परीक्षेचे दिवस
परीक्षेचे दिवस
आज शाळेतील मुले शेवटचा पेपर संपल्यावर एकच कल्ला केले आणि शाळेला सुट्या लागल्या म्हणून उड्या मारत मारत घरी गेले. अजून एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकविण्याचा दिवस येण्यास 20-25 दिवस शिल्लक होते. पण मुलांच्या परीक्षा संपल्या आणि त्यांना सुट्या लागल्या या आवेशात मुले नाचत गेली. मुलांना जरी सुट्या लागल्या असल्या तरी शिक्षकांना एक मे पर्यंत सुटका नव्हती. काही काळ लोटला असेल तोच केंद्रप्रमुख साहेबांचा व्हाट्सअप्प वर एक पत्र येऊन धडकलं, त्यात लिहिलं होतं की, परीक्षा संपली असली तरी मुलांना रोज एक-दोन तास अध्यापन करायचे आणि शालेय पोषण आहार देऊन सुट्टी द्यायची. गुरुजीला तसा प्रश्न पडला की आत्ता काय करायचे ? पोरं तर सारी गेली. गुरुजींच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह खूप वेळापर्यंत तसंच दिसत होतं. काय करावं कळेना ? एका मुलास बोलावून त्याला सांगितले की, उद्या शाळेत मिठाई वाटप होणार आहे, सर्वाना या म्हणावं. एवढं सांगून गुरुजी निघाले आपल्या घराकडं आणि तो मुलगा गेला गावात सर्वाना ही गोड बातमी देण्यास. त्याने जवळपास सर्व मुलांना सांगितली तरी ही काही मुलं गावसोडून गेली होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजी शाळेत आले आणि घंटा वाजविली. तसे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच पोरं आली होती. सर्वाना बातमी देऊन देखील मुलं शाळेत आली नाही म्हणून गुरुजींनी त्या पोराला टवकारलं आणि रागात विचारलं अरे, पोरा, खरं सांगलास का ? होय गुरुजी त्याने भीत भीत होकार दिला. थोड्या वेळाने अजून दोन चार मुलं आली असं तसं करून पन्नास टक्के मुलं उपस्थित झाली. सर्व मुलांना एकाच वर्गखोलीत बसवून गुरुजी आपले परीक्षेचे काम करण्यास बसले. पोरांची परीक्षा संपल्यावर तर खरी गुरुजींची परीक्षा सुरू होते. म्हणजे पेपर तपासणे, त्याचे मार्क भरणे, मार्क मेमो तयार करणे, मुलांच्या नोंदी लिहिणे असे एक नाही असंख्य काम असतात. त्यातच या मुलांचा गोंधळ चालू असतो. गप्प बसा, बोलू नका, धिंगाणा करू नका, मारामारी करू नका असे समजावून सांगण्यात गुरुजींचा वेळ जातो आणि परीक्षेचे काम तसेच खोळंबत राहते. गुरुजी काही तरी मिठाई देतो म्हटले होते, दुपार झाली तरी अजून काही मिळालं नाही म्हणून तो मुलगा उभा राहातो आणि सरांना म्हणतो सर मिठाई देतो म्हणालात की ...! सर त्याच्याकडे रागावून पाहतात आणि लगेच नरमाईच्या सुरात म्हणतात आज विसरलो आणायचं, उद्या नक्की आणेन. मुलगा बरं असे म्हणून बसून घेतो. बाहेर ऊन वाढत राहते. उन्हाचा कडाका वाढण्यापूर्वी घरी जावे या विचाराने गुरुजी आपले काम गुंडाळतात आणि घरी जातात. असं रोजच घडत असते. अधून मधून केंद्रप्रमुख साहेब फोन वरून किती विद्यार्थी उपस्थित होते याचा आढावा घेत असतात. मध्येच मुलांसोबत एखादी सेल्फी पाठवा म्हणून संदेश देतात. दिवस निघून जातात आणि गुरुजींचा परीक्षा तपासणीचा काम खोळंबून राहतो. हे पोरं शाळेत राहिली नसती तर काम लवकर आटोपलं असतं गुरुजी असे मनोमनी म्हणत पत्र काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावानं बोटं मोडीत असतो. ज्यांना कोणत्याच गावाला जायचं सोयरसुतक नव्हतं असेच पोरं शाळेत येऊन दंगा मस्ती करीत होती आणि गुरुजींच्या डोक्याला ताप देत होती. पोरांना घरी भी जा म्हणता येईना आणि परीक्षेचं काम भी होईना गुरुजीला काय करावं हेच सुचेना. मुलांना शिकवित बसलं की लई शांत बसतात. त्यांच्या डोक्याला काही काम दिलं की ते त्यात गुंग राहतात. गुरुजीला तीच तर युक्ती सुचली. गुरुजींने मग त्या मुलांना असं काही काम लावलं की, मुलं चिडीचूप झाली आणि गुरुजीचं परीक्षेचे काम फते झालं. झेंडावंदनापूर्वी केंद्रप्रमुख साहेबांना परीक्षा रजिस्टर दाखवलं आणि त्यावर सही घेतलं तेंव्हा कुठं गुरुजींचा जीव भांड्यात पडलं. परीक्षेचे असे दिवस साऱ्याच शिक्षकांच्या नशिबी येतात असे नाही पण ज्यांच्या नशिबात येतात ते खरोखरच परीक्षेचे दिवस कधीच विसरत नाहीत.
( संपूर्णपणे काल्पनिक स्वरूपात लिहिलेला लेख आहे. कुणाच्या भावना दुखावण्याचा मुळीच हेतू नाही. )
- नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक
Comments
Post a Comment