इमानदार मोती

इमानदार मोती

आज गावात गंगाराम आणि त्याच्या इमानदार कुत्र्यांचीच जो तो चर्चा करत होते. कुत्र्याच्या मरणाच्या दिवशी त्याच्या इमानदारीची चर्चा चालू होती. प्रत्यक्ष जीवनात मानवाचे सुद्धा असेच होते नाही का ? अंत्ययात्रेत जाणारे लोकं मेलेल्या माणसाच्या भल्या बुऱ्या गोष्टीवरच तर बोलताना दिसून येतात. अगदी तशीच चर्चा आज मोत्या या कुत्र्याची चालू होती. त्याची एक ही वाईट सवय नव्हती म्हणून तर जो तो त्याची चांगल्या गुणांची चर्चा करीत होते. मोत्या खूप प्रामाणिक, इमानदार आणि विश्वासू होता. त्याने कधी कुणाला त्रास दिला नाही. कुणाच्या घरात जाऊन भाकर चोरली नाही. गंगारामवर त्याचा लई जीव होता म्हणून तर त्याच्या तेराव्या दिवशी तो ही गेला त्याच्याजवळ. मालक नाही म्हणून तो तेरा दिवस काहीच खाल्ला नाही आणि बरोबर तेराव्यालाच गेला. असे तेरवीला आलेले बरेच लोकं बोलत होती. कुत्र्याचं तरी काय भाग्य बघा त्याच्या अंत्यविधीला मालकांएवढे लोकं जमली होती. सर्व लोकांसमोर त्याने आपला प्राण सोडला. तेरवीला जमलेले सर्व मंडळी त्याचे अंतिम संस्कार करूनच पुढच्या कामाला लागले. गंगाराम हा एक अल्प भू धारक शेतकरी. त्याच्याकडे फारच कमी शेती होती मात्र त्या शेतीत देखील तो खुश होता. रोज सकाळी उठल्यापासून तो आणि तिची पत्नी गंगा शेतात जायचे आणि खूप कष्ट करायचे. त्यांना मारोती नावाचा एक मुलगा होता. शनिवारच्या दिवशी जन्मला म्हणून त्याचे नाव मारोती ठेवण्यात आले. पुढे चालून हाच मारोती आपली सेवा करेल जसे मारोतीने भगवान राम आणि सीतामाईची केली. पण झाले उलटेच हा मारोती तर निव्वळ आळशी निघाला. एकुलता एक मुलगा म्हणून गंगा त्याचे खूप लाड करीत होती आणि त्या लाडापायी मारोती बिघडला असे गंगारामचे बोलणे असायाचे. मारोती मोठा होऊ लागला तसे त्याला नको असलेले अनेक छंद लागू लागले. मधूनच शाळा सोडून दिली आणि आता गावभर नुसतं हुंदडायचे काम शिल्लक राहिले. रोज सायंकाळी घरात मारोतीवरून गंगाराम आणि गंगा यांच्यात भांडण होत राहायचे. एवढा मोठा झाला तरी याला काम करायची अक्कल नाही म्हणत गंगाराम मारोतीला बोलायचा. पण तो ऐकून न एकल्यासारखा करायचा, पोटभर खायचा आणि झोपी जायचा. याचं लगीन केलं तर वळणावर येईल म्हणून मारोतीचे लग्न ओळखीच्या पाहुण्यातील मुलीसोबत ठरवितो. दुसरे तर कोणी त्याला मुलगी द्यायला ही तयार होत नव्हते म्हणून गंगारामने तसे केले. लग्न झाल्यापासून तर मारोती आणखीनच बिघडून गेला. त्याची बायको ही त्याच्यासारखी आळशी आणि खर्चाळू निघाली. करायला गेलो एक नि झालं दुसरेच असे झालं होतं. हळूहळू गंगाराम आणि गंगा वार्धक्याकडे जाऊ लागले होते. त्यांना आता शेतात जाऊन काम करणे शक्य नव्हते. मारोती आणि त्याची पत्नी ही शेतात जात नव्हते. या दोघांच्या नावावर जे काही फुकट रेशन आणि पैसे भेटत होते त्याच्यावरच यांचा गुजराण चालू होते. एके दिवशी असेच गंगाराम बाहेर अंगणात पहुडलेला होता. त्याच्याजवळ एक गोंडस कुत्रा आला. त्याला पाहताच गंगारामला त्याला जवळ घ्यावं असं वाटलं. तो कुत्रा मग रोज येऊ लागला. गंगाराम त्या कुत्र्याला रोज भाकर टाकत असे. तिकडून मारोतीची बायको गंगारामवर ओरडत असे इथे आम्हालाच काही खायला मिळत नाही आणि म्हातारा रोज अर्धी भाकर त्या कुत्र्याला देत आहे. सुनेचे बोलण्याकडे तो दुर्लक्ष करत असे. गंगाराम शेगावच्या गजानन महाराजांचा गुरुवारचा उपवास करत असे. कुत्रा देखील त्यादिवशी काहीच खात नसे. दुसऱ्याच्या घरी कोणी काही खायला दिले तरी तो खात नसे. नेहमी त्याच्याजवळ बसून राही. गंगारामने त्याचे नाव मोती ठेवले होते. मोती खरोखरच प्रेमळ, इमानदार आणि विश्वासू होता. गल्लीतल्या कोणाला कधी त्रास दिला नाही आणि रात्रीला कोणाला येऊ दिला नाही. एकदा असेच उन्हाळ्याच्या दिवसांत गंगाराम बाहेर अंगणात झोपला होता. मध्यरात्रीची वेळ झाली. दोन चोर गावात शिरले होते याची पहिली चाहूल मोत्याला लागली. लगेच तो भुंकायला सुरुवात केली. हा असा का भुंकत आहे म्हणून गंगाराम जागी झाला आणि आजूबाजूचे ही जागे झाले. हे पाहून ते दोन चोर पळून दुसऱ्या बाजूच्या गावात गेले. सकाळी साऱ्या गावाला कळाले की, मोत्या मुळे आज आपल्या गावात चोरी होता होता टळली. त्यादिवशी पासून मोत्या संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला. मोत्या खूप इमानदार आहे म्हणून प्रत्येकजण त्याला खाण्यासाठी भाकर टाकत असत मात्र तो कुठे ही काही खात नसे. फक्त गंगाराम जे देईल तेच तो खात असे. निराधार योजनेतून गहू तांदूळ आणि काही पैसे भेटत होते त्याच्यावरच त्यांचा संसार चालू होता. अचानक एके दिवशी गंगारामला सोडून गंगा गेली. त्यादिवशीपासून  तर गंगारामचे हाल हाल होऊ लागले. त्याच्यासोबत मोत्याचे ही हाल होऊ लागले. जा कोणाच्या घरची भाकर खा म्हटलं तरी तो खात नव्हता. रेशन मिळेपर्यंत मारोती आणि त्याची बायको गोड बोलायचे आणि एकदा रेशन मिळाले की, पुढचे दिवस त्याला विचारायचे देखील नाही. असे बरेच दिवस चालले आणि एके दिवशी गंगाराम देखील मोत्याला एकट्याला सोडून गेला. त्यादिवशी मोत्या खाली मान घालून अश्रू गाळत होता. अंतयात्रेत देखील तो सामील झाला. त्यादिवशी तो काहीच खाल्ला नाही. सतत तेरा दिवस तो उपाशीच राहिला. जेथे गंगाराम झोपत असे त्या बाजेजवळ बसून होता. त्याची कोणालाच काळजी नव्हती. आपला मालक दिसत नाही, तो मला सोडून गेला म्हणून मोत्या देखील मालकाच्या तेराव्या दिवशी त्याच्या बाजेजवळच प्राण सोडला. असा इमानदार आणि प्रामाणिक कुत्रा कधी पाहिला नाही अशी चर्चा आजही त्या गावात अधूनमधून होत असते.
- नासा येवतीकर, 9423625769

( प्रस्तुत कथा काल्पनिक असून नावाचा किंवा घटनेचा संबंध जुळत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावे. )

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान