पंगूम लंगयते गिरीम
जागतिक अपंग दिनानिमित्त लघुकथा
पंगूम लंगयते गिरीम
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।
पुण्याची गणना कोण करी ॥
मंदिराच्या माईकवरून रोज सायंकाळी हरिपाठ सर्वजण ऐकत असत. त्या आवाजात अशी काही जादू होती की, हरिपाठ चालू झाला की सारेचजण ते ऐकण्यात गुंग होऊन जात असत. कारण ही तसेच होते त्याच गावातील विठ्ठल नावाचा एक हरिभक्त रोज सायंकाळी न चुकता हरिपाठाचे गायन करत असतो. गावातील लोकांना त्याचे विशेष कौतुक का वाटत होते तर तो विठ्ठल दोन्ही डोळ्याने आंधळा होता. त्याने कधी शाळेचे तोंड देखील पाहिलं नाही तरी संपूर्ण हरिपाठ अगदी तोंडपाठ म्हणतो. नुसतं हरिपाठच नाही तर अनेक अभंग आणि ओव्या त्याला तोंडपाठ होत्या. त्यामुळे नेहमी तो विठ्ठलाचे गुणगान करण्यात तल्लीन राहत असे. रोज पाच घरी माधुकरी मागून मिळेल ते अन्न खाऊन तो आपला जीवन आनंदात जगत होता. त्याला कोणत्याच गोष्टीची आस नव्हती, मनात कुठला स्वार्थ नव्हता. उद्याच्या जगण्याची त्याला अजिबात काळजी नव्हती. ज्याने जन्म दिला त्याला आपली काळजी आहे, आपण उगीच का काळजी करत बसायची असा तो नेहमी बोलताना म्हणत असे. पण फार पूर्वी तो असा बोलत नव्हता आणि वागत नव्हता. दोन्ही डोळ्याने आंधळा असल्याने तो स्वतःवर खूप दुःखी होता. बाहेर उजेड असून देखील मी नेहमी अंधारातच वावरत असतो असे स्वतःवर बोलत होता. कधी कधी देवाला सुद्धा शिव्याशाप देत होता. विठ्ठलाचे वडील गंगाधर आणि आई सुनंदा हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी आषाढी एकादशीला ते दोघे न चुकता पंढरीची वारी करत असे. लग्न होऊन दहा वर्षे उलटली होती तरी त्यांच्या घरी पाळणा हलला नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी पांडुरंगाला ते नेहमी साकडे घालायचे. त्यांना स्वतःची शेतजमीन नव्हती. इतरांच्या शेतात मोलमजुरी करून ते आपले जीवन जगत होते. राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीतून सदा न कदा पांडुरंगाचेच नाव ऐकू येत असत. नित्यनेमाने हरिपाठ चालत असे. पांडुरंगाच्या कृपेने सुनंदाला दिवस गेले होते. गर्भवती असल्या कारणाने तिला पंढरीच्या वारीला जाता आले नाही. म्हणून त्यावर्षी गंगाधर एकटाच वारीला गेला. त्यांनी मनोमन प्रार्थना केली. पांडुरंगाने त्याची प्रार्थना ऐकली आणि वरून पाऊस पडत होता, विजा चमकत होते, ढगांचा आवाज होत होता, अशा वातावरणात सुनंदाने एका मुलाला जन्म दिला. जन्मलेलं मूल सुदृढ होतं पण दोन्ही डोळे नव्हते. आंधळा मूल जन्माला आले म्हणून सुनंदा धाय मोकलून रडू लागली. हे देवा, असं का ? माझ्याच नशिबात हे काय दिलंस, पांडुरंगा ? म्हणून ती रडू लागली. त्यावेळी गंगाधर तिला समजावत होता, ' आजपर्यंत मूल नाही म्हणून रडत होतीस आणि पांडुरंगाने आपल्या पदरात मुलगा दिलंय तर ते आंधळा दिलंय म्हणून रडतेस, मूल नसल्यापेक्षा असलेलं बरे नव्हे का, मग तो आंधळा का असेना. आपण दोघे त्याचे डोळे बनून त्याला वाढवू या.' पुत्रप्राप्ती बद्दल गंगाधरने परमेश्वराचे आभार मानले. पांडुरंगच आपल्या घरी आला आहे म्हणून त्याने त्या मुलाचे नाव विठ्ठल असे ठेवले.
विठ्ठल नावाप्रमाणे पांडुरंगासारखाच होता. तो दोन्ही डोळ्याने आंधळा असल्याकारणाने सुनंदा त्याला एकट्याला सोडून कधीच राहत नव्हती. विठ्ठलावर तिचे नेहमी लक्ष असायचे. मी एक वेळा वारीला गेली नाही तर देवाने माझ्यावर अशी वेळ आणली म्हणत सुनंदा नेहमी बोलत असते. घरातील भक्तिमय वातावरणात विठ्ठल चंद्रकलेप्रमाणे वाढत होता. गंगाधर रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपी जाईपर्यंत हरीचे नामस्मरण करत राहायचा. विठ्ठलाच्या कानावर तेच तेच अभंग, ओव्या, श्लोक ऐकू येत असत. तो सुद्धा ते सर्व ऐकत मोठा होत होता. आंधळ्या मुलाला शाळेत पाठवून काय फायदा ? त्याला काही दिसतच नाही तर तो अभ्यास काय करणार ? त्यापेक्षा रोज आपल्यासोबत राहिला तर काही काळजी राहणार नाही म्हणून गंगाधरने विठ्ठलला शाळेत पाठविले नाही. त्याच्या शेजारी त्याच्याच वयाचा माधव नावाचा एक मुलगा होता तो मात्र रोज शाळेत जायचा, घरी आल्यावर शाळेतल्या गंमतीजमती, गप्पा, गाणी, गोष्टी विठ्ठलला सांगायचा. त्याला गाणी म्हणून दाखवायचा, गोष्टी वाचून दाखवायचा. घरी बसल्या ठिकाणी शाळेत न जाता विठ्ठल शाळेचा अभ्यास शिकू लागला. पण राहून राहून त्याला एका गोष्टीची खंत वाटत होती ती म्हणजे तो डोळ्याने काही पाहू शकत नाही, माधव सारखा उड्या मारू शकत नाही. म्हणून तो नेहमी उदास राहायचा. त्याचा उदास चेहरा पाहून त्याचा मित्र माधव देखील उदास व्हायचा. विठ्ठलाच्या मनात नकारात्मक विचार येऊ नये म्हणून तो सदा त्याला बोलत राहायचा व म्हणायचा, ' विठ्ठल, तुला डोळ्याने दिसत नाही, मात्र तरीही तू माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस ?' यावर विठ्ठल हसायचा आणि म्हणायचा, ' उगी काही बोलू नकोस, तुला पुस्तक वाचता येते आणि मला वाचता येते का ? वाचून तुझे ज्ञान वाढत राहते आणि माझे ज्ञान कसे वाढणार ?' यावर माधव म्हणतो, ' बघ विठ्ठल हे सारे बरोबर आहे, पण देवाने तुला एक दैविक शक्ती दिली आहे.' प्रश्नार्थक चेहरा करून विठ्ठल म्हणतो, ' कोणती दैविक शक्ती दिली आहे ? मला तर काही कळत नाही, तूच सांग.' यावर माधवने लहानपणापासून जे निरीक्षण केले होते त्याबाबत तो म्हणतो, ' हे बघ, मला एक कविता पाठ करायला दहा वेळेस वाचन करावे लागते आणि ती कविता तू फक्त एक-दोनदा ऐकलं की लगेच पाठ होते. आहे की नाही दैविक शक्ती.' माधवचे ते बोलणे ऐकून विठ्ठल मनाशी विचार करू लागला. माधव जे बोलला ते खरंच आहे. मला डोळे नाहीत, मला वाचन करता येत नाही तरी संपूर्ण हरिपाठ मला तोंडपाठ आहे, अभंग, ओव्या पाठ आहेत, पुस्तकातील कविता, गाणी आणि गोष्टी माहीत आहेत असा तो स्वतःशी बोलू लागला. त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यादिवसापासून त्याचे जीवन पार बदलून गेले. तो स्वावलंबी बनण्याचा निर्धार केला. स्वतःची कामे स्वतः पूर्ण करू लागला. कोणावरही आपण अवलंबून राहू नये असा त्याने निर्धार केला. प्रत्येक गोष्ट तो आता काळजीपूर्वक ऐकू लागला आणि त्यानुसार कृती देखील करू लागला. एक-दोनदा लक्ष देऊन ऐकले की त्याला ते सर्व पाठ होऊ लागलं. त्याचे दोन कान हे दोन डोळे झाले होते. हळूहळू तो हरिभक्तात तल्लीन होऊ लागला. गावोगावी होणाऱ्या कीर्तनात तो गायक म्हणून जाऊ लागला. अनेक संत मंडळीचा सहवास लाभत गेला. त्यामुळे त्यात तो मिसळत गेला. यातच तो तबला-पेटी हे वाद्य वाजविण्यास शिकून घेतला. पंचक्रोशीत त्याचे नाव होऊ लागले. माधव ही त्याच्यासोबत त्याचा जिवाभावाचा मित्र म्हणून सोबत राहू लागला. गंगाधर आणि सुनंदा यांना आता त्याची काळजी वाटत नव्हती तर त्याचा अभिमान वाटत होता. जन्मभर पांडुरंगाची सेवा करण्याचे व्रत त्याने घेतले. काही वर्षांनी वृद्धापकाळाने गंगाधर आणि सुनंदा यांचे निधन झाले. आंधळ्या विठ्ठलाच्या जीवनात अजून अंधार निर्माण झाला. पण त्याचा मित्र माधवने त्याचा धीर खचू दिला नाही. ' मूकं करोती वाचालम, पंगूम लंगयते गिरीम' या ओवीची आठवण करून दिली, तो परत सकारात्मक विचाराने काम करू लागला आणि आनंदाने जीवन जगू लागला. गावातील सर्व लोकांनी विठ्ठलाला गावातील मंदिरात रोज हरिपाठ गायनाची विनंती केली आणि तो आनंदाने ते काम स्वीकारलं. त्याच्या बदल्यात त्याने फक्त पाच घराची माधुकरी मागून घेतली. समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे ' केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे ' या उक्तीनुसार तो आपले चांगले कर्म करत राहिला. मी डोळ्याने आंधळा आहे असे त्याला कधीच वाटले नाही. धन्य ती मैत्री, धन्य ती विठ्ठलाची भक्ती आणि धन्य तो हरी पांडुरंग.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
Comments
Post a Comment