अनुभव हेच शिक्षण
••••••••••••••••••••••••••••
अनुभव हेच शिक्षण
••••••••••••••••••••••••••••
चार वाजता शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली तसे सारे मुले एकच कल्लोळ करीत बाहेर पडली. पाहता पाहता किलबिल किलबिल आवाजाने गजबजलेला शाळा परिसर एकदम शांत झाला. वरच्या वर्गातील एक-दोन मुले शिक्षकांस वर्ग बंद करण्यात मदत करीत होती. शाळेच्या व्हरांड्यात दुसऱ्या वर्गातील मुलगी आपले दप्तर उघडून बसली होती. गुरुजीला आश्चर्य वाटले की ही मुलगी शाळा सुटल्यावर घरी न जाता इथे का बसली असेल ? न राहवता तिला विचारले की,
" तू घरी जाणार नाही काय ..? "
ती पुस्तकात डोके ठेवून म्हणाली, " जाते ना, थोडं वेळ थांबुन " तिच्या गुरुजींनी दिलेला अभ्यास ती व्हरांड्यात बसून करत होती. कदाचित घरी गेल्यावर विसरते की काय म्हणून ती अभ्यास करत बसली होती. गुरुजी ती घरी का जात नाही म्हणून प्रश्न विचारला.
" कसे काय... ? " यावर तिने उत्तर देतांना म्हणाली,
" घरी कोणीच नाहीत....." हे उत्तर ऐकून गुरुजींना जरासे आश्चर्य वाटले म्हणून दुसरा प्रश्न विचारला,
" आई बाबा कुठे गेलेत....? "या प्रश्नाला तिने माहीत असलेला उत्तर देऊन टाकलं,
" ते कामाला जातात रोज. " गुरुजींनी मग तिला अजून बोलतं करण्यासाठी विचारलं,
" किती वाजता येतात .....? "तिला मात्र रोजचा अनुभव होता म्हणून ती वेळ काही सांगू शकली नाही मात्र म्हणाली,
" रात्री अंधार पडल्यावर येतात..." शाळा असेपर्यंत शाळेत राहणारी शाळा सुटल्यावर कोठे राहते हे जाणून घेण्यासाठी गुरुजींनी विचारलं,
" तू तोपर्यंत कुठे राहतीस .....?"
" माझ्याच घरी ..." तिने घराच्या कुलुपाची चावी दाखवत म्हणाली. यावर गुरुजी जरासे भीती वाटावे असा प्रश्न केला होता, कारण घरात एकटे राहणं जरा भीतीदायक वाटते म्हणून विचारलं,
" एकटी राहतीस ...."
" हो....." तिने न घाबरता उत्तर दिलं. तिला आता त्याची सवयच झाली होती ना ! शाळेतून घरी गेल्यावर आई-बाबा येईपर्यंत ही काय काम करत असेल म्हणून गुरुजी तिला विचारतात,
" काय काय करतीस एवढा वेळ....? "
" शाळेतून घरी जाते, थोडा वेळ वाचते, घर झाडून काढते, भांडे धुते, आणि आई येईपर्यंत भात करून ठेवते..." तिने आपला रोजचा दिनक्रम सांगितला. यावर गुरुजी म्हणाले,
" भाकरी किंवा पोळी करत नाही काय ...?"
" मला करता येत नाही..." ती जराशी नाराजी स्वरात बोलली. गुरुजींनी उत्सुकतेपोटी विचारले
" भाजी करता येते काय ...?"
" हो, वरण करता येते, परंतु आई करू देत नाही..." ती म्हणाली. त्या मुलीचे कौतुक वाटून गुरुजी म्हणाले,
" तुला भीती वाटत नाही काय एकटीला...?"
" नाही, कश्याची ही भीती वाटत नाही...." ती अगदी सहज म्हणाली. मनात एक शंका आली म्हणून गुरुजी विचारले
" रात्रीला आई-बाबा आले नाही तर कशी करतेस ...? "
" येतातच,......." ती खूपच विश्वासाने बोलत होती. तिचा विश्वास पाहून गुरुजी पुढे म्हणाले,
" आई घरी आल्यावर काय करते....?"
" आई घरी आल्यावर पोेळी किंवा भाकरी करते. मग वरण करते. आम्ही सर्व एकत्र बसून जेवतो आणि झोपी जातो...." तिने अगदी आनंदात उत्तर दिली आणि उड्या मारत मारत घराकडे पळाली.
गुरुजीचा तिच्या सोबत एक - दोन मिनीटात एवढा संवाद झाला तेंव्हा गुरुजींना तिचे कौतुक करावेसे वाटले. गुरुजींच्या तोंडून "व्वा, शाब्बास ! " एवढे शब्द तिच्यासाठी बाहेर पडले. इकडे आमच्या घरातील मुली बारावी शिकून पास होतात पण त्यांना एक दिवस घर सांभाळता येत नाही. जीवन-शिक्षणाचे ज्ञान शाळेतील पुस्तकातून मिळत नाही तर ती परिस्थिती त्यांना शिकविते. शाळेचा परिसरातून बाहेर पडताना उद्या शालेय परिपाठ मध्ये त्या मुलीचा सत्कार करण्याचे गुरुजींनी ठरविले आणि ते ही घराकडे परतले.
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769
Comments
Post a Comment