लघुकथा - संशयाचा बळी

संशयाचा बळी

राजाने घरातल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली ही बातमी गावात पसरायला वेळ लागली नाही. राजा आणि अनुसया आपल्या दोन लेकरासह गावाजवळच्या शहरात किरयाच्या खोलीत राहत होते. त्यांच्या दोघात काही वाद झाला नाही, ते गुण्या गोविंदाने राहत होते तरी राजाने आत्महत्या का केली ? याबाबत संपूर्ण गावकरी हैराण झाले होते. पाच वर्षांपूर्वी राजाराम आणि अनुसया यांचं लग्न झालं होतं तो लग्न नसून लव्ह मॅरेज होतं असे म्हटले तरी काही चुकीचे नव्हते. राजाराम शहरातल्या किराणा दुकानात काम करत होता. तर त्याच्याच शेजारी राहणारी अनुसया नुकतीच बारावीची परीक्षा पास होऊन शहरातील कॉलेजमध्ये पदवीला प्रवेश घेतली होती. अनुसया दिसायला खूप सुंदर होती. तसेच आठराव्या आणि एकोणिसाव्या वर्षात तर ती अजूनच सुंदर दिसू लागली. तशी राजाराम रोज तिच्याकडे टक लावून पाहत असे. राजा सायकलवर शहरात जायचा तर अनुसया बसने जायची. मधल्या सुट्टीत राजा कॉलेजमध्ये चक्कर मारायचा, ती दृष्टीस पडेपर्यंत थांबायचा, दोघांची नजरानजर झाली की मग परत आपल्या कामावर जायचा. एकदा कॉलेजमधील काही टवाळकी पोरं अनुसयाला सतावीत असताना राजाने सोडवणूक केली मग काय अनुसया राजावर फिदाच झाली. शहरात त्याचे भेटणे वाढू लागले. अनुसया कॉलेजात कमी आणि बाहेर जास्त राहू लागली तशी ही वार्ता त्यांच्या आई-वडिलांच्या कानावर गेली. तसे राजाराम व अनुसया एकाच जातीचे आणि सोयीरपणातले असल्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी विचार केला की, यांचे उघड उघड फिरणे बंद करून यांना लग्नाच्या बेडीत अडकवलेले बरे. म्हणून त्यांनी विवाह मुहूर्त काढून दोघांचे ही लग्न अगदी थाटामाटात लावून दिले. लग्नानंतर अनुसयाचे कॉलेज जाणे बंद झाले पण तिला शिकण्याची ईच्छा होती. ती रोज राजारामला भंडावून सोडत असे. शेवटी राजाच्या वडिलांनी त्यांची समजूत काढली आणि पदवीची परीक्षा देऊ दे म्हणून शहरात त्यांना एक किरायाची खोली करून दिली. राजा आणि अनुसया यांचे रोजचे जाणे येणे बंद होऊन ते शहरात राहू लागले. राजा दुकानात जात आणि अनुसया कॉलेजला. मध्यंतरच्या सुट्टीत तो कॉलेजमध्ये चक्कर मारत असे. अनुसया डोळ्यास दिसली की तो परत कामावर जात हा त्याचा नित्यक्रम होता. एक-दोन वेळेस अनुसया कॉलेजच्या व्हरांड्यात कुणा मुलांशी बोलताना राजाला दिसली तसा राजाच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण होऊ लागले. त्याच्या मनात ते घर करून राहू लागले. त्याने एक दोनदा त्या मुलांविषयी अनुसयाला विचारला देखील पण अनुसयाने तो मुलगा वर्गातील हुशार मुलगा आहे आणि अभ्यासाच्या वह्या व नोटस त्याच्याकडून घेत असते, असे तिने सांगितले. पण राजाच्या मनात जे संशय निर्माण झाले ते दिवसेंदिवस अधिक दाट होत चालले होते. पदवीची परीक्षा जवळ आली होती आणि ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी देखील. दोघांनाही खूप आनंद झाला. पदवीची परिक्षा संपली आणि राजाने शहरातील किरायाची खोली सोडून गावी जाऊन राहू लागला. काही दिवसांत त्यांच्या घरात गोंडस परीने जन्म घेतला. साऱ्यांनाच याचा खूप आनंद वाटलं. त्या आनंदात अजून एक आनंद म्हणजे ती पदवीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाली. अनुसया मुळात हुशार मुलगी होती आणि तिला पुढे शिकायचे होते. त्यासाठी तिने परत तगादा लावला. यावेळी ही राजा ला माघार घ्यावेच लागले. परत ती शहरात किरायाच्या खोलीत येऊन राहू लागली. यावेळी अनुसयाची आई काही दिवसासाठी तिच्या सोबत होती लहान बाळाचा सांभाळ करण्यासाठी. चांगले मार्क पडल्याने तिने बी. एड. करण्याचा निर्णय घेतला आणि तसा फॉर्म देखील भरली होती. जिल्ह्याच्या कॉलेजमध्ये तिचा नंबर लागला होता. परत तिच्यापुढे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. पण एक वर्ष कसे तरी काढू या ह्या समजुतीवर ती आपल्या आईसोबत जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेली. महिना-दोन महिन्यांच्या गाठीभेटीत एक वर्ष कसे संपले हे कळालेच नाही. तिचे बी. एड.चे शिक्षण पूर्ण होतांना ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. काही दिवसांत त्यांच्या वेलीवर एका मुलाने जन्म घेतला आणि त्याच काळात ती बी. एड. पास झाल्याची वार्ता आली. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. तिला घरात स्वस्थ बसावे वाटत नव्हते. एवढ्या शिक्षणाचा काही फायदा व्हायला पाहिजे आणि आपल्या संसाराला ही हातभार लागला पाहिजे म्हणून शहरातील काही शाळेत शिक्षिका म्हणून अर्ज केला. एका खाजगी शाळेत तिला नोकरी मिळाली होती. राजा आता दुकानात जात होता तर ती शाळेत. आपल्या सुंदर बायकोविषयी राजाच्या मनात मात्र संशय दिवसेंदिवस गडद होत चालले होते. कॉलेजमधील मित्र तिला आज ही रस्त्यात भेटल्यावर हाय हॅलो करत असताना पाहून याची तळपायाची आग मस्तकाला जात होती. शाळेत देखील अनेक शिक्षक मंडळीसोबत तिचे बोलणे व्हायचे हे त्याच्या कानावर जाऊ लागले तसा त्याचा संशय अजून जास्त बळावू लागला. तो मनातल्या मनात खंगत चालला होता. त्यादिवशी अनुसयाच्या शाळेची सहल गेली होती.अनुसया आपल्या दोन्ही लेकरांना सोबत घेऊन सहलीला गेली होती आणि राजाच्या दुकानाला सुट्टी असल्याने घरीच थांबला होता. त्याच्या मनात विचाराचे काहूर उठले होते. तो सदा न कदा तिच्याच विषयी विचार करत होता. आजकाल अनुसया आपल्याकडे पाहत देखील नाही आणि पूर्वीएवढं प्रेम ही करत नाही. आपल्या पेक्षा ती जास्त शिकलेली आहे त्यामुळे ती आपली ओळख ही कोणाला देत नाही. आपण तिच्या जीवनात आज दगड बनून राहिलो आहोत असा विचार त्याच्या डोक्यात घोळत राहिला आणि पुढच्याच क्षणी त्याने दार बंद केला आणि छताला टांगलेल्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अनुसया सहलीवरून परत आल्यावर हे दृश्य पाहून एकच टाहो फोडला. राजाने गळफास का घेतला असेल हे तिला देखील सुचेना, तिचे राजावर अफाट प्रेम होते पण कामाच्या व्यापात ती कधी व्यक्त केली नाही. तेवढ्यात पोलीस आले त्यांनी पंचनामा केला. सर्वांची जुबानी घेतली आणि पुढील कार्य पार पडले. राजाने मनात संशय न ठेवता अनुसयाशी याबातीत संवाद साधला असता तर त्यांचा संसार सुरळीत चालू राहिला असता. असे अनेक राजा आणि अनुसया अजून ही संशयाच्या भोवऱ्यात गिरक्या खात आहेत. वेळीच त्यावर औषध म्हणजे संवाद साधून मनातल्या भाव भावना मोकळे करणे, त्यामुळे पुढील अनेक अनर्थ टाळता येऊ शकतात. संशयाचा बळी होण्यापेक्षा संशयाला सुळावर चढविणे अधिक योग्य राहील.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

( ही लघुकथा काल्पनिक असून नावे देखील काल्पनिक आहे. या कथेचा प्रत्यक्ष जीवनात कुठे साधर्म्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान