पैसासम्राट (Paisa-Samrat)
पैसासम्राट
प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मीकांत यांचे दवाखान्यात निधन, त्यांच्यावर अंतिम संस्कार कोण करणार ? अशी एक ठळक बातमी वृत्तपत्रात आणि सोशल मीडियामध्ये झळकली. तशी ती बातमी गणेशच्या कानावर देखील गेली. तसा तो काही वेळासाठी हादरला. क्षणाचाही विलंब न लावता तो थेट त्या दवाखान्याकडे धाव घेतली ज्याठिकाणी लक्ष्मीकांतने आपला शेवटचा श्वास घेतला होता. लक्ष्मीकांत हा प्रसिद्ध उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या पाच मध्ये असणारा व्यक्ती. पण मृत्यूच्या वेळी त्याच्याजवळ कोणीही उपस्थित नव्हते. त्या शहरात गणेश हा एकटाच असा जिवलग मित्र होता जो की कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे होता. हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्याला शहरातील नामवंत दवाखान्यात भरती करण्यात आले होते. पैश्याची काही कमतरता नव्हती, डॉक्टरांनी देखील खूप प्रयत्न केला पण लक्ष्मीकांतचा जीव ते वाचवू शकले नाहीत. गणेश दवाखान्यात पोहोचला आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली. लक्ष्मीकांतला दोन मुले होती आणि दोन्ही मुले परदेशात होती. गणेशने दोन्ही मुलांना लक्ष्मीकांतच्या जाण्याची बातमी कळवली पण दोघांनी देखील भारतात येण्यास असमर्थता दर्शविली आणि अंत्यसंस्कारची प्रक्रिया गणेशने करून घ्यावी म्हणून विनंती केली. लक्ष्मीकांतची पत्नी कोरोना काळात देवाघरी गेली होती. तिच्या अंतिमसंस्काराला त्यावेळी सुद्धा कोणालाही हजर राहता आले नाही. दोन्ही मुले परदेशात होती म्हणून येऊ शकले नाहीत. फक्त लक्ष्मीकांत तेवढा त्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होता. ते ही लांबूनच दर्शन करावे लागले. यावेळी देखील लक्ष्मीकांतचे अंत्यसंस्कार मुलांच्या अनुपस्थितीमध्ये होणार हे जाणून घेऊन गणेशला अतीव दुःख झाले. पण तो काय करणार ? त्याने दवाखान्यातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून लक्ष्मीकांतची बॉडी घेऊन तो त्यांच्या बंगल्यावर गेला. बंगल्यावर लोकांची खूप गर्दी होती. सर्वांनी लक्ष्मीकांतचे अंतिम दर्शन घेतले आणि गणेशने आपल्या प्रिय मित्राला अग्नीच्या स्वाधीन करून टाकले. त्यादिवशी रात्री तो खूपच बेचैन होता. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे गोल गोल फिरत होती. लक्ष्मीकांत हा एक करोडपती होता, त्याला पैश्याची काही कमी नव्हती तरी तो सुखी व समाधानी होता का ? त्याला कौटुंबिक सुख मिळाले का ? अंत्यसंस्काराला त्याची दोन्ही मुलं नव्हती तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का ? असे नाना प्रकारचे प्रश्न त्याच्या डोक्यात घुटमळत होते.
लक्ष्मीकांत आणि गणेश बालपणीचे मित्र. एका शाळेत शिकलेले, एकत्र खेळलेले आणि एकत्रच मोठे झालेले. तसे ते दोघेही गरीब घरातले होते. अभ्यासात जेमतेम पण अत्यंत मेहनती आणि कष्टाळू होते. लक्ष्मीकांतला लक्ष्मीचं वरदान होतं तर गणेशला सरस्वती मातेचे. शाळेत शिकत असतांना लक्ष्मीकांत नेहमी कोणत्या कोणत्या उद्योगाचा विचार करत राहायचा. त्याला भविष्यात उद्योग करायचं होतं. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त खरी कमाई म्हणून एक उपक्रम राबविला जात असे. ज्यात ज्या विद्यार्थ्यांने जास्त कमाई केली त्याला बक्षीस दिल्या जायचं. या स्पर्धेत लक्ष्मीकांत दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवायचा. दोघांनीही कसे बसे दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्या. गणेश आपलं पुढील शिक्षण चालू ठेवला तर लक्ष्मीकांत ने आपलं शिक्षण बंद करून सायकल विक्रीचा एक छोटासा दुकान टाकलं. त्या दुकानाचं नाव होतं " लक्ष्मी सायकल दुकान. "
तीन-चार वर्षानंतर छोटेखानी असलेले लक्ष्मी सायकल दुकान मोठे झाले. शहरात त्याच्या दुकानाशिवाय अन्य कोणते सायकलचे दुकान त्याच्या तोडीचे नव्हते. त्यामुळे लक्ष्मीकांतच्या दुकानाची खूप चलती होती. इकडे गणेशने पदवी मिळवून एका सरकारी कार्यालयात बाबूची नोकरी मिळविली. अधूनमधून त्यांची भेट होत होती आणि गप्पा देखील होत होत्या. एक-दोन वर्षांनी दोघेचेही लग्न झाले. लक्ष्मीकांत शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी व श्रीमंत व्यक्ती झाला होता त्यामुळे त्याची सोयरीक शहरातल्या प्रसिद्ध उद्योगपतीच्या एकुलती एक मुलगी कमला सोबत झाली. त्यामुळे त्याची संपत्ती आता डबल झाली होती. तर गणेशची सोयरीक एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी साधना सोबत झाली. दोघांचाही संसार सुखाचा आणि सुरळीत चालला होता. चार-पाच वर्षात दोघांच्याही संसार वेलीवर दोन-दोन फुले उमलली. लक्ष्मीकांत ला दोन मुले तर गणेशला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. लक्ष्मीकांतची दोन्ही मुले इंग्रजी शाळेत शिकू लागली तर गणेशची मुले मराठी शाळेत. अधूनमधून काही कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबाची गाठभेट होत असे. कमला श्रीमंत घरातील मुलगी होती पण तिला गणेश व साधना खूप जवळच्या वाटू लागल्या. ती कधीही त्या दोघांना दूर केलं नाही. ती भरभरून प्रेम देत होती. मुले देखील एकमेकांत मिळून-मिसळून राहायचे. लक्ष्मीकांतच्या दोन्ही मुलांना गणेशचे घर, त्यांच्या घरचे जेवण आणि तेथील परिसर खूप आवडायचा. त्यामुळे ते गणेशच्या घरी आले की मनसोक्त खेळायचे. खास दिवाळीच्या सणानिमित्त ते दरवर्षी यायचे आणि खूप मजा करायचे. लक्ष्मीकांत वरचेवर श्रीमंत होत होता. आता त्याने लक्ष्मी अँड सन्स नावाने एक समूह तयार केला होता. परदेशात देखील त्याने आपला पैसा गुंतवला होता. त्यामुळे परदेशात देखील त्याचा कारभार वाढीस लागला होता. मुलं समझदार झाल्यावर दोन्ही मुले परदेशातील व्यवहार सांभाळण्यासाठी निघाले. तर इकडे गणेशच्या मुलाने देखील आपले शिक्षण पूर्ण करून एका सरकारी कार्यालयात नोकरी मिळविली होती. लक्ष्मीकांतने गणेशच्या मुलाला आपल्या कंपनीत सीईओ पदाची ऑफर केली होती. पण गणेश म्हणाला, " मित्रा, आपल्यात जे नाते आहे, ते मैत्रीचे आहे. माझा मुलगा तुझ्या कंपनीत सीईओ बनला तर लोकं मला नावं ठेवतील. मैत्रीचा फायदा घेऊन गणेशच्या मुलाने हे पद मिळवलं आहे. मग आपल्या मैत्रीला तडा गेला असता." त्याच्या अश्या बोलण्यावर लक्ष्मीकांत काहीच बोलला नाही. लक्ष्मीकांतच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आणि ते दोघे परदेशात स्थायिक झाले. गणेशच्या मुला-मुलीचे लग्न झाले. मुलगी सासरी गेली तर मुलगा व सुनसोबत गणेश राहू लागला. खूप मोठ्या बंगल्यात लक्ष्मीकांत आणि कमला घरात दोघेच राहत होते. काम करायला नोकर चाकर होते. घरात सुख, समृद्धी, पैसा खूप होता पण गणेशच्या घरासारखे समाधान मात्र नव्हते. त्यामुळे अधूनमधून कमला ही साधनाकडे जात असे आणि खूप वेळ तिच्याशी गप्पा-टप्पा करत असे. तिला ही वाटत होते की एक तरी मुलगा आणि सून सोबत राहावे पण व्यापारामुळे ते अशक्य होते. लक्ष्मीकांतचा वेळ उद्योगात जात होता मात्र कमलाचा वेळ काही जात नव्हता. तशातच कोरोना व्हायरसने एन्ट्री केली. त्यामुळे घरातून बाहेर जाणे व साधनाची भेट घेणे देखील शक्य होत नव्हते. त्यामुळे तिची मनस्थिती बिघडली. कोरोना घरात प्रवेश घेऊ नये म्हणून सर्व काळजी घेतली गेली. पण का ? कोण जाणे ? त्या मोठ्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला. कमला कोरोना पॉजिटिव्ह निघाली. तिची मनस्थिती अगोदरच बिघडली होती आणि त्यात कोरोनाची लागण झाली असे कळताच. ती खूपच हळवी झाली. कोरोना रोगामुळे मरणाऱ्या लोकांच्या बातम्या तिच्या कानावर येत होते. आपले मन हलकं करण्यासाठी ती आपली जिवलग मैत्रीण साधनाला फोन लावली, ' साधना, मला खूप भीती वाटायला लागली बघ. या घरात माझं दम कोंडायला लागलंय. मी मरतो की काय ? असे वाटू लागलंय. माझ्यानंतर यांचं कसं होईल ? तू आणि गणेश यांची काळजी घ्याल ना !" रडत रडत ती बोलत होती. साधना देखील फोनवरून समजावून सांगू लागली, " कमला, हे बघ, काही होणार नाही. थोडंसं धीर धर. पहिले दोन दिवस थोडा त्रास होईल नंतर तू नीट होशील. धीर खचू नको. बाहेर कर्फ्यु आहे, अन्यथा मी तुझ्याकडे आले असते. काळजी करू नको, जरा धीर धर." असे म्हणून तिने फोन ठेवला. त्याच रात्री कमलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून दवाखान्यात भरती करण्यात आलं. मध्यरात्र उलटली होती आणि साधनाच्या कानावर बातमी आली की कोरोनामुळे कमलाचा मृत्यू झाला. लक्ष्मीकांतवर आभाळ कोसळलं होतं. कोरोना सर्वत्र पसरला होता. वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे परदेशात असलेली दोन्ही मुले येऊ शकली नाहीत. मनात इच्छा असून देखील गणेश आणि साधना कमलाच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाहीत. आपल्या प्रिय पत्नीला लक्ष्मीकांतने दुरूनच निरोप दिला. कोरोनामुळे सर्वांचे हाल झाले. उद्योगधंदे ठप्प झाले. सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजला होता. फक्त फोनवर बोलणे होत होते. काही काळ लोटल्यानंतर जीवन पूर्ववत चालू झाल्यावर गणेशने लक्ष्मीकांतची भेट घेतली. कमला गेल्यापासून तो खूपच एकटा पडला होता. त्याला हे जीवन नकोसे वाटत होते. थोडं दारूच्या आहारी देखील गेला होता. सायंकाळी दारू पिल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती. दिवस कसा तरी संपत होता मात्र रात्र काही संपत नव्हती. तो गणेशला म्हणाला, " गणेश, मी आयुष्यभर पैश्याच्या मागे धावत राहिलो. पैसा मिळत गेला आणि मी अजून पैसा मिळावा म्हणून प्रयत्न करत राहिलो. पण कधी माझ्या समाधानाचा विचार केला नाही, जसा तू विचार केलास. तू माझ्याएवढं श्रीमंत नाहीस पण माझ्यापेक्षा खूप समाधानी आहेस." यावर गणेशने त्याची खूप समजूत काढली, आपल्या लेकरांना परत भारतात येण्याचे सांग असा म्हणत असे. लक्ष्मीकांतने तसा फोन देखील केला होता. पण दोन्ही मुले भारतात येण्याच्या तयारीत दिसत नव्हते. त्यादिवशी देखील लक्ष्मीकांतचे दोन्ही मुलांसोबत फोनवर बोलणे झाले. बोलण्यात काहीतरी कमी जास्त झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आणि हार्टअटॅक आला. लागलीच लक्ष्मीकांतला दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांच्या प्रयत्नाला काही यश मिळालं नाही. खरंच जीवनात पैसा कमावणे हे खूप महत्वाचे असेल ही कदाचित पण कमावलेल्या पैशाचे विनोयोग स्वतःच्या सुखासाठी करणे किती जणाला जमते ? ज्याला हे जमते तोच खरा यशस्वी होय. नुसता पैसासम्राट राहून काही फायदा आहे का ? जीवनात पैसा जरूर मिळवावा सोबत आत्मिक समाधान देखील मिळवावे म्हणजे जीवनात समृद्धी मिळत राहील.
- नासा येवतीकर, धर्माबाद, 9423625769
Comments
Post a Comment