EK Tarikh ..... ( एक तारीख .....)

लघुकथा - एक तारीख

शंकर एका सरकारी कार्यालयात कारकून पदावर काम करणारा सामान्य व्यक्ती. गौरी त्याची बायको, साधी आणि भोळी. दिसायला सुंदर जरी नसेल तरी नजरेत भरण्यासारखी तिचे डोळे व नाक अनेकांचे लक्ष आकर्षित करणारी होती. ती ग्रामीण भागातील राहणारी आणि जेमतेम सातवी पास झालेली सोज्वळ आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. ते दोघेही महादेवाचे खूप मोठे भक्त होते. दर सोमवारी महादेवाच्या नावाने उपवास ठेवत असत. त्यांना गणेश आणि कीर्ती असे दोन लेकरं होते, जे की शंकर-गौरीप्रमाणे सुरेख होते. त्यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी औषध म्हणजे दारूची एक बॉटल घ्यायचा. असे फक्त एक तारखेला पगाराच्या दिवशी घडायचं. इतर दिवशी तो घरी काहीच न्यायचा नाही. तसा त्याचा कारकूनचा पगार खूप कमी, त्यात शहरात भाड्याने घर घेऊन राहणं आणि त्यात मुलांना खाजगी शाळा व शिकवणी म्हणजे सारं काही खर्चिक होतं. शिवाय त्याला अन्य कोणताच आधार नव्हता शिवाय पगाराच्या. म्हणून तो महिन्यातून एकदाच फक्त असे करत असे. गौरी आणि पोरं एक तारखेची वाट पाहत राहायची शिवाय तो देखील वाट पाहायचा. वीस-पंचवीस तारखेपर्यंत त्याचा पगार संपून जायचा नि तो पाच-सहा दिवस खूपच कष्टात काढायचा. गौरी परिस्थिती समजून होती म्हणून ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केली नाही आणि मुलांनी देखील कधी रडत बसले नाहीत. आहे त्या गोष्टीत सारे आनंदात होते. दहा वर्षे कधी सरले कळालेच नाही. गणेश माध्यमिक शाळेत गेला तर कीर्ती उच्च प्राथमिक शाळेत गेली होती.
अचानक एके दिवशी शंकरने घरी येतांना गौरीसाठी गजरा, मुलांसाठी खाऊ आणि स्वतःसाठी दारू आणली. पण त्यादिवशी एक तारीख नव्हती. घरातले सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते, गौरी म्हणाली, " अहो, आज एक तारीख नाही. मग हे कसे काय ? " त्यावर शंकर आनंदात म्हणाला, " गौरी, आज माझं प्रमोशन झालं आहे, मी आता सिनियर क्लार्क झालोय. साहेबांच्या टेबलाजवळ माझी खुर्ची असेल आता. " यावर सर्वजण खुश झाले. गौरी म्हणाली, " म्हणजे, तुमचा पगार देखील वाढणार." यावर शंकरने आपल्या मानेने होकार दर्शविला. लेकरांनी शंकरचे अभिनंदन केले. शंकर आता सिनियर क्लार्क झाला होता. म्हणजे ऑफिसमधील सर्व महत्वाची कागदपत्रे आता त्याच्या हातावरून साहेबांकडे जाणार होती. त्या दिवशी खूप खुशीत तो झोपी गेला. सकाळी लवकर उठून तो तयार झाला. आपला दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घेऊन तो कामावर निघाला. आज त्याचा पहिला दिवस होता. म्हणून तो लगबगीने ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या नेहमीच्या जागेकडे एकवेळ नजर फिरवून दुसऱ्या नवीन खुर्चीकडे वळला. सिनियर क्लार्कच्या खुर्चीला वंदन करून तो त्या खुर्चीवर बसला. खूप लोकं साहेबांकडे कामाला येत होती आणि जात होती. प्रत्येक व्यक्ती येताना-जाताना शंकरला अदबीने नमस्कार करत होती. सुरुवातीचे काही दिवस त्याला कळालेच नाही, की लोकं एवढं मला का अदबीने नमस्कार करीत आहेत. एखादा आठवडा उलटल्यानंतर त्याला कळाले की, जो कोणी साहेबांकडे कामासाठी जातो, त्याची फाईल याच सिनियर क्लार्कच्या हाताखालून जाते, त्यामुळे प्रत्येकजण असा वागत होता. त्याला हे ही कळून चुकले की साहेबांकडे जे फाईल जाते आणि येते त्यावर काही मलिदा देखील मिळत असते. ही गोष्ट त्याला माहित झाल्यावर वरकमाईमुळे रोजच त्याचा खिसा गरम राहू लागला. प्रमोशन झाल्याने पगारात तर वाढ झाली शिवाय वरकमाई देखील मिळू लागली त्यामुळे त्याचा एक तारीखेचा कार्यक्रम सध्या रोज होऊ लागला. बायकोसाठी गजरा, मुलांसाठी खाऊ रोजच घेऊन जात होता. फक्त एक बदल झाला, आता तो घरी दारू न घेता कधी साहेबासोबत तर कधी मित्रांसोबत घेऊ लागला. त्यामुळे त्याचे घरी परत येण्याची वेळ देखील बदलून गेली. पूर्वी सायंकाळी सहा वाजता घरी येणारा शंकर आता रात्री नऊ किंवा दहा वाजता येऊ लागला. मुलांशी बोलणे ही कमी होऊ लागले. गौरीने याविषयी शंकरला अनेक वेळा समजावून सांगितले पण त्याच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. शंकरचे मित्रांसोबत पार्टी करण्याचे दिवस काही संपत नव्हते. त्याला पैश्याची देखील काही चणचण भासत नव्हती. ऑफिसला जाण्या-येण्यासाठी त्याने एक गाडी देखील खरेदी केली. अत्यंत गरीब परिस्थितीमधून शंकरने आपल्या जीवनाचा डोलारा सांभाळला होता. गौरी देखील हे सर्व जाणून होती.
त्यादिवशी रोजच्या प्रमाणे शंकर सायंकाळी ऑफिस संपल्यावर आपल्या मित्रांसोबत पार्टी केली. रात्री उशिरा आपली गाडी घेऊन घराकडे निघाला. मित्राच्या आग्रहाखातर एक-दोन पॅक जरा जास्त घेतल्याने त्याचे संतुलन बिघडले होते. त्याला गाडी नीट चालविता येत नव्हते तरी तसा तो प्रयत्न करत होता. अचानक त्याचा तोल गेला आणि त्याची गाडी रस्त्यावर स्लीप झाली. तो सिमेंटचा रस्ता होता, त्याचे डोके सिमेंटच्या रस्त्यावर खाली आपटले. डोक्याला खूप मार लागला होता. रस्त्यावरील काही लोकांनी उचलून त्याला सरकारी दवाखान्यात नेले. तो शुद्धीवर नव्हता. मोबाईलला लॉक असल्याने त्याचा घरचा क्रमांक देखील काढता येत नव्हते. रात्रीचे दहा वाजून गेले तरी शंकर घरी आला नाही म्हणून गौरी चिंताग्रस्त झाली होती. काय करावे ? कुणाला फोन करावे ? हे ही तिला कळत नव्हते. शंकर दवाखान्यात इकडे मृत्यूशी झुंज देत होता तर गौरी तिकडे त्याच्या काळजीत रात्र जागून काढली. सकाळी सकाळी कुणी तरी अपघात झालेली गाडी पाहून ओळखले आणि शंकरचा अपघात झालंय, तो सरकारी दवाखान्यात आहे. ही गोष्ट गौरीला कळाली तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती तशीच आपल्या लेकरांना घेऊन सरकारी दवाखाना गाठली. शंकर आय सी यु मध्ये भरती होता. गौरी डॉक्टरांना भेटली. डॉक्टर म्हणाले, " डोक्याला मार असल्याने व रक्तस्त्राव झाल्याने पुढील चोवीस तास मी काही सांगू शकत नाही. " गौरीला काहीच सुचत नव्हते. काही वेळात शंकरचे काही मित्र तेथे आले. त्यांनी खाजगी दवाखान्यात हलविण्याचा पर्याय सुचविला. गौरीला देखील ते योग्य वाटले. लागलीच सर्व सोपस्कार पूर्ण करून शहरातील नामवंत न्यूरो सर्जनकडे शंकरला नेण्याची व्यवस्था केली. शंकरची स्थिती खूप बिकट होती. त्या डॉक्टरने जी रक्कम सांगितली ती पहिल्यांदा भरणे आवश्यक होते. त्याच्याजवळ पैसे होते पण शंकरच्या खात्यात होते. तो तर बेशुद्ध होता. गौरीला मोबाईल वापरता येत नव्हते. कोणत्याच अँपचे पासवर्ड तिला माहीत नव्हते. पैसा कुठून मिळवावे ? हा एक मोठा प्रश्न होता. शंकरच्या ऑफिसमधले साहेबच फक्त मदत करू शकतात असा निश्चय करून गौरीने साहेबांना फोन केली व सर्व परिस्थिती सांगितली. त्यावर साहेबांनी दवाखान्यात फोन करून बोलले आणि शंकरवर उपचार करणे सुरू झाले. अनेक अपघाती व्यक्तीचे जीव वाचविण्यात या न्यूरो सर्जनचा हातखंडा होता. म्हणून शेवटचा एक विश्वास त्यांच्यावर होता. गौरी मनोमनी महादेवाची प्रार्थना सुरू केली. तिची महादेवावर असलेली भक्ती व निष्ठा आणि डॉक्टरांचे प्रयत्न फळाला आले. शंकरच्या डोक्याचे ऑपरेशन यशस्वी झाले. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला. गौरीने त्या डॉक्टरांचे व महादेवाचे आभार मानले. पंधरा-वीस दिवसानी शंकरला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. तो सुखरूप घरी आला. या अपघातानंतर त्याच्या जीवनात एक बदल पाहायला मिळाला. त्यानंतर तो ऑफिसमध्ये काम करतांना कोणाकडून कधीच मलिदा घेतला नाही. आज ही एक तारखेला पगार झाल्यावर आपल्या बायकोसाठी गजरा आणि मुलांसाठी खाऊ घेऊन जातो. स्वतःसाठी मात्र आता तो एक चांगले पुस्तक विकत घेतो आणि त्यातून आनंद मिळवितो. काही महिन्यात त्याच्याकडे भरपूर पुस्तक जमा होतात ज्याचा फायदा त्याच्या घरातील सर्वाना होतो. म्हणून आज ही घरातील सर्वचजण एक तारखेची आतुरतेने वाट पाहतात.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान