लालच बुरी बला है

लघुकथा - लालच बुरी बला है ।

"हॅलो, मी अमुक कंपनी मधून बोलतोय, आपला मोबाईल क्रमांक लकी विनर ठरला असून आपणांस 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. अभिनंदन " 
रमेशला एकाने फोनवर ही माहिती दिली. लगेच फोन कट देखील झाला. रमेशला या गोष्टीचा खूपच आनंद झाला. मनातल्या मनात तो जोरजोरात उड्या मारू लागला. काही मिनिटांनी त्याच्या मोबाईलवर मेसेज आलं होतं, ज्यात लिहिलं होतं की, त्याचा मोबाईल क्रमांकावर दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले असून ही रक्कम मिळविण्यासाठी काही अटी टाकण्यात आले होते. ज्यात प्रमुख अट म्हणजे, दहा लाख रुपयांचे जे काही आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आहे ते जवळपास पन्नास हजार रुपये अगोदर भरावे लागणार होते त्याशिवाय ही रक्कम त्याला परत मिळणार नव्हते. रमेश तो मेसेज वाचून खूप आनंदित झाला. दहा लाख रुपये मिळत आहेत तर पन्नास हजार भरायला काही हरकत नाही. या पैशातून एक छानशी टू व्हीलर घेऊ, मुलाला एक सायकल घेऊन देऊ आणि बायकोला मस्त एक - दोन तोळ्यांचे दागिने करू असा विचार करत त्याचा तो दिवस खूपच मजेत आणि आनंदात गेला. 
रमेश चांगला शिकलेला आणि होतकरू शेतकरी होता. तालुक्यापासून पाच सहा किमी अंतरावरील राजेवाडी ह्या गावात तो आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या घरात फक्त चारच जण होते, त्याची बायको, मुलगा, आई आणि तो स्वतः असे चार ही जण सुखात जीवन जगत होते. त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. शेती बऱ्यापैकी म्हणजे दहा एकर होती तर तीन एकरमध्ये पाणी देऊन भाजीपाला वगैरे उत्पन्न घेतल्या जात होते. त्यामुळे रमेशच्या घरात नेहमीच पैसा खेळत होता. रमेशला कोणत्याच गोष्टीची सवय नव्हती. तो बाहेर साधा चहा देखील पीत नसे. दारू, सिगारेट, तंबाखू, पत्ते खेळणे असे कोणतेच वाईट सवय त्याला नव्हते म्हणूनच काय त्याचे एक मित्र नव्हता व गावातील सर्व लोक त्याला कंजूष म्हणत असे. पण तो लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसे. आपले काम भले आणि आपण भले असे त्याला वाटायचे. तरी ही रमेश पैश्याच्या बाबतीत खूपच भूकेला असायचा. पैसा कसा कमवायचा याचं तंत्र त्याला चांगलं माहीत होतं. त्यांच्या बँकेच्या खात्यात लाख-दोन लाख नेहमीच पडून असायचे. त्यामुळे त्याला कशाची काळजी वा चिंता मुळीच नव्हती. रमेशने नुकतेच दहा हजार रुपयांचे स्मार्ट फोन विकत घेतले होते. काही दिवसांनीच त्याला लॉटरी लागल्याची बातमी कानावर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत एक मेसेज आलं की, आजच्या आज पन्नास हजार रुपये भरले तरच आपणाला दहा लाख रुपये मिळतील अन्यथा आपणास हे पैसे मिळणार नाहीत. हा मेसेज वाचून रमेश विचार करू लागला. काय करावं ? पैसे भरावं की भरू नये ? कुणाला याबाबत सल्ला विचारावं म्हटलं तर गावात कोणीच मित्र नाही. अखेर मनाशी पक्का विचार केला आणि उठून तोंडहातपाय धुतला. अंघोळ केला आणि बँकेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. आपल्या खात्यामधून त्याने मेसेजमध्ये दिलेल्या खात्यावर पन्नास हजार रुपये भरला आणि दहा लाखाचे स्वप्न घेऊन घरी परत आला. बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याचा फोन खणखणाला. तिकडून बोलणाऱ्याने भरलेले पैसे मिळाल्याचे सांगितले तसेच खात्यामध्ये रक्कम भरण्यासाठी रमेशच्या बँकेची माहिती त्वरित पाठविण्यास सांगितले. म्हणजे आजच्या आज त्यांच्या खात्यात ती रक्कम भरली जाईल. पैसे मिळाले असल्याचे फोन आल्यामुळे रमेशला खात्री पटली आणि त्याने क्षणाचाही विचार न करता बँक डिटेल्स पाठविला. त्याचे मन कुठे ही लागत नव्हते. कधी एकदा दहा लाख रुपये मिळतील असे त्याला वाटत होते. तास-दोन तासांनी परत त्या व्यक्तीने फोन केला, बँकेचे डिटेल्स मिळाले आहेत. पण या खात्यात काही तरी समस्या येत आहे ते सोडविण्यासाठी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल ते आम्हांला लगेच सांगा म्हणजे आम्हांला तुमच्या खात्यावर पैसे भरता येतील. रमेशने त्याला होकार दिला. पाच-एक मिनिटाने रमेशच्या मोबाईलवर ओटीपी आले आणि लगेच त्याचा फोन देखील आला. रमेशने मागेपुढे कसलाही विचार न करता त्या व्यक्तीला ती ओटीपी सांगून टाकला. काही वेळात आपणांस दहा लाख रुपये मिळतील असे स्वप्न तो पाहू लागला. परत थोड्या वेळात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. खूपच उत्सुकतेने त्याने तो मेसेज उघडला. ते मेसेज वाचल्याबरोबर त्याचे डोळे पांढरे पडले होते. तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. डोके चक्रावून गेले होते. त्याच्या खात्यात दहा लाख रु. जमा होण्याऐवजी खात्यात असलेले एक लाख एकवीस हजार रु. काढण्यात आले होते. त्याने लगेच त्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन लावला तर " तुम्ही डायल केलेला नंबर सध्या बंद आहे " असे म्हणत होता. किती तरी वेळा त्याने प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता. आपण या व्यवहारात पूर्णपणे फसलो आहोत याची जाणीव झाली होती. हाय रे देवा पाऊणे दोन लाख रुपयांचा चुना लागला असे मनातल्या मनात रडत होता. ही गोष्ट कोणाला सांगावी ? काय करावं ? त्याला काहीच सुचत नव्हतं. जेवणावर देखील त्याचे लक्ष नव्हते. बायकोने काय झालं म्हणून विचारलं पण तिला काही खरं बोलत नव्हता. काही नाही असे म्हणून वेळ काढत होता. त्यादिवशी खूप विचार केल्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याचे पक्के केले. सकाळी लवकर उठला, परत एकदा त्या क्रमांकावर फोन लावून पाहिला, परत तेच उत्तर येत होतं. लगबगीने शहरात जाण्यासाठी निघाला, रस्त्यात अनेक जण त्याला बोलत होते मात्र त्याचे कोठेही लक्ष नव्हते. कधी एकदा पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्या भामट्याला पकडून आत करतो असे त्याला झाले होते. काही वेळानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला, त्याच्या सोबत घडलेली करुण कहाणी सांगितली. पोलिसाने सर्व कहाणी ऐकली आणि या रमेशलाच शिव्याशाप देऊ लागले. तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला एवढं कळत नाही, तुम्ही तर चांगले सुशिक्षित दिसत आहात, असे कसे काम केलात ? हे सर्व ऐकून त्याचा पारा अजून चढत होता. त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि बँकेचा नंबर पोलिसांना देण्यात आले. पोलिसाने त्याची इंटरनेटच्या मदतीने माहिती काढली असता तो मोबाईल आणि बँकेची माहिती विदेशातली निघाली. हे काम खूपच अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हांला काही पैसे खर्च करावे लागेल. पोलिसाने हे काम करायला पैशाची मागणी केली तेंव्हा त्याला आश्चर्य वाटले. पण नाईलाज झाला होता. रमेशने तसे पैसे देण्याचे मान्य केले. महिना उलटला, दोन महिने उलटले पण त्या व्यक्तीचा काही पत्ता लागत नव्हता. प्रत्येक फेरीला रमेशला शे पाचशे रुपये खर्च येत होता. या साऱ्या बाबीला तो पूर्णपणे कंटाळला होता. आपण फुकटचे दहा लाख रुपये मिळतील अशी लालसा ठेवली ती एकदम चूक आहे. कष्टाने मिळालेलं पैसेच मनाला समाधान देऊ शकतात याची जाणीव झाली. " लालच बुरी बला है । " असे म्हणत तो पोलीस स्टेशनमधून जो बाहेर पडला तो कधी ही पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही. 

- नासा येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
9423625769

Comments

Popular posts from this blog

kashtachi kamai

कादंबरी - लक्ष्मी

व्यर्थ न हो बलिदान