचा पहिला पेपर होता. भल्या पहाटेच त्याचे बाबा सायकल घेऊन शहरात आले. मोहनला परीक्षा केंद्रावर सोडला, चांगले लिही म्हणून शुभेच्छा दिला आणि आपल्या गावाकडे परतला. गावी परत जातांना मागून आलेल्या एका भरधाव वाहनाने मोहनच्या बाबांच्या सायकलला जोरात धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्या पडल्या मोहनला ही वाईट बातमी कळाली. तसा तो धाय मोकलून रडला. मित्रांच्या मदतीने तो गावी गेला. तो खूप रडला. त्याचे बाबांवर खूप प्रेम होते, तोच त्याचा एकमेव आधार होता. त्याला काही एक सुचेना. तो वेड्यासारखा काही बोलत होता. त्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल झाला. त्याने काही पैसे देण्याचे ही कबुल केले पण याने बा चा जीव थोडाच परत मिळणार होता, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. अंत्यविधी पार पडला. मोहन शून्य नजरेने छताकडे पाहत होता. पुढे काय ...? या प्रश्नाने तो चिंताग्रस्त झाला होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
02. मोहनचे शिक्षण
बाबांचे अकाली जाणे मोहनला खूप जड गेले. त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले. त्याची आई तर वेडी झाल्यासारखे वागू लागली. या दोघांना सांभाळण्यासाठी मोहनचा मामा हा एकटाच एकमेव आधार म्हणून उभा होता. दोन दिवसांनी मोहनचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या मृत्यूनंतरची सर्व क्रिया सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तो परीक्षेचा विचार करू लागला. अपघातात त्याच्या सायकलचा चक्काचूर झाला होता. त्याला दुरुस्त करणे शक्य नव्हते. आईला एकटीला गावात सोडून परत शहरातल्या खोलीवर जाऊन राहणे मोहनला अशक्य होते. परीक्षेचे पुढील पेपर कसे द्यावे ? द्यावे की देऊ नये ? या विचारात तो तसाच झोपी गेला. त्याला जेवण देखील गोड लागत नव्हते. सकाळ झाली. त्याचा मामा तेवढ्यात तेथे हजर झाला. वर्षभर केलेल्या अभ्यासावर पाणी कश्याला पेरतोस चल आपण दोघे जाऊ या मी सोडतो तुला परिक्षेला, असे म्हणून मामाने त्याच्या सायकलवर डबल सीट बसवून मोहनला घेऊन गेला. त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला होता, पण मनःस्थिती ठीक नव्हती. त्यामुळे तो उदास होऊन परीक्षा केंद्रावर गेला. त्याच्या वडिलांची बातमी शहरात पसरली होती, तशी परीक्षा केंद्रावर देखील पोहोचली होती. परीक्षा केंद्राच्या संचालकांनी मोहनला परीक्षा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. त्याला समजावून सांगितले आणि परीक्षेचे सर्व पेपर देण्यास प्रोत्साहित केले. न्यूजपेपरवाल्यांना देखील ही बातमी कळाली तसे ते ही परीक्षा केंद्रावर धाव घेतले. परीक्षा देतांना मोहनचा एक फोटो घेतले आणि वडिलांच्या मृत्यूचा दुःख बाजूला ठेवून मोहनने दिली दहावीची परीक्षा अशी बातमी प्रकाशित केली. या सर्वांचा प्रेरणेने मोहनच्या मनाची तयारी झाली. तो चांगल्या प्रकारे सर्व विषयाचे पेपर्स दिला. घरात आई एकटीच राहत असल्याने तो शहरात खोलीवर राहण्याऐवजी घरूनच मामासोबत ये-जा करत सर्व पेपर्स दिले. शेवटच्या दिवशी पेपर संपल्यावर त्याने ती खोली सोडली आणि सर्व सामान घेऊन गावाकडे परत गेला. त्यासोबत पेपर टाकण्याचे काम देखील सोडून दिला. आई अजून ही दुःखातून सावरली नव्हती म्हणून मामाने दोघांना आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरविले. जरासे हवापालट होईल आणि मन हलके होईल म्हणून मोहन आणि त्याची आई गावी जाण्यास तयार झाले.
मामाच्या गावात देखील मोहन स्वस्थ बसला नाही. रोजच्या रोज कुठे ना कुठे काम करत चार पैसे मिळवित राहिला. बाबांच्या सायकलला धडक दिलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. मामाने काही तरी तडजोड करून त्याच्याकडून पैसे घेण्याचे कबुल केले होते. तो शहरातील एक व्यापारी होता आणि तो पैसे द्यायला कबूल देखील झाला. एके दिवशी पैसे देण्यासाठी तो मामाच्या घरी आला. मोहन, त्याची आई, मामा आणि मामी सारेजण अंगणात बसले होते. करारानुसार त्याने पैसे देऊ केले मात्र मोहनने ते पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. या पैश्याने माझी मनःस्थिती अजून बिघडून जाईल. तुमच्या पैश्याने माझा बा काही परत येणार नाही आणि माझे बा नेहमी कष्टाचा पैसा स्वीकारावे असे मला सांगत आलेत म्हणून मी हे पैसे घेणार नाही. असे बोलतांना आई त्याला एकटक पाहतच होती. आईला मोहनचा अभिमान वाटला. ती मोहनला जवळ घेऊन दोन्ही हाताचे बोटे गालावर फिरवून कडकड मोडली. तो व्यापारी देखील खजील होऊन परत फिरला पण जाताना मोहनचा स्वाभिमान पाहून थक्क झाला. इकडे मामी मात्र घरात मोहनच्या नावाने बोटे मोडत होती. घरात आलेल्या लक्ष्मीला असे धुडकावणे काही चांगले नाही. घरात एक पैसा नाही आणि कष्टाचे कमाई केलेले पैसेच घेणार. अशी ती मनातल्या मनात बोलत होती. व्यापारी येऊन गेल्यापासून मामीच्या वर्तनात देखील बदल दिसू लागला. तो व्यापारी पैसे घेऊन येणार आणि आपणाला देखील काही तरी मिळेल या आशेवर ती आजपर्यंत सेवा करत होती. पण एक ही रूपाया मिळाला नाही हे पाहून ती देखील घरात धुसफूस करू लागली. हे मोहनच्या आईच्या लक्षात यायला वेळ लागला नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या घरी जाण्याची तयारी केली. मोहन आणि आई आपल्या घरी आले.
मामाच्या घरात मोहनचे वागणे आणि बोलणे पाहून आईचा उर भरून आला होता. ती हळूहळू सर्व काही विसरून पूर्वपदावर येऊ लागली. पूर्वीप्रमाणे ती शेताला जात होती आणि मोहनसुद्धा तिच्यासोबत शेताला जात असे. माय-लेकरू मिळून शेतात काम करू लागले. निकालाचा दिवस उजाडला. मोहन निकाल बघण्यासाठी शहरात गेला. पास होतोच की नाही याची मोहनला खात्री नव्हती. कारण ऐन परीक्षेच्या दिवसांत त्याच्या बाबांचा अपघात झाला होता आणि बाबा त्याला सोडून गेले होते. शाळेत जाऊन निकाल पाहिला तर त्याचे त्याच्यावर विश्वास बसत नव्हते. त्याला ऐंशी टक्के मार्क पडले होते आणि तो शाळेतून तिसरा होता. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. पेपरवाल्यांनी देखील त्याची तोंडभरून स्तुती केली. ही बातमी कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते. घराकडे जाताना त्याने थोडेसे पेढे विकत घेतले आणि घराकडे गेला. घरी त्याची आई वाटच पाहत होती. पळतच तो आईला मिठी मारली आणि दहावी पास झालो असे सांगितले. बाबांच्या फोटोपुढे एक पेढा ठेवला आणि मनातल्या मनात म्हणाला, बाबा निकाल बघायला तुम्ही हवं होतात, बघा ऐंशी टक्के मार्क पडलेत आणि शाळेतून तिसरा आलोय. आई बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. पदराने तिने आपले डोळे पुसले. मोहनने आईच्या हातात पेढा दिला आणि नमस्कार केला. आईने मोहनचे तोंड गोड केले. बाबांच्या मृत्यूनंतर आज एक सुखाचा क्षण त्यांच्या जीवनात आला होता. रात्री जेवताना आई मोहनला म्हणाली, बाळ, पुढे काय शिकायचं ठरवलं ? यावर मोहन चिंताग्रस्त झाला. तसे तर त्याचा गणित हा विषय खूपच आवडीचा होता. गणित विषय घ्यावं तर सायन्स निवडावे लागते आणि सायन्स करणे खूप अवघड आहे याची जाणीव त्याला होती. त्याच्या डोळ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. शहरात खोली घेऊन राहावे का ? आईला गावात एकटीला ठेवावे का ? सायन्सला जावे की आर्ट्स घ्यावे की आय टी आय करावे ? पुढे काय करावे ? याच विचारांच्या तंद्रीत तो झोपी गेला.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
03. मोहनची नोकरी
दहावी पास झालो आता पुढे काय करावं ? हा प्रश्न मोहनला सतावत होता. सर्वत्र प्रवेश प्रक्रिया चालू झाली. मोहनचे सर्व सोबत्यांनी कॉलेजला प्रवेश घेतले होते तर काहीजण आय टी आय ला गेले होते. दोन-तीन दिवसांनी मोहन अकरावी आर्टसमध्ये प्रवेश घेण्याचा मोहनने निश्चित केले. सायन्सला प्रवेश घे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावले पण त्याची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्याला इच्छा असून देखील तो सायन्सला प्रवेश घेऊ शकला नसता. नाईलाजस्तव त्याने आर्टसमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन प्रवेश घेतला. कॉलेजला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस कॉलेजमध्ये गेला आणि कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत ? याची नोंद घेतली. वाचनालयातुन मिळतील तेवढी पुस्तके घेतली आणि घरी राहून अभ्यास करू लागला. सायन्स घेतलं असतं तर रोज कॉलेजला जावं लागतं आणि आर्टस घेतलं तर आठवड्यातून एक-दोन वेळा गेले तरी चालते हे मनाशी ठरवून मोहनने ही शाखा निवडली होती. ज्या दिवशी तो घरी राहत असे त्यादिवशी तो आईसोबत किंवा दुसरीकडे कामाला जात असे. रात्रीच्या वेळी अभ्यास आणि दिवसभर काम असा त्याचा वेळापत्रक ठरलं होतं. लाईट देखील त्याला साथ देत नव्हती. महिन्यातून वीस एक दिवस तरी रात्रीला लाईट राहत नसे त्यामुळे दिव्याच्या उजेडात तो अभ्यास करायचा.
कॉलेजमधील त्याची अनुपस्थिती ठळक दिसून येत असल्याने एके दिवशी प्राचार्याने मोहनला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. पूर्वीप्रमाणे आता कॉलेज राहिलेलं नाही, तुझी उपस्थिती 75 टक्के भरली नाही तर तुला वार्षिक परीक्षेला बसता येणार नाही असा प्राचार्यानी दम भरला. मोहनने त्याची परिस्थिती आणि अनुपस्थितीचे कारण प्राचार्याना सांगितले. तेवढ्यात तिथे मोहनचे इंग्रजीचे शिक्षक आले. त्यांनी मोहनचे अक्षर आणि गुणवत्ता पाहिली होती. त्यांनी मोहनची बाजू घेऊन त्यास सवलत देण्याचे प्राचार्याना सुचविले. प्राचार्य देवमाणूस होते तेंव्हा प्राचार्य देखील राजी झाले आणि म्हणाले, तुला कशाची गरज भासली तर मला सांग, तुला हवी ती मदत करतो. यावर मोहन उत्तरला, धन्यवाद सर, मला आपली एवढीच मदत खूप मोलाची आहे. असे म्हणून मोहन बाहेर पडला.
अकरावीचे वर्ष संपले आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेध लागले. मोहनची आई त्याला शहरात खोली घेऊन राहण्याविषयी अनेकदा बोलली मात्र मोहनला काही केल्या पटत नव्हते. आईला एकटीला सोडून जाणे त्याला जीवावर जात होते. बारावी निघेल किंवा निघणार नाही मी मात्र तुला सोडून जाणार नाही असे तो आईला ठामपणे सांगून ठेवले. सारे मित्र बारावीच्या परीक्षेसाठी जोरदार तयारी करून अभ्यास करत होते. मोहन मात्र आपल्या वेळापत्रकाप्रमाणे दिवसा काम आणि रात्री अभ्यास करत होता. गणित त्याचा आवडता विषय होता, त्याला पूरक अर्थशास्त्र विषय मिळाल्याने तो आवडीने अभ्यास करू लागला. शेतीच्या कामातून मिळालेल्या पैशांतून त्याने एक नवी सायकल विकत घेतली. आता आठवड्यातून दोन दिवस कॉलेज करू लागला. कॉलेजमधील सारेच शिक्षक मोहनला हवी ती मदत करत असत. त्याची परिस्थिती जवळपास सर्वाना माहीत होती. त्याचे मित्र ही त्याला मदत करण्यास तयार असायचे मात्र मोहन मदत घेणे टाळायचा. जोपर्यंत माझ्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत मी कोणाकडे हात पसरणार नाही. ज्यादिवशी मी हात पसारलो त्यादिवशी मी संपल्यात जमा आहे, असे तो नेहमी बोलायचा. मन लावून खूप अभ्यास केला आणि बारावीची परीक्षा 65 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. मोहनला आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला.
मोहनला अजून पुढे शिकायचे होते. आर्टस केल्यामुळे त्यांच्यापुढे डिग्रीला प्रवेश घेण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्याच कॉलेजमध्ये त्याने डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच्या सोबतचे काही मित्र मेडिकलला गेले, काही इंजिनिअरिंगला गेले तर काही इतर शाखेत प्रवेश घेतले. आठवड्यात एक-दोन दिवसांच्या ऐवजी मोहन आता महिन्यातून एकदा कॉलेजला जात होता. महत्वाचे नोट्स टिपण करून पुस्तकांची अदलाबदल करून घरी येत होता. महिनाभर तो आपल्या शेतात राबायचा आणि सोबतच मजुरी देखील करायचा. याचे त्याला बऱ्यापैकी पैसे मिळत होते. शेतातील उत्पन्न मात्र त्याला काही साथ देत नव्हते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ लागला. त्याला शेतातील गणित काही केल्या जुळत नव्हतं. त्याचं अर्थशास्त्र या शेतीच्या व्यवसायात काही कामाला येत नव्हते. शेती सोडून काही तरी काम करावे हे त्याच्या डोक्यात नेहमी चालायचं. आपल्या शिक्षणाचा काही तरी फायदा व्हायलाच पाहिजे. सरकारी नोकरी मिळणे तर कठीण आहे पण खाजगी नोकरी करायला काय तहरकत आहे असा विचार त्याच्या मनात येत होता.
शहरात कॉलेजच्या निमित्ताने गेल्यावर कुठे काम मिळते का ? याचा तपास त्याने चालू केला. पण मोहनच्या शिक्षणाच्या बळावर कोणतीही नोकरी त्याला मिळत नव्हते. काय करावे ? हे त्याला सुचत नव्हते. तो रोज चिंताग्रस्त व्हायचा. असे डिग्रीचे तीन वर्षे निघून गेली. डिग्री देखील चांगल्या गुणाने पास झाला. अजून पुढील शिक्षण घेण्याची त्याची ईच्छा होती मात्र त्यासाठी गावापासून दूर मोठ्या शहरात जाण्याची त्याच्यावर वेळ आली. आईने त्याला जाण्याची परवानगी दिली मात्र तो काही जाण्यास तयार होत नव्हता. असेच एके दिवशी मोहन शहरात गेला होता. त्याला बाजारात तो व्यापारी भेटला. मोहनने त्या व्यापाऱ्याला ओळ्खले नाही मात्र व्यापाऱ्याने मोहनला चटकन ओळखून घेतलं आणि म्हणाला, " अरे मोहन, कसा आहेस ?
" ठीक आहे " नाराजीच्या सुरात मोहन म्हणाला. ते दोघे एका हॉटेलात गेले आणि चहा घेऊ लागले. चहा पिता पीता व्यापाऱ्याने विचारले की, " तू सध्या काय करत आहेस ?"
" काही नाही, सध्या नोकरी शोधत आहे. " मोहन उत्तरला.
" कसली नोकरी आणि तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय ?" व्यापाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला मोहन म्हणाला, " कोणतीही नोकरी चालते, माझ्या डिग्रीच्या शिक्षणाला, कोण देईल नोकरी ? "
यावर तो व्यापारी म्हणाला, " मी देईन ना नोकरी, चल मी तुला देतो माझ्याजवळ नोकरी " मोहनने तडजोड केलेली रक्कम घेतली नाही, हे त्या व्यापाऱ्याला नेहमी छळत होते. आज एक सुवर्णसंधी मिळाली, त्या कर्जातून मुक्त होण्याची, असा विचार तो व्यापारी करत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर येण्याची कबुली देऊन मोहन आनंदाने घरी परतला. आईला ही बातमी कळाल्यावर ती देखील आनंदी झाली. ज्या लक्ष्मीला मी धुडकावले होते, तीच लक्ष्मी आज वेगळ्या रुपात येऊन मला भेटली, भगवान के पास देर है, मगर अंधेर नहीं असे स्वतःशी म्हणत मोहनने बा च्या फोटोकडे एकवार नजर फिरवली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तयार होऊन मोहन शहराकडे निघाला. त्याच्या चेहऱ्यावर आज जे तेज दिसत होते ते यापूर्वी कधीच दिसले नाही. त्या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर आपली सायकल लावली आणि तो आतमध्ये गेला. सगळीकडे धान्यचधान्य पसरलेलं दिसत होते. मोहनला काय काम करायचं आहे ? अजून ठाऊक झाले नव्हते. त्याच्या मनात एक शंका येत होती की, हे धान्याचे वजनदार पोते तर उचलावे लागणार नाही ना ! थोड्याच वेळात व्यापारी आला आणि त्याने मोहनला त्याच्या कामाची जबाबदारी दिली. त्याला साजेशी असेच काम मिळालं होतं. मोहनला व्यापाऱ्यांनी मुनीम ( दिवाणजी ) म्हणून कामावर ठेवलं होतं. त्याला ही ते काम आवडले आणि मोहनच्या नोकरीला सुरुवात झाली. अगदी प्रामाणिक आणि सचोटीने तो काम करू लागला. तो त्या व्यापाऱ्याचा खास माणूस बनला. महिन्याचा पहिला पगार हातात पडला, तेंव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्याने आपला पहिला पगार बा च्या चरणी अर्पण केला. मोहनला नोकरी मिळाली, आता आईला मोहनच्या लग्नाची काळजी वाटू लागली. मोहनला लग्नासाठी कोण मुलगी देणार ? याला मुलगी मिळेल की नाही असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात धुमाकूळ घालत होते. दोनाचे चार हात करण्यासाठी मोहनची आई आतुर झाली होती.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
4. मोहनचे लग्न
मोहनचे काम अगदी सुरळीत सुरू होते. रोज सकाळी शहरात जाणे व सायंकाळी परत येणे. आईच्या हाताने तयार केलेला डबा सोबत असायचा. त्याला बाहेरचे खाण्याची अजिबात तलब नव्हती. साधी चहा पिण्याची सुद्धा लकब नव्हती बाकीच्या गोष्टी तर कोसो दूर होत्या. दुपारच्या वेळी दुकानातच आपला डबा खायचा आणि काम करायचं. त्याचे काम पाहून व्यापारी खूपच आनंदात होता. त्याला मोहनच्या स्वरूपात एक प्रामाणिक, मेहनती आणि कष्टाळू दिवाणजी लाभला होता. मोहनचे पाय दुकानाला लागल्यापासून त्याच्या व्यापारात देखील वृद्धी झाली होती. मोहनच्या भरवशावर तो व्यापारी दुसऱ्या गावात जाऊन आपला व्यवहार करू लागला. मोहनच्या मनात कधीही लालच किंवा लोभ निर्माण झाले नाही म्हणून तो तिथे टिकून काम करत होता. मोहनचे आता लग्नाचे वय झाले, म्हणून आई नेहमी त्याला लग्नाविषयी विचारायची पण मोहन त्याकडे दुर्लक्ष करायचा. आज आईने जेवतांना परत विषय काढला, " बाळ, आता किती दिवस असा विना लग्नाचा राहणार आहेस ? लग्न करून घे, म्हणजे मलाही सोबत होईल, मला एकटीला घर खायला उठत आहे." यावर मोहनने फक्त मान हलविली आणि म्हणाला, " ठीक आहे, तुला सोबत होते म्हणून होकार देत आहे." हे ऐकून आईला अत्यानंद झाला. आता लग्नासाठी उपवर मुलींचा शोध घेणे आवश्यक आहे कारण मोहनने लग्नाला होकार दिलाय असे ती शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगू लागली. काही जणांनी स्थळ देखील सुचविले. त्यात एकाने तुमच्या भावाची मुलगी भाची लग्नाला आलेली आहे, त्यालाच मागणी का घालत नाहीस ? असे सुचविले.
तिच्या मनात देखील हे विचार चालू होतेच, पण भाऊ मानेल का ? आपल्या मोहनसाठी भावाची मुलगी उत्तम आहे असे तिला वाटू लागले. हा विचार तिने मोहनला सांगितला तेव्हा मोहनने प्रथम नकारच दिला होता. कारण मामा एकवेळ होकार देईल पण मामीला हे नाते कधीच मान्य होणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे बोलणे, येणे-जाणे सारेच बंद झाले होते. आता त्यांच्याकडे काय म्हणून जावे ? हा प्रश्न होता. तरी आईच्या हट्टापायी एके दिवशी ते दोघे मामाच्या गावी गेले. खूप दिवसांनी बहीण आपल्या घरी आल्याने भावाला खूप आनंद झाला होता. चहा-पाणी, जेवण आटोपल्यावर आईने मोहनच्या लग्नाचा विषय काढला आणि त्याच्या मुलीची मागणी घातली. मामाच्या चेहऱ्यावर तसा आनंद झळकत होता पण माजघरात असलेल्या मामी मात्र लालबुंद झाली होती आणि आदळआपट करू लागली. मामीने मामाला आत बोलावून घेतलं. दोघांत काही तरी चर्चा झाली. विचार करून सांगतो असे बोलून मामाने बहिणीची आणि मोहनची पाठवणी केली. मोहनला एव्हाना लक्षात आलं होतं की हे नाते जुळणार नाही.
असेच काही दिवस निघून गेले आणि मामा एके दिवशी सकाळी सकाळी मोहनच्या घरी आला ते ही साखरपुड्याचे निमंत्रण घेऊन. परवाच्या दिवशी साखरपुडा आहे, तुम्ही यावे असा निरोप त्याने दिला. आई अगदी नाराज झाली होती, पण चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता ती म्हणाली, काय करतो मुलगा ? मामा म्हणाला, जावई शिक्षक आहे आणि महिना पंधरा-वीस हजार रु. पगार आहे. बरे झाले सावित्रीचे भले झाले, आमच्या घरात तिला काही मनासारखं मिळालं नसतं, जे झालं ते चांगलं झालं असं आई म्हणाली. ते ऐकून मामाच्या डोळ्यांत पाणी आले. बरं येतो, या तुम्ही म्हणून मामा निघून गेला. मोहन हे सारं बाजूला बसून ऐकत होता. आईने आपल्या काळजावर किती मोठा दगड ठेवून बोलत होती, हे त्याला कळले होते. लग्नाच्या विषयामुळे घरात जराशी स्मशान शांतता पसरली होती. पाहुण्यांमध्ये मोहनच्या लग्नाची गोष्ट पसरली तसे काही स्थळ आले होते पण कोणत्या ना कोणत्या कारणाने जुळत नव्हते. मोहनकडे होतंच काय म्हणून, दोन एकर जमीन, छोटसं घर आणि तुटपुंजी पगाराची खाजगी नोकरी. यामुळे कोणी वधुपिता मोहनला आपली मुलगी देण्यास तयार होत नव्हते. यामुळे मोहनच्याही मनात न्यूनगंड निर्माण होऊ लागला होता. मागील काही दिवसांपासूनचे मोहनचे वर्तन पाहून त्याच्या मालकाने त्याला विचारले, " काय झालं मोहन, आजकाल तू पूर्वीसारखा दिसत नाहीस, नेहमी चिंताग्रस्त असतोस, काही समस्या असेल तर सांग मला" पण मोहनने काही नाही म्हणून उत्तर देण्याचे टाळत होता. एके दिवशी मालकाला मोहनची समस्या कळली तेव्हा त्याने मोहनला धीर दिला आणि म्हणाला, " माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे, तुमच्याच जातीचा, त्याची मुलगी लग्नाची आहे, आपण विचारून पाहू" मोहनने नुसती आपली मान हलविली. मालकाने त्या ओळखीच्या व्यक्तीला मोहनच्या बाबतीत पूर्ण माहिती दिली आणि एके दिवशी ते मुलगी पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यांचे घर ही साधारण होते, मोहनला साजेशी मुलगी होती. आईला ती मुलगी पाहताक्षणी पसंत पडली. मोहनचा तर प्रश्नच नव्हता. आईला पसंद ते त्याला पसंद असे होतं. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातच साखरपुडा झाला. राधा तिचे नाव. दोन महिन्यात लग्नाची तारीख काढली. लग्न लावून देण्याची सारी जबाबदारी त्या व्यापाऱ्याने घेतली. गावात लग्न लावण्यापेक्षा शहरात मोठ्या धुमधडाक्यात मोहनचे लग्न लागले. अनेक पाहुणे, नातलग, मित्रमंडळी या लग्नाला उपस्थित होते. मामा-मामी, सावित्री आणि तिचा नवरा सारेच आले होते. मामी तर चक्क तोंडात बोटे टाकून एकटक मोहन आणि राधा यांच्याकडे पाहत होती. लग्नसोहळा संपन्न झाला. सारे आपापल्या गावाकडे गेले. मोहन, त्याची आई आणि नववधू राधा आपल्या घरी आले. बा च्या फोटोपुढे नतमस्तक झाले नंतर आईच्या पाया पडले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. राधा ही खूप चांगली आणि सोज्वळ स्वभावाची होती. गरीब घरातून आल्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची जाण होती. आईला त्रास होईल असे तिने कधीच वागले नाही. मोहनला देखील तिने कधी हट्ट धरून भंडावून सोडले नाही. आई आज मनोमनी खूप आनंदात होती. बरे झाले सावित्रीला सून म्हणून आणलं नाही असे तिला मनोमनी वाटत होतं कारण ती चांगल्या घरातली मुलगी होती, तिला या झोपडीत अस्वस्थ वाटले असते, ती टिकली असती की नाही माहीत नाही असे आईला मनात वाटत होते. दुपार झाली होती. आई नुकतेच जेवण करून पहुडली होती. तेवढ्यात राधाला काही तरी त्रास होत होता. मळमळते आहे असं वाटू लागलं होतं पण बाहेर काही येत नव्हतं. तिला घाबरल्यासारखे झालं पण आईला कळले की राधेला दिवस गेले आहेत. सायंकाळी मोहन घरी आल्यावर आईने सांगितलं की, राधाला उद्या दवाखान्यात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरांना दाखव.
राधाला काल दुपारी त्रास झाला हे मोहनला कळाले म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच तो राधाला घेऊन शहरात गेला. एका चांगल्या नामांकित डॉक्टर मॅडमला दाखविले. त्या मॅडमने मोहनला एक आनंदाची बातमी सांगितली तेव्हा मोहनला खूप आनंद झाला. दोघे ही दवाखान्यातून घरी परत आले. आईला त्याने ही आनंदाची बातमी सांगितली तेव्हा आई म्हणाली, " हो, मला कालच लक्षात आलं, पण दवाखाना केलेलं बरं म्हणून जा म्हटलं" बाप होणार या आनंदात तो स्वप्नात रंगून गेला आणि गाढ झोपी गेला.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
5. लक्ष्मी आली घरा
कु कूच कु कोंबड्याच्या आरवण्याने मोहनला जाग आली. तसा तो अंथरुणातून उठला, आपले सकाळचे सर्व कार्य आटोपून शहराकडे निघाला. आज स्वारी मजेत होती. मनातल्या मनात गाणे गुणगुणत तो जात होता. दुकानासमोर आपली सायकल लावली, आत गेला. दुकानात गेल्याबरोबर त्याच्या कानावर एक वाईट बातमी आली, त्याच्या मालकाला सकाळी दवाखान्यात घेऊन गेले. त्याने आपला डबा दुकानात ठेवला आणि दवाखान्याकडे सायकलवर निघाला. मनात खूप विचार येत होते, काय झालं असेल मालकाला ? कोणता त्रास आहे ? कसे असतील ते ? विचाराच्या तंद्रीत तो दवाखान्यात आला. अतिदक्षता विभागात मालकांना ठेवण्यात आले होते आणि बाहेर त्यांची पत्नी बसली होती. मोहनला पाहताच तिने ओळखले आणि तिच्या डोळ्यांतून पाणी आले. मोहनने मालकीणबाईला विचारले, " काय झालं आहे मालकांना ?" त्यावर मालकीणबाई म्हणाली, " त्यांना झटका आलाय, एक बाजू पडून गेलीय " मोहनच्या लक्षात आलं की, मालकांना लकवा मारला आहे. मालकीणबाईला जरा धीर देऊन तो काचेतून मालकांना पाहू लागला. थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी औषधाची चिठ्ठी दिली. मोहनने मेडिकलमध्ये जाऊन ती सर्व औषधी घेऊन आला. डॉक्टर म्हणाले, " आठवडाभर देखरेखीखाली ठेवावे लागेल, पेशंटला पॅरेलिसीस अटॅक आलेला आहे, ही औषधं नियमित द्या, काळजी घ्या." मालकीणबाई तेथे बसली आणि मोहन दवाखान्यातून बाहेर पडला.
त्या दोघांना मदतीसाठी तेथे मोहन शिवाय कोणीच नव्हते. म्हणून मोहन सर्व काही पाहत होता. दुकान आणि दवाखान्यात लक्ष देतांना त्याची खूप धावपळ होऊ लागली. आठवड्यानंतर दवाखान्यातून सुट्टी मिळाली आणि ते घरी आले. मालकाला स्वतःला उभेही राहता येत नव्हते, त्यांच्यासाठी एक व्हीलचेअर घेतले, त्यावर त्यांना बसवावे लागत होते. त्यांना नीट बोलताही येत नव्हते. शरीराच्या उजव्या बाजूला लकवा मारला होता. मोहनला त्यादिवशी कळले की, मालक निपुत्रिक आहेत. त्यांना कोणीही नाहीत. मोठ्या बंगल्यात फक्त ते दोघेच राहतात. आपली आनंदाची बातमी सांगावी असे मोहनला वाटले होते पण त्यांच्या दुःखात आपली आनंदाची बातमी सांगणे योग्य वाटले नाही. त्यामुळे त्याने काही सांगितले नाही. मोहनवर आता दोन जबाबदाऱ्या पडल्या, दुकान पाहायचे आणि मालकांच्या घराकडे देखील हवं-नको ते पाहायचं. एके दिवशी मालक त्याला म्हणाले, " मोहन, तू येथेच माझ्या घरी येऊन का राहत नाहीस ? तुझी खूप धावपळ होत आहे." त्यावर मोहन फक्त हुं म्हणून विचार करू लागला.
त्यादिवशी रात्री जेवण करताना तो आईला म्हणाला, " आई, मालक म्हणत होते की, त्यांच्या घरी येऊन राहा, काय करू मला काही सुचत नाही." यावर आई म्हणाली, " काही हरकत नाही बाळा, मालकावर लई कठीण प्रसंग आलाय, तुझी देखील खूप धावपळ होत आहे, जाऊन राहा, माझी काही हरकत नाही, सोबत राधालाही घेऊन जा" आई बोलली पण मोहनला आईला सोडून जाणे जीवावर येत होते. काय करावं हेच त्याला कळेना. राधा देखील आईशिवाय जाणे नको म्हणत होती. शेवटी मनाचा निश्चय करून त्याने मालकाच्या घरी राहण्याचा निर्धार केला. राधा आणि आईला घेऊन तो दुसऱ्या दिवशी मालकाकडे गेला. येथे तिघेजण राहू शकतो का ? म्हणून विचारणा केली. मालकाने लगेच होकार दिला. त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत मोहनचा संसार सुरू झाला. मोहनला आता जास्त वेळ लक्ष देता येत होते. राधा आणि आई घरातील कामे करून मालकीणबाईला मदत करत होत्या. तेव्हा त्यांना ही बरे वाटले. मालकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती मात्र ते अजूनही चालू शकत नव्हते.
रात्रीची वेळ होती, सर्वांचे जेवण झाले होते. साधारण दहा वाजले असतील, राधाला पोटात कळ यायला सुरुवात झाली होती. मोहन लगेच राधाला घेऊन दवाखान्यात गेला. काही वेळांत राधा प्रसूत झाली आणि एका मुलीला तिने जन्म दिला. मोहन खूप आनंदी झाला कारण आज तो एका मुलीचा बाप झाला होता. घरी आई एकटी काळजीत होती म्हणून त्याने घरी जाऊन आईला ही गोड बातमी दिली आणि परत दवाखान्यात आला. रात्रभर राधाजवळ राहिला. सकाळ झाली, ही बातमी मालकांना सांगावी म्हणून तो हातात पेढ्याचा डबा घेऊन गेला. मालकाच्या हातात पेढा दिला, त्यांच्या पाया पडला आणि मुलगी झाली अशी गोड बातमी दिली. मालकाच्या पदरात देवाने पुत्र दिले नव्हते त्यामुळे ही बातमी ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला. मालकीणबाईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आई होण्याचं सौभाग्य तिला मिळालं नाही याचे तिला राहून राहून दुःख वाटायचे मात्र मोहन व राधाच्या रुपात त्यांच्या अंगणात एक बाळ आलंय याचा तिला आनंद झाला होता.
राधा दवाखान्यातून घरी आली. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. काही दिवसांनी बारसे करण्याचे नियोजन करण्यात आले. घरात तिच्या नामकरणविषयी बोलू लागले. काय नाव ठेवावं ? यावर कोणीही एकमत होत नव्हते. शेवटी नामकरण करण्याचा दिवस उजाडला. अनेक पाहुणे, नातलग, मामा-मामी, सारेचजण कार्यक्रमाला हजर होते. आदल्या दिवशी रात्री एक अनोखी घटना घडली. मोहन आपल्या मालकाकडे नामकरण विषयी निमंत्रण देण्यासाठी गेला होता. मालकाने त्याला बसवून घेतले आणि म्हणाले, " हे बघ मोहन, तुला एक महत्वाची गोष्ट सांगावी वाटते" बाजूला मालकीणबाई देखील बसलेल्या होत्या. मोहन म्हणाला, " कोणती गोष्ट मालक ?" यावर मालक पुढे बोलू लागला, " मला आता दुकानात येऊन सर्व व्यवहार सांभाळणे शक्य होणार नाही, मला कोणी ही नाही, तुझ्याशिवाय. तेव्हा येथून पुढे तू पूर्ण दुकानाची जबाबदारी सांभाळायची. आजपासून तू दिवाणजी नसून, तू या दुकानाचा अर्धा मालक आहेस. " हे ऐकून मोहनला काय बोलावे हे सुचत नव्हते. मालकांनी सर्व काही व्यवहार कसे करायचे हे पूर्वीच शिकविले होते. आज त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे आणि मेहनतीचे फळ मिळाले होते. त्याने मालकाचे पाय धरले आणि म्हणाला, " मालक, तुमचे खूप उपकार आहेत, अजून उपकार करून माझ्या डोक्यावर भार टाकू नका, मला पेलवणार नाही." यावर मालक म्हणाला, " नाही मोहन, माझे काही उपकार नाहीत, खरं तर तुझेच माझ्यावर खूप उपकार आहेत. तुझा निर्णय मला आवडतो, तू खूप गुणी, संस्कारी आणि मेहनती मुलगा आहेस. माझ्या एका चुकीमुळे तुझा बा तुझ्यापासून दूर झाला. हे पाप मी कधीच भरू शकत नाही. या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मला एवढं पुण्याचे काम करू दे, नाही म्हणू नको" बोलताना मालकाचा कंठ दाटून आला होता.
तो आपल्या घरी आला आणि आईला ती बातमी सांगितली. आईला देखील भरून आले. ती म्हणाली, " मोहन, तुझी मुलगी लक्ष्मी आहे रे, ज्या लक्ष्मीला तू ठोकर मारली होतीस ती लक्ष्मी कोणत्या रूपात आली बघ, बाळा, लक्ष्मी आली घरा, हिचे नाव लक्ष्मीच ठेवू " सकाळी नाव ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि आईने मोहनच्या मुलीचे नाव लक्ष्मी ठेवले. सर्वाना खूप आनंद झाला. बारशाचा सोहळा आनंदात पार पडला. चंद्रकलेप्रमाणे लक्ष्मी हळूहळू मोठी होत होती. पूर्ण बंगला जणू आपलाच आहे या तोऱ्यात ती साऱ्या बंगल्यात फिरत होती. लक्ष्मीच्या पावलाने मालक आणि मालकीणबाई ही आनंदून गेल्या. लक्ष्मी त्या दोघांना आजी-आजोबा या नावाने हाक मारत होती. मोहनच्या आईला माय म्हणू लागली. सर्वांची ती लाडकी झाली होती. मोहनला आकाश ठेंगणे झाल्यासारखे भासत होते. आई-वडिलांचे संस्कार आणि शाळेतील शिक्षण मोहनच्या नसानसात भिनले होते. मला जे शिक्षण मिळू शकले नाही ते माझ्या लक्ष्मीला मिळवून देणार असा त्याने मनाशी निश्चय केला.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
6. लक्ष्मीचे शिक्षण
पहिली बेटी तूप रोटी असे पूर्वीचे लोकं म्हणत असत. लक्ष्मीचे चालणे, बोलणे आणि तिची प्रत्येक हालचाल सर्वांना आनंद देऊन जात होती. लक्ष्मी मोठी होऊ लागली तसे तिचे बुद्धीचातुर्य लक्षात येऊ लागले होते. आपल्या बापाप्रमाणे ती खूपच बुद्धिमान होती. कोणतीही गोष्ट एकदा सांगितली की ती लक्षात ठेवायची. योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरू लागली. मोहनवर जसे त्याच्या वडिलांचे संस्कार होते तसे लक्ष्मीवर तिच्या बाबाचे म्हणजे मोहनचे संस्कार होते. दिवसभर ती मायजवळ राहायची. माईने तिला अनेक गाणी , गोष्टी सांगायची. लक्ष्मीची आई कामात राहायची त्यामुळे ती जास्त तिच्याकडे जात नव्हती. सायंकाळी मोहन घरी आला की, लक्ष्मी त्याच्याकडे जायची. दिवसभराच्या गोष्टी ती मोहनला सांगायची. माईने सांगितलेल्या गोष्टी आणि गाणी म्हणून दाखवायची. रात्रीला मग आईच्या कुशीत झोपी जायची. लक्ष्मी अशी हळूहळू संस्काराच्या वातावरणात वाढू लागली होती. लक्ष्मीचे वय सहा वर्षे झाली होती. आता तिला शाळेत पाठविणे आवश्यक होते. मोहन समोर अनेक पर्याय होते कारण ग्रामीण भागात एकच जिल्हा परिषदेची सरकारी शाळा असते त्यामुळे तेथे विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र इथे शहरात अनेक शाळा असतात, सरकारी शाळेसोबत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर काही सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असतात. लक्ष्मीला कोणत्या शाळेत प्रवेश करावा ? हा प्रश्न त्याला गेल्या दोन दिवसापासून सतावीत होता. राधा म्हणत होती लक्ष्मीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकू तर मोहनला मराठी शाळा खुणावत होती.
त्याच्या कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रसिद्ध वक्त्याने भाषण दिलं होतं आणि ते भाषण मोहनच्या मनात भिनले होते. ते वक्ते म्हणाले होते, ' आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण द्या. त्यामागे खूप मोठं शास्त्रीय कारण आहे. मातृभाषा म्हणजे आईची भाषा. आईची भाषा मुलांना खूप लवकर समजते. शाळेत जाण्यापूर्वी त्याच्याजवळ मातृभाषेतील अनेक शब्दांचा संग्रह असतो, त्यामुळे शिक्षक काय बोलत आहे ? हे त्याला चटकन समजते. मातृभाषेतून शिक्षण घेताना घोकंपट्टी करण्याची गरज नसते. मुख्य म्हणजे मुलांना अभ्यासक्रम कळू शकते. पुस्तकाची भाषा आणि घरातली भाषा एकच असल्याने त्याला विषय समजून घेण्यात काही अडचण येत नाही. एकदा विषय समजला म्हणजे त्याचा पाया पक्का होतो. मग त्यावर चांगली इमारत उभी राहू शकते. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांचा खरा विकास साधायचा असेल तर त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या. ' त्या वक्त्याचे बोलणे मोहनला पटले होते. त्यामुळे लक्ष्मीला मराठी शाळेत टाकण्याचे त्याने जवळपास निश्चित केले होते. इतर मराठी शाळेपेक्षा जिल्हा परिषदची मराठी शाळा त्याला आवडली कारण घरापासून जवळ होती आणि तेथे शिकविणारे एक शिक्षक त्याचे मित्रच होते. मुलांना शाळेच्या बसने किंवा ऑटोमध्ये कोंबून पाठविणे त्याला आवडत नव्हते. म्हणून मोहनने लक्ष्मीचे नाव घराजवळच्या जिल्हा परिषद शाळेत टाकले. ती रोज सकाळी नटूनथटून शाळेला जाऊ लागली. शाळा पाचवीपर्यंत होती पण खूपच सुंदर होती. शाळेत अनेक झाडे होती. खूप मोठं मैदान होतं. जे शिक्षक होते ते खूपच प्रेमळ आणि मुलांचे लाड करणारे होते. लक्ष्मीने सर्वांचे मन जिंकले होते. शाळेची सुरुवात परिपाठाने व्हायची व शेवट पसायदान म्हणून. लक्ष्मीला शाळा खूपच आवडली. एकाच महिन्यात तिने शाळेतील राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, पसायदान तोंडपाठ करून टाकले. घरी आल्यावर ती आपल्या माईला सर्व म्हणून दाखवत असे. मोहनच्या मित्राने खरोखरच ती शाळा गेल्या चार वर्षांपासून नावारूपाला आणली होती. पूर्वी नुसता ती शाळा एक कोंडवाडा वाटत होती. पण भोसले सरांनी त्या शाळेचा कायापालट केला म्हणून तर 25-30 पटसंख्या असलेल्या त्या शाळेने आज शंभरी पार केली होती. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळावा म्हणून भोसले सरांनी वर्षभर अनेक उपक्रम राबविले त्यामुळे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार होऊ लागले.
राधाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लक्ष्मीला एक भाऊ मिळाला. त्याचे नाव ठेवले राजू. त्यावेळी लक्ष्मी पाचव्या वर्गात शिकत होती. दरवर्षी तिने चांगला अभ्यास करून वर्गात प्रथम येत होती. लक्ष्मी ही त्या शाळेची सर्वस्व होती. ती सर्वांना कामात मदत करायची, भोसले सरांची तर ती आवडती विद्यार्थिनी होती. शाळेतील संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर या सर्व बाबी तिला चालविता येत असत. शाळेतल्या छोट्या वर्गातील मुलांना ती अधूनमधून सांभाळायची. तिला जर कोणी विचारलं की तू पुढे चालून काय होणार ? तर ती अभिमानाने सांगायची " मी भोसले सरांप्रमाणे शिक्षिका होईन आणि सर्व लेकरांना शिकवेन". तिचे बोलणे ऐकून भोसले सर आणि तिथल्या सर्वांना तिचा अभिमान वाटे. भोसले सरांनी लक्ष्मीला शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेला बसविले. तिच्याकडून कसून सराव करून घेतला. मोहनचे देखील अधूनमधून तिच्या अभ्यासाकडे लक्ष असल्याचे. तिला काय हवं-नको ते भोसले सरांना विचारत असे. यावर्षी लक्ष्मीच्या रुपात शाळेला एक चांगली संधी मिळाली काही तरी करून दाखविण्याची म्हणून भोसले सर आणि त्यांचे सहकारी बरीच मेहनत घेत होते. परीक्षेचा दिवस उजाडला. पहिल्यांदा नवोदयची परीक्षा झाली आणि दहा दिवसांनी शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली. लक्ष्मीने दोन्ही पेपर उत्तमरीत्या सोडविले होते. तिला आता निकालाची प्रतीक्षा होती. मध्यंतरच्या सुट्टीच्या काळात ती तिचा लहान भाऊ राजू आणि आईसोबत मामाच्या गावी गेली. इथे मोहन आणि त्याची आई दोघेच होते.
त्यादिवशी सायंकाळी मोहन दुकान बंद करून घरी आला होता. रात्रीचे जेवण करून मोहन निवांत बसला होता. त्याचवेळी मालकांच्या घरातून रडण्याचा मोठा आवाज ऐकू आला म्हणून मोहन लगेच बंगल्याकडे पळाला. जाऊन पाहतो तर काय मालकाला एक झटका आला होता. मोहनने लगेच गाडी बोलावली. गाडीत टाकून मालकाला दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी मालकाला तपासलं आणि सॉरी एवढंच म्हटलं. मालकीणबाई धाय मोकलून रडू लागली. मोहनला थोडा वेळ पायाखालून जमीन सरकल्यासारखं वाटलं. पण वेळीच तो सावरला. आलेल्या गाडीतच मालकांना घेऊन तो बंगल्याकडे निघाला. हा हा म्हणता ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. त्यांच्या नातेवाईकांना ही निरोप देण्यात आले. मालकाच्या जवळचे तर कोणी नव्हते. शेवटी मोहनलाच त्यांचा मुलगा बनून सारे क्रियाक्रम पार करावे लागले. मालकाने कधीही मोहनला दूर केले नव्हते, आपल्या मुलांप्रमाणे त्याच्याशी वर्तन ठेवले. आज संपूर्ण शहर मोहन आणि त्याच्या मालकविषयी बोलत होते. प्रत्येकजण मोहनची स्तुती करतांना कंटाळत नव्हते. मालकाच्या मृत्यूने मोहनला खूप मोठा धक्का बसला होता. पूर्वीप्रमाणे दुकान देखील चालत नव्हते. कारण मोहनला कधी खोटे बोलणे जमतच नव्हते. तो प्रामाणिक आणि इमानदार होता. त्याला कोणाला फसवून धंदा करणे जमत नव्हते. त्यामुळे दिवसेंदिवस धंदा मंद होत चालला होता.
त्यातच कुठल्या तरी एका बँकेने दुकानावर जप्तीची नोटीस लावली. मालकाने या बँकेतून पन्नास लाख कर्ज घेतले असून त्याची भरपाई तीन दिवसात केली नाही तर दुकान घर सारे लिलाव करण्यात येईल असे त्या नोटीसमध्ये लिहिले होते. मोहन या नोटीसमुळे चक्रावून गेला. मालकाने याविषयी कधी काहीच बोलले नाही, मालकीणबाईला देखील हे विषय माहीत नव्हते. पण मोहनला कळले की, मालकाला एका व्यापारात नुकसान झाले, हे पैसे कसे भरू आता याच तणावात त्यांना झटका आला होता. दुकान आणि बंगला विकून मोहनने त्या बँकेचे पन्नास लाख रुपये भरून टाकले. ज्या घरात मोहन राहत होता त्या घरात आता मालकीणबाई येऊन राहू लागले. मोहन तेथून दुसरीकडे किरायाने घर घेऊन राहू लागला. मालक जाण्याने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सारेच रस्त्यावर आले. ज्या लोकांनी पूर्वी मोहनची स्तुती केली होती तेच आता मोहनला नावं ठेवू लागली. मोहननेच काही तरी घोळ केला असणार ? अशी चर्चा मोहनच्या कानावर आली की तो अस्वस्थ व्हायचा. हे असे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर फार बरं झालं असतं ! असं तो मनाशी म्हणत होता.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
7. लक्ष्मीची दहावीची परीक्षा
मालक वारल्याची बातमी तशी राधाला ही कळली होती. ती लक्ष्मी व राजुला घेऊन लगेच आपल्या घरी आली. तिलाही खूप मोठा धक्का बसला होता. त्याच शहरात एक किरायाची खोली घेऊन ते पाचजण राहू लागले. घरात जागा कमी आणि माणसं जास्त झाली होती. मोहनला आता यापुढे कोणते काम करावे हेच सुचत नव्हते. दुकानात काम करतांना त्याचा दिवस कसा जात होता ? हेच कळत नव्हतं तर आज दिवस कसा घालवावा ? हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. लक्ष्मी यावर्षी सहाव्या वर्गात जाणार होती, तिची पूर्वीची शाळा पाचव्या वर्गापर्यंतच होती. तिचे नाव कोणत्या शाळेत टाकावं ? खाजगी शाळेत टाकावं तर भरपूर फीस भरावे लागणार, तेवढा पैसा त्याच्याजवळ उपलब्ध नव्हता. मालकाच्या मृत्यूपूर्वी त्याने शेताजवळची जमीन विक्रीस निघाली असता सर्व जमापुंजी एकत्र करून शेती विकत घेतली होती. त्यामुळे आता त्याच्याजवळ एकही रूपया शिल्लक उरला नव्हता. येता-जाता त्याच्या कानावर मालकाच्या मृत्यूबाबतचे बोलणे ऐकू येत होते त्यामुळे तो अस्वस्थ होत होता आणि कधी एकदा शहर सोडतो असे त्याला झाले होते. पण शहर सोडून करावं काय ? कुठं जावं ? हे प्रश्न त्याच्या मनाला खात होते. शिवाय लक्ष्मीच्या शिक्षणाचा देखील प्रश्न होताच.
एके दिवशी सकाळी सकाळी भोसले सर मोहनच्या घरी आले व म्हणाले, " मोहन, अरे अभिनंदन तुझं" मोहन म्हणाला, " अरे, माझं अभिनंदन कसं काय ?" यावर भोसले सर आनंदात म्हणाले, " अरे, तुझी लक्ष्मी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आली आणि नवोदय विद्यालयात तिची निवड झाली." हे ऐकून मोहनला देखील खूपच आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. मोहनने भोसले सरांना बसायला सांगून राधाला चहा करण्यास सांगितला. ती बातमी ऐकून लक्ष्मीला खूप आनंद झाला. माईने तर तिच्या गालावरून हात फिरवत कडकड बोटं मोडली " माझी गुणाची लेकरू " अशी ती बोलली. भोसले सर आणि मोहन काही वेळ गप्पा मारत बसले होते. नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी काय काय लागते याची संपूर्ण माहिती भोसले सरांनी मोहनला दिली. काही दिवसांत आपण लक्ष्मीला घेऊन नवोदय विद्यालयात जाऊ असे सांगून भोसले सर निघून गेले. मोहनच्या चेहऱ्यावर आज आनंद झळकत होता. नवोदय विद्यालयात शिक्षण घेण्याचे महत्व त्याला चांगलेच ठाऊक होते. त्याने देखील पाचव्या वर्गात शिकत असताना ही परीक्षा दिली होती, मात्र त्यात त्याला यश मिळाले नव्हते. लक्ष्मीच्या शिक्षणाची सोय झाली म्हणून तो चिंतामुक्त झाला होता. त्याचवेळी त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि तो आईला म्हणाला, " आई, हे शहर आपण सोडून देऊ आणि परत गावाकडे राहायला जाऊ " यावर आईला थोडं आश्चर्य वाटलं, ती म्हणाली, " बाळा, गावाकडे जाऊन काय करणार आहेस ? तिथं कोणतं काम मिळणार तुला ? " यावर मोहन मोठ्या निर्धाराने म्हणाला, " गावाकडे आपण शेती करू या, लक्ष्मीसाठी शहरात राहण्याचा विचार करत होतो, पण आता लक्ष्मी जाणार नवोदय विद्यालयात, तेव्हा आपण इथं राहण्यापेक्षा गावी राहू या. म्हणजे घरखर्च ही वाचेल आणि शेतात काम करून जगता येईल." मोहनचे हे बोलणे ऐकून आईने होकार दिला. मोहनने एकवार राधाकडे पाहिलं, या निर्णयामुळे ती जरा उदास दिसत होती. मात्र लगेच तिनेही होकार दिला.
दहा-पंधरा दिवसांनी लक्ष्मीला घेऊन मोहन आणि भोसले सर नवोदय विद्यालयात पोहोचले. तेथील प्राचार्यांनी लक्ष्मीचे, तिच्या वडिलांचे आणि भोसले सरांचे मनःपूर्वक स्वागत केले. कारण लक्ष्मी ही जिल्ह्यातून पहिली आलेली विद्यार्थिनी होती. अर्थातच लक्ष्मीला घडविण्यात भोसले सरांचा सिंहाचा वाटा होता. लक्ष्मीला विद्यालयात सोडून जाताना मोहनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते पण त्याने लक्ष्मीला काही एक न कळू देता, तेथून निघाला. लक्ष्मीला विद्यालयात सोडून आल्यानंतर मोहनने सामानाची बांधाबांध केली, एकवेळ मालकीणबाईला भेटून आला व परत गावी जात आहे, असे सांगून मोहन, त्याची आई, बायको राधा आणि मुलगा राजू हे चौघे शिरपूर गावात परत आले.
मोहन प्रामाणिक, कष्टाळू आणि इमानदार व्यक्ती आहे, हे गावकऱ्यांना माहीत होते त्यामुळे शहरातले ते बोलणे त्याला गावात ऐकू आले नाही. शेजारच्या लोकांनी त्याला घराची डागडुजी करण्यासाठी मदत केली. ऐन पेरणीच्या दिवसांत मोहन आपल्या गावी आला होता. त्याच्याजवळ आता पाच एकर शेती होती. पण बियाणे खरेदी करण्यासाठी फुटीकवडी नव्हती. काय करावं ? हा प्रश्न त्याच्यासमोर पडला होता. अशा कठीण प्रसंगी त्याचा जिवलग मित्र ज्याने गावात दुकान टाकून आपला संसार सांभाळत होता, त्या संजूने त्याला मदत केली. बियाणे व कीटकनाशकांसाठी लागणारी रक्कम त्याने उधार म्हणून दिले. संजूचे मनोमन आभार मानून मोहनने शेतात पेरणी करून घेतली.
मोहन आणि राधा रोज शेतात जाऊ लागले आणि शेतातली कामे मोठ्या आनंदाने करत होती. आई राजुला सांभाळत घरीच राहत होती. सायंकाळी ते दोघे घरी येईपर्यंत आई जमेल ते काम करून स्वयंपाक करून ठेवत असे आणि रात्रीला सारेजण एकत्र बसून जेवण करत. महिन्यातून एकदा लक्ष्मीचं पत्र येत असे. मोहन देखील तिला पत्र लिहून ख्याली खुशाली कळवत असे. शेतीच्या उत्पन्नामधून मोहनला चांगले पैसे मिळाले. त्याची आर्थिक स्थिती चांगली झाली. संजूकडून उधार घेतलेले पैसे त्याला परत दिल्यावर देखील बरीच रक्कम त्याच्याकडे शिल्लक होती. त्यातून त्याने आईला एक नऊवारी साडी, बायकोला सहावारी साडी, राजूला छानसा ड्रेस आणि लक्ष्मीसाठी सुंदर ड्रेस खरेदी करून आणला. सर्वजण आनंदात व मजेत राहू लागले.
भिंतीवरील कॅलेंडर बदलत गेले तसे मोहनचे दिवस देखील बदलत गेले. सर्व काही सुरळीत चालू होते. राजूला गावातल्या सरकारी शाळेत प्रवेश दिला. त्याच वर्षी लक्ष्मीचं दहावीचं वर्ष होतं. नवोदय विद्यालयात लक्ष्मीने चांगला अभ्यास करून नाव कमावलं होतं. प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यामुळे तिच्या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या होत्या. पहिले वर्ष तिला जरा कठीण गेलं. कारण तिथलं शिक्षण इंग्रजीतून होते. तरी ती मुळात हुशार आणि मेहनती मुलगी होती. त्यामुळे तिथला अभ्यास देखील मन लावून करत राहिली. दहावीची परीक्षा जवळ येऊ लागली तसा मोहनच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. तो दहावीला असतांना परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशी वाईट घटना घडली. त्याचा बा त्याच दिवशी त्याला सोडून गेला होता, त्याची त्याला वारंवार आठवण येत होती, लक्ष्मीच्या जीवनात असे काही विपरित घडू नये, याची तो मनातल्या मनात देवाजवळ प्रार्थना करत होता. माझ्या माघारी लक्ष्मीचे शिक्षण पूर्ण होणार नाही आणि तिला अधिकारी बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहील, अशी काळजी त्याला वाटत होते. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. लक्ष्मीचा पहिला पेपर संपला आणि घरात अप्रिय असे काही घडले नाही, हे पाहून तो मनोमन आनंदी झाला.
लक्ष्मीची दहावीची परीक्षा संपली आणि ती आपल्या गावी परत आली. तिने सर्वच पेपर्स उत्तम प्रकारे सोडविले होते. त्यामुळे ती खूप आनंदात होती. काही दिवसांनी दहावीचा निकाल लागला आणि लक्ष्मी 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. परत एकदा लक्ष्मीच्या पुढील शिक्षणाची चिंता मोहनला लागली होती. शहरातल्या चांगल्या कॉलेजात लक्ष्मीला प्रवेश द्यायचा, तिला खूप शिकवायचे असे मनाशी ठरवून मोहन पुढील कामाला लागला.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
8. शेतीपेक्षा शिक्षण महत्वाचे
लक्ष्मीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मोहन शहरात आला. पहिल्यांदा त्याने भोसले सरांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करून शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित झालं. कॉलेजचा प्रश्न सुटला पण लक्ष्मीचा राहण्याचा आणि जेवण्याचा प्रश्न अजून सुटला नव्हता. भोसले सरांनी शहरात मुलींसाठी एक चांगले वसतिगृह असल्याचे सांगितले. काही वेळानंतर तिघेजण कॉलेजामध्ये गेले आणि लक्ष्मीची अकरावी सायन्समधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तेथून ते त्यांनी मुलींच्या वसतिगृहाकडे गेले. तेथे सर्व विचारपूस केल्यावर मोहनला ते वसतिगृह लक्ष्मीसाठी योग्य वाटले. लक्ष्मी तेथे अगदी सुखरूप आणि सुरक्षित राहणार याची खात्री पटल्यावर तिचे नाव तेथील वसतिगृहात टाकण्यात आले. एकट्या मुलीला शहरात ठेवणे कोणत्याही पालकांसाठी एक काळजीचा विषय असतो, तसा मोहनचा देखील होता. लक्ष्मीला लागणारे वह्या, पुस्तके व इतर साहित्य खरेदी करून सायंकाळी ते दोघे घरी परतले. लक्ष्मीताईचे सर्व खरेदी केलेले साहित्य पाहून तिचा भाऊ राजू मोठ्याने रडू लागला. मलाही पाहिजे म्हणून हट्ट धरू लागला. राधाने कसे बसे त्याला समजावून गप्प केले. रात्रीचे जेवण उरकले, मोहन आपल्या जागेवर झोपण्यासाठी आडवा झाला. बराच वेळ झाला तरी त्याला झोप लागत नव्हती. त्याच्यासमोर लक्ष्मीच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून गोळा करायचा ? हा प्रश्न पडला होता. कॉलेजची फीस, वसतिगृहाची रक्कम आणि खाजगी ट्युशनवाल्याची फीस हे सारं म्हटलं तरी दीड-दोन लाख तरी लागणार होते. उच्च शिक्षण घेणे हे गरिबांसाठी किती कठीण बाब आहे, याची त्याला जाणीव होऊ लागली. मी भरपूर कष्ट करेन आणि लक्ष्मीचं शिक्षण पूर्ण करेन, तिला कोणतीही समस्या येऊ देणार नाही असा निर्धार करून त्याच विचारात तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीने आपल्या सामानाची बांधाबांध केली. आजोबांच्या फोटोला नमन केले. माईला दंडवत केले. आई-बाबाच्या चरणाला स्पर्श केला. भाऊ राजूचा गोड पापा घेतला आणि आपल्या मार्गाला लागली. ती दूरवर जाईपर्यंत माय, आई आणि राजू तिला पाहत होते. ती डोळ्यासमोरून दिसेनाशी झाली तेव्हा ते घरात परत आले. मोहनने तिला वसतिगृहात सोडले आणि आपल्या गावाकडे परत आला. त्यादिवशी मोहनला रात्रभर झोप लागली नाही. सतत त्याला लक्ष्मीचा चेहरा दृष्टीस पडत होता. पैशाची काही तरी सोय लावावीच लागेल. काय करता येईल ? या विचारात त्याला त्याचा मित्र संजूचं आठवण आली. सकाळी उठल्यावर त्याने संजूचे घर गाठलं. त्याला सर्व कहाणी सांगितली. एखादे लाख रुपयांची मदत करण्याची विनंती त्याला केली. रक्कम जास्त आहे आणि पुन्हा त्याचा व्यवहाराचा प्रश्न असल्याने त्याने एका अटीवर पैसे देण्याचे कबुल केले. एका वर्षासाठी त्याची शेती संजूला द्यायची या करारावर दोघे सहमत झाले. मोहनला पैसे मिळाले म्हणून त्याची काळजी मिटली होती. आईला ही गोष्ट कळल्यावर आई मोहनला म्हणाली, " त्याला शेती देऊन, तू काय करणार आहेस ?" यावर मोहन म्हणाला, " बघू काय करता येईल ते" असे म्हणून मोहन शहराकडे जाण्यास निघाला. कॉलेज आणि वसतिगृहाची फीस भरून टाकली आणि आता तो निश्चित झाला. लक्ष्मीच्या शिक्षणाची काळजी मिटली याचा त्याला आनंद झाला होता.
आता त्याच्याजवळ शेती नव्हती तर कोणते काम करावे ? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याने आपल्याच शेतात मजुरी करण्याचा निर्धार केला. आपला मित्र संजूला भेटून शेतातच काम करू देण्याची विनंती केली. संजूने लगेच ती मान्यही केली. मोहन आपल्याच शेतात एका मजुरासारखे काम करू लागला, राधा देखील त्याच्यासोबत काम करू लागली. या कामामुळे रोजच्या जेवण्याचा प्रश्न मिटत होता, त्यातच मोहन समाधानी होता. दुसऱ्या वर्षी देखील मोहनने पहिल्यासारखंच संजूला एक वर्षासाठी शेती दिली आणि मिळालेली रक्कम लक्ष्मीच्या शिक्षणासाठी खर्च केली. गावातील काही लोकं त्याच्या वागणुकीवर टीका करत होती. शेत गहाण ठेवून मुलीला एवढं शिकवून याला काय मिळणार, मुलगी तर परक्याचे धन आहे, ती उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार, पुन्हा लग्न करून देतांना हुंडा द्यावा लागतोच की, मग एवढं शिकवण्यापेक्षा लग्न लावून दिलं तर एक काळजी तरी मिटेल. अशा अनेक चर्चेच्या गोष्टी त्याच्या कानावर येत होते. मात्र तो कोणत्याच गोष्टीकडे जास्त लक्ष न देता, आपल्या कामावर लक्ष देत असे. पाहता पाहता दोन वर्षे संपली. लक्ष्मी बारावीची परीक्षा देऊन घरी आली. राजूने आठवीची परीक्षा दिली होती.
उन्हाळ्याचे दिवस होते. सारेजण शेतात गेले होते. शेतातील आंब्याच्या झाडावरील आंब्याचा सुगंध सुटला होता. लक्ष्मीला आंबे खाण्याचा मोह झाला. तशी ती धावतच आंब्याच्या झाडाकडे पळाली तेव्हा राजूने तिला अडवलं आणि म्हणाला, " दीदी, हा आता आपला आंबा नाही. हा तर संजू काकांचा आहे" यावर लक्ष्मी म्हणाली, " ते कसे काय, बाबांनी काय हे झाड विकले आहे का ? " त्यावर राजू म्हणाला, " मला माहित नाही, पण बाबा म्हणत होते की, आंब्याच्या झाडाकडे कोणी जाऊ नका, तो आता संजू काकांचा आहे म्हणून" लक्ष्मी धावतच मोहनकडे आली आणि म्हणाली, " बाबा, राजू काय म्हणतो, ते आंब्याचे झाड आपले नाही." यावर मोहन म्हणाला, " होय बाळा, ते आता संजू काकांचे आहे, एका वर्षासाठी आपण त्यांना शेत दिले आहे ना ?" लक्ष्मी नाराज होऊन म्हणाली, " शेत दिलं म्हणून काय झालं ? ते झाड देखील त्याचं होते का ?" हे सारं संजू दूरवरून ऐकत होता. त्याला राहवलं नाही, तो जवळ आला आणि म्हणाला," लक्ष्मी तुझं बरोबर आहे, मी फक्त तुमची शेती घेतली कसायला, ते आंब्याचे झाड तुमचंच आहे, जा मनसोक्त आंबे खा" असे म्हणताच राजू आणि लक्ष्मी आंब्याच्या झाडाकडे पळाले. पुढील महिन्यात त्यांचा शेतीचा करार संपणार होता.परत शेती देण्याचा विचार आहे का ? म्हणून संजूने मोहनला विचारले तेव्हा बारावीचा निकाल लागल्यावर पुढील विचार बघू असे मोहन म्हणाला. राजू आणि लक्ष्मीने पाडाला आलेली आंबे एका कापडात बांधून आणली. शेतात एक मोठे कडूलिंबाचे झाड होते, त्या झाडाखाली बसून सर्वांनी दुपारचे जेवण केले आणि सायंकाळी घरी आले.
दिवसामागून दिवस जात होते. लक्ष्मीला निकालाची काळजी लागली होती. निकाल काय लागेल यावर तिचं पुढील शिक्षण अवलंबून होतं. मोहनची ईच्छा होती की लक्ष्मीने डॉक्टर व्हावे, कारण तिच्यात ती गुणवत्ता होती. भोसले सर देखील म्हणायचे की, लक्ष्मी नक्की डॉक्टर होईल. लक्ष्मीला स्वतःला मात्र कधीच डॉक्टर व्हावे असे वाटत नव्हते. कारण ती काल परवा जेव्हा शेतात गेली तेव्हा तिला कळले की, आपल्या शिक्षणासाठी आई-बाबाने स्वतःच्या शेतात मजुरी केली. स्वतःच्या झाडाची आंबे खाता आले नाही. याची सल तिच्या मनाला बोचत होती. बारावीनंतरच्या वैद्यकीय किंवा अन्य कोणत्याही शिक्षणाला अजून खूप खर्च येणार होता. हा खर्च आपल्या बाबांना नक्की झेपणार नाही. त्यामुळे त्यांना शेती आता गहाण देऊन चालणार नाही तर विकावी लागणार, हे मात्र नक्की. शेती विकली तर काम कोठे करणार आणि पोटं कशी भरणार ? ती या विचाराने चिंताग्रस्त झाली होती पण तसे कोणाला जाणवू दिले नाही. ती देवाला मनोमन प्रार्थना करू लागली की देवा मला कमी मार्क पडू दे म्हणजे मी घरी राहून एखादा अभ्यासक्रम पूर्ण करू शकेन. मला जास्त मार्क पडले तर मी बाबांचा विरोध करू शकणार नाही आणि बाबांना होणारा त्रास मला पाहवत नाही. देवा एवढी कृपा कर असे ती देवाकडे रोज प्रार्थना करू लागली. परीक्षेचा निकाल कधी लागतो याचीच काळजी दोघांनाही लागली होती.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
9. लक्ष्मीची जिद्द
उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल लागणार ही बातमी ऐकल्यापासून लक्ष्मी खूपच बेचैन होती. किती मार्क मिळतील ? नव्वद टक्केच्या वर मिळाले तर मेडिकलला जावेच लागेल, नव्वद टक्केच्या खाली मिळाले तर दुसरा पर्याय विचार करता येईल. लक्ष्मीने पक्का निर्धार केला होता की, काही झाले तरी मेडिकलला जायचे नाही. ती रात्रभर त्याच विचारात झोपी गेली. त्याच विचारात गुंग असल्याने रात्री तिला रक स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिलं की, बारावीच्या परीक्षेत तिला 95 टक्के गुण मिळाले त्यामुळे तिच्या बाबांनी तिला मेडिकलला पाठविण्याचा विचार केला. मेडिकलसाठी पहिल्याच वर्षी पाच ते सहा लाख रुपये लागणार होते. त्यासाठी मोहनने आपली एक एकर शेत विक्रीस काढली. परत दुसऱ्या वर्षी एक एकर असे करत करत मोहनने लक्ष्मीच्या मेडिकल शिक्षणासाठी सर्व जमीन विकून टाकली. आता त्याच्याकडे एक गुंठा जमीन ही शिल्लक नव्हती. आई-बाबा आणि राजू मोलमजुरी करून जीवन जगू लागल्याचे चित्र तिला दिसू लागले. हे पाहून लक्ष्मी खडबडून जागी झाली. तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. पहाटेची स्वप्न खरी होतात असे कुणी तरी तिला म्हटल्याचे लक्षात आले होते.
निकाल ऐकण्यासाठी ती खूपच बेचैन झाली होती. शेवटी एकदाचे दुपारचे एक वाजले आणि लक्ष्मीचा निकाल समजला. तिला 87 टक्के मार्क पडले होते. तिला खूप आनंद झाला पण मोहन उदास झाला. लक्ष्मीला डॉक्टर करावं असे त्याचे स्वप्न होते पण या मार्कावर तिला कोणत्याच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नव्हता. लक्ष्मी मात्र मिळालेल्या मार्कावर खूपच खुश होती. रात्री जेवताना पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं यावर चर्चा झाली. तेव्हा लक्ष्मीने तिचा पर्याय समोर ठेवला, ती म्हणाली " मी पदवी शिकणार आणि इंग्रजी विषयातून " यावर मोहन काहीच उत्तर दिला नाही. मेडिकल नाही तर इंजिनिअरिंग तरी कर याविषयावर यापूर्वी देखील खूप चर्चा झाली पण लक्ष्मीने इंजिनिअरिंग करण्यास स्पष्ट नकार दिला. माझ्या शिक्षणाचा यापुढे आई-बाबांना कसलेच भार नको म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोहन निरुत्तर झाला. पदवीच्या शिक्षणासाठी जास्त खर्च येणारच नव्हता म्हणून यावर्षी मोहनने शेती कुणाला गहाण दिली नाही. लक्ष्मीने भोसले सरांच्या मदतीने शहरातल्या चांगल्या महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश मिळविला. तिला रोज कॉलेजला येणे शक्य नाही, त्याची रीतसर परवानगी कॉलेजच्या प्राचार्याकडून घेतली आणि घरी बसून अभ्यास करण्याचा निश्चय केला. लक्ष्मीला अभ्यास करण्यासाठी खूप वेळ मिळू लागला. अभ्यासासोबत आपण अजून काही तरी काम करावं म्हणून तिने राजू आणि त्यांच्या मित्राला इंग्रजी विषयाचे शिकवणी घेण्याचे ठरविले. त्याच्या सोबतचे अनेक मित्र ज्यांना इंग्रजी विषयाची भीती वाटत होती असे 15-20 मुले-मुली शिकवणीला येऊ लागली. बघता बघता तिची शिकवणी गावात खूपच प्रसिद्ध झाली. लक्ष्मी मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली नाही, ती जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तिचं प्राथमिक शिक्षण झालं तरी तिचा इंग्रजी विषयावर प्रभुत्व खूप छान होते.
नवोदय विद्यालयात माध्यमिक वर्गात शिकतांना पाटील सर नावाचे इंग्रजी शिक्षक लाभले ज्यांनी लक्ष्मीची इंग्रजी विषय परिपक्व केले. पाटील सरामुळे तिची इंग्रजी सुधारली असे म्हटले तरी चुकीचे ठरत नाही. माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग, घटना किंवा व्यक्ती येतात ज्याच्यामुळे आपले जीवन वेगळे वळण घेते. गावातील बरेच पालक लक्ष्मीला इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यास विनंती करू लागले. आई-बाबा कामासाठी शेताला जात असत, राजू शाळेला आणि लक्ष्मी आपल्या मायसोबत घरी राहायची. तिने ही विचार केला की, आपला वेळ व्यतित होण्यासाठी शिकवणी घेणे हा चांगला पर्याय आहे, शिवाय चार पैसे देखील मिळतील. लगेच तिने सर्वांसाठी शिकवणी वर्ग सुरुवात केली. तिच्या शिकवणीला आता 15-20 च्या जागी जवळपास 50-60 मुले-मुली येऊ लागल्या. शिकवणी वर्ग घेताना मूळ अभ्यासाकडे तिने दुर्लक्ष केले नाही. राजू दहावीच्या परीक्षेत चांगले 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. तिच्या शिकवणीचा फायदा राजुला, त्याच्या मित्राला तर झालाच शिवाय गावातील शाळेचा निकाल ही उंचावला. म्हणून गावकऱ्यांनी तिचा सत्कार करण्याचे ठरविले. पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी गावातल्या शाळेत लक्ष्मीचा सत्कार ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला भोसले सरांना आवर्जून बोलाविण्यात आले होते. व्यासपीठावर अनेक मंडळी बसली होती, त्यात आपल्या बाबाला पाहून लक्ष्मीचा उर भरून आला. गावातील सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, शाळेचे मुख्याध्यापक, गुरुजन सर्वांनी तिचा टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आणि सन्मान केला. संपूर्ण गावाला लक्ष्मीचा अभिमान वाटत होता.
ती भाषणात म्हणाली, " खरं तर मी काहीच असे मोठे काम केलं नाही, माझ्याजवळ असलेलं ज्ञान मी इतरांना दिले. खरा सन्मान माझ्या भोसले गुरुजींचा करावं, ज्यांच्यामुळे मी घडले, त्यांनी मला लहानपणी अनेक गोष्टी शिकविल्या ज्यामुळे मी असे घडले. हा सन्मान माझा नसून माझ्या बाबांचा आहे. त्यांनी माझ्या शिक्षणात कुठेच अडचण येऊ दिली नाही. स्वतःच्या शेतात मोलमजुरी केली पण मला शिकवलं. नाही तर आजकाल मुलींचे शिक्षण म्हणजे गावात जेवढ्या वर्गापर्यंत शाळा तेवढंच त्यांचं शिक्षण. पण माझ्या बाबांनी मला खूप शिकवलं, त्यांची ईच्छा होती की मी डॉक्टर व्हावे पण माझी ईच्छा आहे की मी शिक्षिका व्हावं. भोसले सरांना मी लहान असतांना माझं स्वप्न सांगितले होते की मी शिक्षिका होणार आणि गोरगरीब मुलांना शिकवणार " तिच्या भाषणावर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. मोहनच्या चेहऱ्यावर आनंद झळकलेला दिसून येत होता. भोसले सर देखील लक्ष्मीच्या भाषणाने खूप आनंदी झाले. लक्ष्मीने खूप अभ्यास करून पदवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. शिकवणी वर्ग घेत असल्याने लक्ष्मीजवळ बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते.
तिने बी. एड.ला प्रवेश मिळविला. एक वर्षाचा अभ्यासक्रम बघता बघता संपला. इकडे राजू बारावी सायन्समधून 95 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. राजूला मेडिकलला पाठवावे ही लक्ष्मीची मनोमन ईच्छा होती. पण आर्थिक प्रश्न त्यांना सतावत होता. मोहनने आपली एक एकर शेती विकण्याचा निश्चय केला. त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. लक्ष्मीजवळ देखील तेवढी मोठी रक्कम नव्हती. खरंच गरिबी माणसाला चहूबाजूनी विळख्यात घेते. अशा वेळी काय करावं हेच सुचत नाही. अखेर राजूचे मेडिकलमध्ये प्रवेश निश्चित झाले. लक्ष्मी आपली शिकवणी चालूच ठेवली होती. वर्तमानपत्र वाचतांना तिला एका शाळेची जाहिरात दृष्टीस पडली. इंग्रजी शिक्षक पाहिजे म्हणून ती जाहिरात होती. प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे म्हणून ती मुलाखतीला गेली. मुलाखत घेणाऱ्यांनी लक्ष्मीचे कागदपत्रे व गुणपत्रक पाहून हैराण झाले. सर्वच विषयात टॉपर असलेली ही मुलगी एक शिक्षिका म्हणून काम करू इच्छिते आहे. त्या शाळेच्या टीमने तिची विनाअट निवड केली आणि दुसऱ्याच दिवशी शाळेवर हजर होण्याचे सुचविले.
लक्ष्मीला काय आनंद झाला ! तिने तात्काळ आपले घर गाठले आणि आई-बाबा, माईच्या चरणी साष्टांग दंडवत टाकून गोड बातमी दिली. माईने मोहनच्या बाबाच्या फोटोसमोर साखर ठेवली आणि लक्ष्मीचे तोंड गोड केली. तिने आपल्या जिद्दीच्या बळावर शिक्षिकेची नोकरी मिळवली. महिन्याकाठी तिला चांगला पगार मिळू लागला त्यामुळे मोहनची आर्थिक चिंता मिटली. राजुचे मेडिकल शिक्षण पूर्ण होईल याचा विश्वास लक्ष्मीच्या मनात निर्माण झाला. एके दिवशी माय लक्ष्मीला जवळ बोलावून म्हणाली, " लक्ष्मी, शिक्षण झालं, नोकरी मिळाली, आता लग्नाचं तेवढं बघ " यावर लक्ष्मी म्हणाली, " माई, लग्नाची काय घाई करतेस, राजू डॉक्टर होऊ दे मग लगीन करेन " यावर माय म्हणाली, " हाय रे देवा, तोवर किती वय होईल तुझं, त्या वयाचा पोरगं तरी भेटायला हवं" लक्ष्मीने हसत हसत उत्तर दिलं, " भेटेल मग माय, तू कशाला काळजी करतेस ? " असे म्हणून लक्ष्मी निघून गेली. लक्ष्मीला नवरा कसा मिळेल ? या विचारात माय गढून गेली.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
10. त्यागमूर्ती लक्ष्मी
माईने लक्ष्मीच्या लग्नाचा विषय मोहनजवळ देखील काढला. मोहनने ते सर्व लक्ष्मीच्या मनावर ठेवलं होतं. कारण मोहनला माहीत होतं की, लक्ष्मी अशी ऐकायची नाही, तिला नोकरी करत करत अजून शिकायचं होतं. म्हणून तिने पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश देखील घेतला होता. आपली शाळा करत ती पुढील शिक्षणाचा अभ्यास ही करत होती. राजू मेडिकलच्या शिक्षणासाठी दूर गावी होता. दर महिन्याला ती राजूला पैसे पाठवत होती. मोहन आणि राधा आपल्या शेतीकामात व्यस्त होते. माय एकटी घरात रामनामाचा जप करत बसून राही त्याशिवाय तिच्याकडे अन्य कोणता पर्यायच नव्हता. ती घर सांभाळण्यासाठीच शिल्लक राहिली आहे जणू असे तिला कधी कधी वाटायचे. पण करणार तरी काय ? शेतात जाऊन काम करण्याची तिच्यात आता शक्ती उरली नव्हती. इकडे लक्ष्मीच्या शाळेत माधव नावाचे एक शिक्षक होते जे की दोन वर्षांपूर्वी त्या शाळेत रुजू झाले होते. तो दिसायला सुंदर, हुशार आणि अविवाहित होता. काही दिवसांत लक्ष्मीची आणि माधवची छान गट्टी जमली. माधवदेखील गरीब कुटुंबातला होता. तो आपल्या आई वडिलांसोबत त्याच शहरात राहत होता. लक्ष्मी त्या शाळेत रुजू झाल्यापासून तो लक्ष्मीचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याच्याकडे काही महत्वपूर्ण नोट्स असल्याचे कळल्यावर लक्ष्मी त्यांच्याकडे त्या नोट्सची मागणी करायला गेली. तो खरोखरच खूप हुशार होता हे त्याच्या नोट्सवरून लक्ष्मीला लक्षात आले. त्याच्या नोट्सचा फायदा तिला झाला ती चांगल्या प्रकारे पास झाली. म्हणून तिने माधवचे मनस्वी आभार मानले. नोट्स देवाणघेवाणीत त्यांचे दोघांचे एकमेकांवर कधी प्रेम जडले हे दोघांनाही कळले नाही. संपूर्ण शाळेत त्यांच्या प्रेमाची चर्चा चालू झाली होती. समाजात वाईट संदेश जाण्यापेक्षा आपण लग्न करू या असा प्रस्ताव माधवने लक्ष्मीसमोर ठेवले. पण लक्ष्मीला लगेच होकार देता येणे शक्य नव्हते. कारण तिच्यावर राजुच्या मेडिकलच्या शिक्षणाची जबाबदारी होती. तो शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू या असे लक्ष्मीने माधवला सांगून ठेवले. तिच्या शिक्षणामुळे एक फायदा झाला की, तिला ज्युनियर कॉलेजवर नेमणूक मिळाली. पगार देखील वाढला.
लक्ष्मीने माधव विषयी आपल्या घरी सांगून ठेवली होती त्यामुळे राजुचे मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यावर घरात लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. मुलगी पाहण्याचा औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला. माधवचे आई-वडील सुशिक्षित होते. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता लक्ष्मीला पसंत केले. काही दिवसांनी लक्ष्मीचे धुमधडाक्यात लग्न झाले. या लग्नात सारेच सगेसोयरे , नातलग, मित्रमंडळी, लक्ष्मीला शिकवलेले गुरुजन वर्ग साऱ्यांची उपस्थिती होती. लक्ष्मी आपल्या सासरी आली. तिकडे राजू आपले मेडिकल शिक्षण पूर्ण करून घरी आला होता. सर्व काही आनंदात चालू होते. हा आनंद देवाला पाहवेना म्हणून की काय एके दिवशी रात्री झोपेतच मोहनची आई देवाघरी गेली. त्यादिवशी लक्ष्मी माईची आठवण करत खुप रडली. खरं तर माय हीच तिची पहिली गुरू होती. तिने लक्ष्मीला अनेक संस्कार दिले. ती होती अडाणी, पण खूप समंजसपणाच्या गोष्टी सांगायची, तिनेच लक्ष्मीला लहानाचे मोठे केले होते. दोघींचे एकमेकांवर अपार प्रेम होते. तिच्या जाण्याने लक्ष्मीच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती. आठवडाभर राहून दुःखी मनाने ती परत आपल्या सासरी गेली. काही दिवस ती अस्वस्थ होती. तिचे कुठेही मन लागत नव्हते. एके दिवशी लक्ष्मीला खूपच अस्वस्थ वाटू लागले म्हणून माधवने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सर्व तपासणी केली आणि लक्ष्मी आई होणार असल्याची गोड बातमी दिली. ही बातमी ऐकून लक्ष्मी जरा सुखावली, आनंदी झाली.
दिवसामागून दिवस जात होते. राजूला देखील मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी लागली होती. तो ज्या दवाखान्यात काम करत होता त्याच दवाखान्यात लक्ष्मीने एका गोंडस व गुटगुटीत मुलीला जन्म दिला होता. मुलगी जन्मली हे पाहून लक्ष्मीला खूप आनंद झाला, ती मनातल्या मनात माझी माय माझी मुलगी बनून आली असे म्हणू लागली. राजूला देखील मामा झाल्याचा आनंद झाला होता. मोहन आणि राधा आजी-आजोबा बनले होते. सर्वजण आनंदात होते मात्र लक्ष्मीची सासू नाराज होती. तिला पहिला नात हवा होता. तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण ही नाराजी जास्त काळ टिकली नाही. सारेच आनंदात आहेत तर आपण एकटे नाराज राहून कसे चालणार ? हळूहळू ती देखील या नवजात मुलीचे स्वागत केली.
घरात राजुच्या लग्नाविषयी चर्चा चालू झाली होती. त्याचे ही आत्ता लग्नाचे वय झाले होते. त्याला एक सुंदर स्थळ आलं, मुलगी डॉक्टर होती. सर्वाना मुलगी पसंत आली. थोड्याच दिवसांत राजुचे लग्न झाले. मोहनचे पदवीपर्यंत शिक्षण झाले तर राधा दहावी उत्तीर्ण होती. त्यांच्या घरात डॉक्टरबाई सून म्हणून आली होती. ती जरी खूप शिकलेली होती तरी ती सुशील होती. राजुच्या दवाखान्यातच ती डॉक्टर म्हणून काम पाहत होती. रोज सकाळी ते दोघे दवाखान्यात जात असत आणि सायंकाळी परत येत असत. मोहनने त्या दोघांना शहरात राहण्याचे सुचवले होते मात्र दोघांनीही शहरात राहण्यास नकार दिला.
एका सामाजिक संस्थेला मोहनच्या कुटुंबाची सर्व कहाणी कळली होती. तेंव्हा त्या दोघांची आदर्श आई-वडील म्हणून निवड झाल्याची बातमी त्यांच्या कानावर आली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोहन व राधाने आपल्या मुलांना शिकवून चांगले नागरिक घडविले म्हणून त्यांची आदर्श आई-वडील म्हणून निवड केल्याची बातमी पेपरमधून झळकली. त्यात मोहनच्या जीवनातील अनेक घटनांचा परामर्श घेण्यात आला होता. इतकी खोलातली माहिती त्याचा मित्र भोसले सर याच्याशिवाय कोणालाही माहीत नव्हती. म्हणून मोहनने भोसले सरांना फोन करून विचारलं, " पेपरमध्ये आलेली माहिती तूच दिलीस ना !" यावर भोसले सरांनी देखील होकार दिला आणि म्हणाले, " त्या सामाजिक संस्थेला देखील मीच माहिती दिली. सर्व समाजाला कळले पाहिजे की शिक्षणाने जीवनात कसे परिवर्तन होते ?"
अखेर मोहनच्या जीवनातील तो सुवर्ण दिवस उजाडला. ते सभागृह लोकांनी खचाखच भरले होते. ज्या शहरातील लोकांनी मोहनला नावे ठेवली होती, ती सर्व मंडळी त्या सभागृहात दिसत होती. लक्ष्मी, तिचा नवरा, तिचे सासू-सासरे, राजू आणि त्याची बायको, हे सर्वजण पहिल्या रांगेत बसले होते. मोहन आणि राधा व्यासपीठावर विराजमान झाले होते. टाळ्यांच्या गजरात आदर्श आई-वडील पुरस्कार त्यांना देण्यात आले. भोसले सर स्टेजवर बोलत होते. " यानंतर आदर्श वडील मोहन यांना विनंती करतो की, त्यांनी दोन शब्द बोलावे." मोहन बोलण्यासाठी आपल्या जागेवरून उठला आणि माईक हातात घेतला. अगदी सुरुवातीला त्याच्या तोंडून शब्ददेखील फुटेना. आपल्या आई-वडिलांना वंदन करून त्याने भाषणास सुरुवात केली. " खरं तर हा माझा सन्मान मुळीच नाही, तर हा सन्मान आहे माझ्या आई-वडिलांचा. ज्यांनी मला घडवलं. माझ्या बा नी मला एकच शिकवलं होतं, जोपर्यंत तुझ्या मनगटात दम आहे, तोपर्यंत कुणासमोरही हात पसरू नको. ज्या दिवशी तू हात पसरशील त्यादिवशी तुझे जीवन समाप्त झाले असे समज. माझे बा अडाणी होते पण त्यांनी मला म्हटलं होतं की, जीवनाचा विकास करायचा असेल तर शिकावं लागेल. कमवा व शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वाक्य नेहमी लक्षात राहू दे. मी शिकलो म्हणून शहाणा झालो. म्हणून हा सन्मान माझा नाही तर तो माझ्या आई-बाबांचा आहे. माझ्या जीवनात माझी मुलगी लक्ष्मी आली नसती तर आजचा सुवर्ण दिवस मला पाहायला मिळाला नसता. म्हणून हा सन्मान माझा नाही तर माझ्या लक्ष्मीचा आहे. ती एक मुलगी, परक्याची धन, तिला जास्त शिक्षण देऊन काय फायदा असे अनेक लोकांनी मला टोमणे मारले. पण मला तिला खूप शिकवायचं होतं आणि तिला डॉक्टर करायचं होतं. तिच्यात ती गुणवत्ता होती, पण माझ्या कुटुंबासाठी तिने डॉक्टर होणे त्याग केली. स्वतः कष्ट करून तिने आपल्या भावाला राजूला डॉक्टर केली. आपलं स्वप्न तिने भावाच्या स्वरूपात साकार केली. ती त्यागमूर्ती लक्ष्मी हीच खरी या सन्मानाची हक्कदार आहे." असे म्हणताना मोहनच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. हे सारे ऐकून राजूसह सारेचजण उभे राहून लक्ष्मीसाठी टाळ्या वाजवू लागले. भोसले सरांनी लक्ष्मीला स्टेजवर बोलावलं आणि सर्वांसमक्ष तीचेही सन्मान करण्यात आले. " शिक्षणाने माणसाचे जीवन नुसते सुकर होत नाही तर सुसंस्कारी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्याचे जो कुणी प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची कास सोडू नये " असा संदेश लक्ष्मीने आपल्या छोटेखानी भाषणातून दिला.
दुसऱ्या दिवशी सर्वच वृत्तपत्रांत त्यागमूर्ती लक्ष्मीची कहाणी प्रसिद्ध झाली. मुलगी असावी तर लक्ष्मीसारखी असे प्रत्येकांच्या ओठांवर होते.
समाप्त
नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ही कादंबरी आपणांस कशी वाटली हे जरूर कळवा. मी आपल्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहे.
धन्यवाद ....!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment