kashtachi kamai

कष्टाची कमाई

गणपत आणि श्रीपत हे दोघे जिवलग आणि लंगोटी मित्र. लहानपणापासून ते एकाच शाळेत शिकले आणि एकत्र वाढले. मात्र आज गणपत आपल्याच गावात शेती करून आपले घर चालवितो तर श्रीपत मोठ्या शहरात मोठ्या बंगल्यात राहून ऐशोरामचे जीवन जगतो. शाळेत शिकत असतांना दोघे ही फार हुशार नव्हते, पण अगदी ढ देखील नव्हते. गणपतचा स्वभाव अगदी भोळा आणि सहकारी वृत्तीचा तर श्रीपत मात्र खूपच चलाखी करायचा, बढाया मारण्यात हुशार आणि लबाडीमध्ये तर त्याचा कोणी हात धरू शकत नव्हते. त्याची तीच चलाखी आणि लबाड बोलण्याची वृत्ती त्याला त्या पदापर्यंत नेली तर गणपतच्या भोळ्या स्वभावामुळे तो गावी शेतातच राबत राहिला. श्रीपतने अनेक वेळा त्याला समजावून सांगितलं की, ' माझ्यासोबत शहरात चल, एका वर्षात बघ कसा मालामाल करतो, काय पडलंय या शेतात.' तेंव्हा गणपत म्हणायचा, ' नको तुझा बंगला, नको तुझी गाडी, मी इथेच खूप आनंदात आणि मजेत आहे. मला देवाने काय कमी केलंय, रोजचे दोन घास खायला मिळतात, राहायला घर आहे आणि काम करायला शेती आहे. अजून काय पाहिजे ? माणसाने जास्तीच्या पैश्याची हाव ठेवू नये, पॆसा माणसाला झोपू ही देत नाही आणि काही खाऊ ही देत नाही.' यावर श्रीपत निरुत्तर होत असे आणि त्याचा नाद सोडून देत असे. श्रीपत रस्त्याच्या बांधकामाचे गुत्तेदारीचे काम करत असे. दरवर्षी तो लाखो रुपये कमाई करत असे. त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती, सुख त्यांच्या पायात लोळण घेत होती. मात्र तो मनाने सुखी अजिबात नव्हता. कारण होतं त्याचा एकुलता एक मुलगा,ज्याचं नाव होतं समीर मात्र लाडाने सारेच जण त्याला सॅम असे म्हणत. पैश्याच्या अंथरुणावर जन्म घेतलेल्या सॅमला कशाचीही कमतरता नव्हती. लहानपणापासून अति लाडात वाढला आणि कामातून गेला अशी त्याची गत झाली होती. मित्रासंगे दिवसरात्र पार्ट्या करण्यात तो गुंग असायचा. असाच एके दिवशी रात्री उशिरा पार्टी करून तो घरी आला. आपल्या खोलीत जाऊन झोपला न झोपला त्याच्या खोलीतून रडण्याचा आवाज येऊ लागला. काय झालं म्हणून श्रीपत त्याच्या खोलीत गेला तर तो जमिनीवर पडून आपला पोट धरून रडू लागला होता. त्याची पुरी नशा उतरून गेली होती. त्याच रात्री त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी त्याची सर्व तपासणी केली आणि सांगितलं की किडनी वर सूज आलेली आहे. त्यासाठी सर्वप्रथम याची दारू तर बंद करावीच लागेल अन्यथा हे वाचणार नाही, काळजी घ्यावं लागेल. श्रीपतच्या काळजात धस्स झालं. त्याला काहीच न सांगता पाच दिवसानी त्याला घरी घेऊन गेलं. त्याला रोज पिण्याची सवय गेल्या सात दिवसापासून पोटात दारूचा थेंब न गेल्यामुळे तो सैरावैरा होऊ लागला. पण श्रीपत त्याला दारू देऊ शकत नव्हता आणि तो काही ऐकत नव्हता. त्याच्याजवळ आज पैसा खूप होता पण एकही रूपाया काम करत नव्हता. डॉक्टरच्या हाताखाली काम करणारा एक मुलगा गोविंद सॅमची काळजी घेत होता. तो रोज सकाळी यायचा आणि सॅमला इंजेक्शन, गोळ्या-औषध देऊन जायचा. तो तासभर त्याच्याशी गप्पा मारायचा. तेवढाच वेळ सॅम शांत राहायचा. गोविंद गेला की पुन्हा त्याचा गोंधळ सुरू व्हायचा. श्रीपतने गोविंदला दिवसभर त्याच्या मुलाजवळ नोकरी करण्याची विनंती केली. डॉक्टराच्या परवानगीने त्याने ती नोकरी स्वीकारली. श्रीपतला जरा हायसे वाटले. तो आता सॅमसोबत दिवसभर राहू लागला. त्याच्यासोबत गप्पा करणे, गाणे म्हणणे, क्रिकेट खेळणे असे अनेक कामे करून सॅमचे मन रिजवू लागला. हळूहळू त्याची दारूची सवय दूर झाली आणि आता तो कसलाही गोंधळ न करता घरात वावरू लागला. दारूचे सेवन न केल्यामुळे त्याचे जीव जवळपास वाचले होते. डॉक्टरने पुन्हा एकवार तपासणी केली आणि किडनीवरील सूज बरी झाली पण दारूपासून दूर ठेवणे आवश्यक आहे अशी सूचना सॅमला आणि श्रीपतला दिली. सॅम मोठ्या धक्क्यातून सावरला होता आणि आता आयुष्यात कधी ही दारूला हात लावणार नाही, असे वचन देखील दिला. आपल्या सॅमला मोठ्या आजारातून बरे केले म्हणून गोविंदच्या हातात श्रीपतने एक लाख रुपयांचा चेक दिला. पण गोविंदने ते घेण्यास नकार दिला. माझ्या कामाचे पैसे म्हणजे पगार मला मिळाली, हे पैसे नको मला. माझे बाबा म्हणतात की,' जितके काम केले तितकेच पैसे घ्यावे, जास्तीचा घेतलेला पैसा आपलं सुख हिरावून घेतो." त्याचे हे बोलणे ऐकल्याबरोबर त्याला त्याच्या मित्राच्या बोलणे आठवू लागले. श्रीपतने त्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव विचारले, ' तुझ्या वडिलांचे नाव काय आहे ?' यावर तो मुलगा म्हणाला ' गणपत ' असे म्हणताक्षणी श्रीपतने गोविंदला मिठीत घेतले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ' गणपत खरा सांगत होता, पण मी सुख मिळविण्यासाठी, चार पैसे जास्त कमावण्याचा प्रयत्न केलो. हेच चार पैसे माझी झोप घेऊन गेली.' चल तुझ्या बाबाला भेटू म्हणून श्रीपत गोविंदला घेऊन गावाकडे गेला, सोबत सॅमदेखील होता. गावी आल्याबरोबर पहिल्यांदा त्याने गणपतला मिठी मारली आणि तुझ्या गुणांमुळे व गोविंदमुळे आज माझा मुलगा सॅम वाचला. माझे एवढे पैसे काहीच काम केले नाही जे तुझ्या संस्काराने काम केलंय. आजपासून मी कष्टाची कमाई खाणार, नको मला जास्तीचा पैसा, नको बंगला - गाडी असे म्हणत ओक्सबोक्सी रडू लागला. गणपत त्याला शांत करत वेळीच सावध झालास हे बरे झाले. चल उडदाची दाळ आणि भाकर केली आहे खाऊन घेऊ, असे म्हणून सारेच हातपाय धुवून जेवायला बसले. आज कित्येक दिवसानंतर श्रीपत व सॅम पोटभर खाल्ले होते. दोघांनाही खूप आनंद वाटला.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Comments

  1. आजच्या कलीयुगाचा काळात या कवितेची फार गरज आहे सर पालकाला आणि विद्यार्थांना चांगले वाचन करनाश वेळ देत नाहीत

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान