Diwali ( दिवाळी )

दिवाळी 
   - नासा येवतीकर, धर्माबाद


घरात लक्ष्मीपूजन करण्याची लगबग सकाळ पासून सुरु झाली होती. आई भल्या पहाटे उठली आणि घरासमोर अंगण स्वच्छ झाडून सडा टाकली तर ताईने खूप छान रांगोळी काढली. बाबा देखील सकाळी लवकरच उठून शेताकडे जाऊन काही झेंडूची फुलं आणि आंब्याची डहाळी आणली होती. आम्ही भावंडे अजूनही झोपेतच होतो. शाळेच्या दिवसांत रोज सकाळी लवकर उठून तयार व्हावे लागते म्हणून दिवाळीच्या सुट्टीत मनसोक्त झोप घ्यावी असा मनसुबा असतो पण आई कुठे झोपू देते. तिचे काम सरले की तिचा मोर्चा आमच्याकडे वळला. उठा उठा सकाळ झाली म्हणत ती आम्हांला सर्वाना उठवली. डोळे चोळत चोळत आम्ही सारेजण उठलो. तोंडात ब्रश कोंबलो. लगेच अंघोळीची देखील तयारी झालेली होती. घराच्या मागच्या बाजूला लाकडी चूल होती. त्याच्यावर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. सकाळचा गार वारा अंगाला झोम्बत होता. अश्या थंडीत मस्त गरम पांघरून घेऊन झोपावं वाटतं आणि आईने आंघोळी साठी घाई केलेली अजिबात आवडत नव्हतं. पण नाईलाज होता. आई कोणाचेच ऐकत नसे. सर्व भावंडांना तिने अंगभर उटणे घासले आणि सर्वाना एकदाच आंघोळीसाठी रांगेत बसवलं. गरम पाण्याने आम्हांला घासून घासून अंघोळ घातल्यावर सर्वांनी टॉवेल घेऊन घरात प्रवेश केला. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. त्यात आपण कशाला हट्टीपणा करावा म्हणून गप्प गुमान आईने जसे सांगितले तसे करत राहिलो. थोड्या वेळाने सर्वांच्या अंघोळी झाल्यावर गरमागरम उपमा आणि सोबत दिवाळीचा फराळ थोडासा खायला मिळालं. आज दिवाळीचा तिसरा दिवस अर्थात लक्ष्मीपूजन करण्याचा दिवस होता. आज सायंकाळी फटाके वाजविण्यास मिळतील याच उत्सुकतेने आम्ही आनंदून गेलो होतो. फराळ झाल्यावर घरात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली. झेंडूच्या फुलांचे हार तयार करण्यास आम्ही थोडीफार मदत केली. आता तुमचं काम संपलं तेव्हा तुम्ही बाहेर खेळायला जा असे बाबांचे आदेश मिळाल्याने आम्ही बाहेर खेळायला गेलो. सकाळचे दहा वाजले असतील. गावाच्या बाहेर असलेल्या सरकारी शाळेत सारे मुले क्रिकेट खेळत होती. त्यांच्या खेळात आम्ही देखील सामील झालो. दोन गट करण्यात आले आणि क्रिकेटचा सामना सुरू झाला. दिवाळीच्या सुट्टी निमित्ताने बाहेरगावी शिकायला गेलेली मित्रमंडळी आलेली होती. रोजच्या पेक्षा आजच्या खेळात खूप मजा येत होती. खेळ खूप रंगात आलेला होता. समोरच्या गटाला जिंकू द्यायचे नाही या विचाराने आमचा खेळ चालू होता. उंच टोलावलेला चेंडू माझ्याकडे येत होता. तो चेंडू जर मी झेल केला तर पुढील गट नक्कीच हरणार होता. माझे पूर्ण लक्ष त्या चेंडूवर होते. काही ही करून तो झेल सोडायचा नाही म्हणून मी त्या चेंडूच्या दिशेने हवेत झेप घेतला. एक दोन फूट हवेत उडी घेत तो चेंडू झेलला आणि जमिनीवर परत येताना माझा पाय वाकडा झाला आणि मुरगळला. झेल न सोडता तसाच जमिनीवर पडलो. सर्व टीम एकमेकांना अभिनंदन करत होती आणि मी मात्र माझ्या डाव्या पायाला धरून रडत बसलो होतो. सर्वजण माझ्याजवळ आले आणि मला उचलून सावलीत नेऊन बसविले. काही वेळाने पायावर सूज आली. आता डाव्या पायावर उभे राहणे खूपच कठीण जाऊ लागले. तो सामना आम्ही जिंकला पण मी लंगडा झालो. भावाचा व मित्राचा आधार घेऊन मी घरी गेलो. माझा तो अवतार पाहून आई तर रडवेलीच झाली. बाबानी रागाने एक कटाक्ष माझ्यावर टाकली. त्यांची ती नजर खूप काही बोलून गेली. मी पलंगावर विराजमान झालो. सायंकाळी लक्ष्मीपूजन संपन्न झाले. भावाने त्याच्या व माझ्या नावाचे सर्व फटाके उडविले. मी पलंगावर बसूनच ते सारे पाहत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा होता. मला आधार घेऊन चालावे लागत होते. पायाचा मला खूप त्रास होत होता. माझा चेहरा रडवेला झाला होता. आज देखील भल्या पहाटे उठून उटणे लावून अभ्यंगस्नान झालं. दिवाळीचे नवीन कपडे टाकून मी प्लंगावर विराजमान झालो. त्याशिवाय माझ्याकडे अन्य कोणताच पर्याय नव्हता. भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला मात्र माझ्याशिवाय त्याला ही करमत नव्हते त्यामुळे तो काही वेळातच परत आला आणि माझ्याजवळ बसून राहिला. पलंगावर नुसते बसून कंटाळा आला होता. काय करावे ? सुचत नव्हते. आमचे बाबा शेतकरी होते. पण त्यांना पुस्तकं वाचण्याचा खूप छंद होता. त्यांनी नुकतेच काही दिवाळी अंक विकत आणले होते. माझी नजर " किशोर दिवाळी " पुस्तकावर पडली. मुखपृष्ठ एवढं आकर्षक होतं की, ते हातात घेतल्याशिवाय राहवलं नाही. किशोर दिवाळी पुस्तक हातात घेऊन एकेक पान वाचत गेलो. त्यातील कथा आणि कविता एवढ्या सुंदर होत्या की माझं मन आनंदून गेलं. दिवसभरात मी ते पुस्तक वाचून काढलं आणि मला एक वेगळाच आनंद मिळाला. अपघाताने माझा पाय मुरगळला आणि किशोर पुस्तक वाचण्यास मिळाले. यावर्षी माझी दिवाळी जरा वेगळीच वाटत होती. या दिवाळीला जो वाचनाचा छंद लागला तो जीवनभर सोबत राहिला.
तेव्हा मित्रांनो, या दिवाळीला एक संकल्प करू या निदान दोन-तीन दिवाळी अंक विकत घेऊन वाचून काढू या. वाचनाची मेजवानी इतरांना देऊ या. 

सर्वाना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा ........! With Best Wishes 2023

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान