लघुकथा - पाथरवट
लघुकथा - पाथरवट
निळे सर पाचव्या वर्गात हजेरी घेत होते. राजू मोघे हे नाव घेतल्यावर क्षणभर थांबले. शाळा सुरू झाल्यापासून हा विद्यार्थी शाळेत आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तो नियमित शाळेत येत होता पण यावर्षी तो एकही दिवस शाळेत का आला नाही यावर सर विचार करू लागले. निळे सर बालरक्षक म्हणून काम पाहत होते. राजू शाळाबाह्य होऊ नये याची चिंता त्यांना सतावत होती म्हणून सर मुलांना विचारू लागले, " अरे हा राजू गावात आहे की नाही. ? " मुलांनी एकच कल्लोळ करीत म्हणाले " आहे सर, तो रोज निसर्ग हॉटेलात काम करतो, तेथेच खातो आणि रात्री उशिरा आपल्या घरी येतो. " पोरांना राजू बाबत हे सारं माहीत होतं. त्याच्या घरी जाऊन काही फायदा नाही म्हणून निळे सर मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. सरांना पाहताच राजू काही बाहेर येईना. मालक राजूच्या नावाने ओरडत होता, " हे राजू, बघ गिऱ्हाईकला काय पाहिजे विचारून घे " पण राजू काही बाहेर येईना, मालक रागात जोराने बोलल्यावर तो बाहेर आला आणि निळे सरांच्या टेबलावर जाऊन भीत भीत विचारलं, " काय पाहिजे सर ? " सरांनी लगेच त्याचा हात धरला आणि विचारलं, " सांग शाळेत का येत नाहीस ? काय प्रॉब्लेम आहे ? " तो आणखीनच रडवेला झाला. " सर तुम्हांला उद्या शाळेत येऊन सांगतो. उद्या आमचं हॉटेल बंद राहते. पण आत्ता सोडा मला " राजू म्हणाला. हॉटेल मालकांसमोर काही बोलता येत नाही म्हणून राजू तसा बोलला असेल असे सरांना वाटले. दुसऱ्या दिवशी खरोखरच राजू शाळेत आला. निळे सरांनी त्याला वेगळ्या खोलीत घेऊन गेले आणि त्याचे म्हणणे ऐकू लागले. राजू आपली कर्म कहाणी सांगू लागला, " सर, मी खूप गरीब आहे. माझ्या घरी माझ्यापेक्षा लहान तीन भावंडं आहेत, आई दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करते, मी हॉटेलात काम करतो आणि त्याच पैश्यावर आमचं घर चालते. " हे ऐकून निळे सर म्हणाले, " बाबा काय काम करतात ? " यावर राजू रडत रडत म्हणाला, " बाबा, जमेल तेवढं हमालीचं काम करतात आणि येतांना त्या मिळालेल्या पैशाचे दारू पितात. त्यामुळं मला काम करणं आवश्यक आहे नसता आमचं घर कसं चालेल ? " निळे सर राजुचे बोलणे ऐकून स्तब्ध झाले. राजू तसा लिहण्या-वाचण्यात चांगला मुलगा होता आणि शाळेतील प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याचा सहभाग असायचा. त्यामुळे त्याला कसे ही करून शिकवायचं असा निळे सरांनी मनातल्या मनात निर्धार केला. राजूला हॉटेलात महिन्याचा किती पगार मिळतो हे विचारलं तेंव्हा त्याने उत्तर दिलं की, " महिन्याला हजार रु. पगार आणि दोन वेळाचे जेवण मिळते " सरांनी ठीक आहे एवढंच म्हटलं आणि राजूला घरी जाण्यास सांगितलं. निळे सरांनी डोक्यात एक कल्पना तयार केली आणि ती कल्पना आपल्या इतर मित्रांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निळे सर आणि त्यांचे मित्र निसर्ग हॉटेलात चहा पिण्यासाठी गेले. तसा मालकाने राजूला नेहमीप्रमाणे आवाज दिला. निळे सरांना पाहून राजू आज घाबरला नाही तो थेट टेबलाजवळ गेला आणि त्यांची ऑर्डर घेतली. तो चहा घेऊन येतांना निळे सरांच्या मित्रांपैकी एका मित्राने राजूला उभं राहायला सांगितलं. तसा राजू जागेवरच थांबला. तो मित्र एक पत्रकार होता, त्याने हॉटेल मालकाला विचारलं की, " हा मुलगा आपल्या हॉटेलात किती दिवसापासून काम करतो ? " मालकाची जराशी बोबडी वळाली, तो म्हणाला, " साहेब आजच आलाय, काही तरी काम द्या म्हणाला म्हणून त्याला ठेवलं" " पण हा तर बालकामगार दिसतोय, बालकामगार कामावर ठेवणे हा तर गुन्हा आहे. तुम्ही कसे काय यास कामावर ठेवलं ? " मालकाची आता पूर्ण बोबडी वळाली होती. साहेब माफ करा यापुढे असं होणार नाही, फोटो काढू नका म्हणून तो विनंती करत होता. मित्राने ठरवलेल्या नियोजनानुसार मालकांना म्हणाला की, " तू बालकामगार ठेवण्याचा एक गुन्हा केला आहेस म्हणून तुला एकच शिक्षा की तू याचा महिन्याचा पगार जे काही आहे ते त्याला नियमित देत जा. त्याच्या मदतीने त्याचे शिक्षण पूर्ण होईल आणि तुला आशीर्वाद मिळेल. त्यात खंड पडू देता कामा नये. " बदनामीपेक्षा त्याला ही शिक्षा बरी वाटली. तो राजुच्या खात्यात दरमहा हजार रु. टाकण्याचे कबुल केले आणि तसे जबाबदारीपूर्वक पूर्ण करत होता. निळे सरांचे एक मित्र पोलीस होते. त्या पोलिस मित्राच्या मदतीने राजुच्या बापाला ही दारूची सवय सोडायला लावली. बापाने फुकटचा पैसा नको म्हणत निसर्ग हॉटेलात मुलांच्या जागेवर काम करायला सुरुवात केली. राजुला जे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नव्हते हा त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर निळे सरांनी छान कल्पना शोधून काढली आणि राजुला खरा न्याय मिळाला. त्यावर्षी निळे सरांच्या अथक प्रयत्नामुळे शाळाबाह्य होत असलेल्या राजूला नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवून दिले व त्याला नवोदय विद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश मिळाला. त्याच्या पुुुढील शिक्षणाची काळजी ही मिटली. पाथरवटच्या हातात एखादा दगड आला की, त्यावर छन्नीचे घाव घालून एक सुंदर मूर्ती तयार करतो अगदी त्याचप्रकारे शिक्षकांचे काम असते. निळे सरांनी पाथरवटासारखे काम करून राजूला घडविले.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769
Comments
Post a Comment