अंधारातील दिवा
" सर आत येऊ का ?"
दारावर एक मुलगा उभा होता आणि आत येण्याची परवानागी मागत होता.
"अरे ये ना आत ये हे काय शाळा आहे काय परवानागी मागण्यासाठी "
तो आत आला सरांच्या पायाला स्पर्श केला आणि हातात पेढा देत म्हणाला
"सर मी दहावी पास झालो."
"अभिनंदन बेटा किती मार्क पडले ?"
" सर 83 टक्के पडले "
" व्वा ..! छान ..! अभिनंदन बेटा ..! भविष्यात अशीच प्रगती कर."
" धन्यवाद सर, आज मी जे काही मिळवले ते फक्त तुमच्यामुळे म्हणून सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे आलो"
" म्हणजे...? मला कळाले नाही, तु कोण आहेस ? तुझे नाव काय ?" सर मोठ्या आश्चर्यने विचारले.
" सर, मला नाही ओळखले ...! मी रमेश .."
सर आठवण करू लागले की हा कोणता रमेश ? काही आठवण येत नव्हती तेंव्हा रमेशने शाळेतील एक आठवण सांगितली जे की सर कधी ही विसरु शकत नाहीत.
" सर, मी रमेश, शेळी राखणारा ....."
असे म्हटल्यावर सराना सर्व आठवले. सरानी रमेशला खुप शुभेच्छा दिल्या आणि सोप्यावर बसायला ही सांगितले. रमेशची ओळख झाल्यावर सर खुप आंनदात दिसत होते. त्यांनी त्याला चहा-फराळ दिले आणि काही अडचण पडल्यास मला सांग असे बोलून त्याचा निरोप घेतला
रमेशची पाठमोरी आकॄति बघत पवार सर भूतकाळात गेले. रामपूर नावाचे गाव जेथे पाचवी वर्गापर्यंत शाळा होती आणि तीन शिक्षक तिथे शिकवित होते. त्यात पवार सराना त्या शाळेवर जाऊन जेमतेम एक वर्ष झाले होते. जून महीना उजाडला, शाळेला नेमके सुरु झाली होती. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जी मुले नियमित शाळेत येऊ शकत नाहीत त्यांची नावे हजेरी पटावरुन कमी करण्यात येणार होते. दुसऱ्या वर्गातील दोन आणि तिसऱ्या वर्गातील दोन अशी चार मुले मुख्याध्यापकाच्या रडारवर होती. ही मुले जर हजेरी वरुन कमी झाली तर शाळाबाह्य होतात आणि शासनाने शाळाबाह्य कोणी राहणार नाही याची काळजी घ्यावे अशी स्पष्ट सूचना केली होती. मुख्याध्यापकानी पवार सराना बोलावून घेऊन त्या चार मुलांच्या घरी भेट देण्यासाठी सांगितले. मग पवार सर त्या चार मुलांच्या भेटीसाठी शाळेबाहेर पडले. पहिल्यांदा रमेशच्या घरी त्यांचा प्रवेश झाला. शाळेपासून पन्नास पाऊल अंतरावर रमेशचे छप्पर होते. सकाळची वेळ असल्यामुळे सर्व जण घाईमध्ये होते. कोणी शेतात जायची घाई करीत होते तर कोणी जंगलात. रमेश देखील तयार होता. तो रोज 20-25 शेळ्या घेऊन जंगलात जातो. त्याचे त्याला काही पैसे मिळत होते. गुरुजींनी रमेशच्या वडिलांना समजावून सांगितले की रमेशला शाळेत पाठवा त्याची जागा जंगलात नाही तर शाळेत हाय. वडील काही ऐकायला तयार होत नव्हते. शेवटी एका अटीवर कसेबसे ते समजून घेतले आणि रमेशला शाळेत पाठविण्यास तयार झाले. तिथुन स्वारी निघाली शिल्पाच्या घरी. तसे तर शिल्पा, निता आणि कविता एकाच वाड्यात राहत होती. ह्या तिन्ही मुलीं त्यांच्या आईला घरकामात मदत करत होत्या आणि घरातील लहान भावंडे सांभाळत सांभाळत त्यांच्या बहिणी जे बीडी वळत होते त्यांच्यासोबत ह्या मुली बीडीला दोरा बांधण्याचे काम करीत असत. एकीला बघून एकी शाळेत येत नव्हते आणि घरच्या लोकांना मदत करीत असल्यामुळे कोणी काही म्हणत नव्हते. पण पवार सर त्यांच्या आई-बाबांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले असता ते ही एका अटीवर राजी झाले. पवार सर आनंदात शाळेत परत आले आणि मुख्याध्यापकाना घडलेला वृतांत सांगितला. यावर मुख्याध्यापक हसायला लागले आणि म्हणाले, सर तुम्हाला वाटते की, ते शाळेत येतील म्हणून ...? पण पवार सरला विश्वास होता की ते येतील म्हणून. अर्ध्या तासानंतर सर्वात पहिल्यांदा रमेश शाळेत आला सोबत त्याच्या शेळ्या होत्या. मुख्याध्यापकानी हे पाहिले आणि म्हणाले अरे रमेश ह्या शेळ्या कुठे आणला आहेस ? यावर रमेश म्हणाला, सरच म्हणाले की, शेळ्या घेऊन का होईना पण शाळेत ये म्हणून मी आलो. नाही तर चाललो मी जंगलात. हे ऐकताच मुख्याध्यापक पवारसरा कडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. पवार सरानी होकरार्थी मान हलविली आणि रमेशला घेऊन वर्गाकडे जाऊ लागले. शाळेच्या मोकळ्या मैदानात सर्व शेळ्या सोडून रमेशला वर्गात बसविले आणि मुलांना सक्त ताकीद दिली की रमेशला कोणी त्रास देऊ नये. दहा-पंधरा मिनीटानंतर शिल्पा, निता आणि कविता आपल्या लहान भावंडाना घेऊन शाळेत आली. मुख्याध्यापक या तीन मुलींना शाळेत भावंडे आणु देत नसत त्यामुळे ते तिघी शाळेत येत नव्हते. आत्ता ही मुख्याध्यापक रागात आले होते पण पवार सरानी काही म्हणू दिले नाही. पालक याच अटी वर तर मुलीला शाळेत पाठविण्यास तयार झाले होते. एक महिना असेच चालले होते. पवार सर त्याच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. हळू हळू त्यांना लिहिण्याची आणि वाचण्याची गोडी लागली. दोन महिन्यानंतर रमेश शाळेकडे एकटा येताना दिसला. त्याच्या सोबत आज शेळ्या दिसत नव्हते. सर्वप्रथम मुख्याध्यापकाला याचे आश्चर्य वाटले की, याचे शेळ्या गेल्या कुठे ? पवार सरानी गावातील एका व्यक्तीला ह्या शेळ्या राखण्याचे काम दिले होते त्यामुळे रमेश त्या शेळ्यापासून मुक्त झाला होता. काही दिवसानंतर ही बाब घरात कळली. पण रमेशची अभ्यासातील गती पाहून त्याच्या वडिलांनी काही म्हटले नाही. इतर मुलाच्या तुलनेत रमेश चांगल्या गतीने शिकत होता. त्याची प्रगती पाहून पवार सराना देखील आनंद होत होता. पवार सरानी शिल्पा, निता आणि कविता ह्यांच्या भावंडाना अंगणवाडी मध्ये व्यवस्था केली तेंव्हा त्यांची पण समस्या सुटली. ती मुलीं देखील चांगला अभ्यास करू लागली. पाचव्या वर्गापर्यंत त्यांनी नियमित शाळेत आली. त्यांना शाळेची आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. शाळा सोडताना त्यांना खुप दुःख झाले. पवार सरानी एकच वाक्य म्हटलें होते की, काही ही करा, किती ही संकटे येवो आणि किती ही त्रास होऊ द्या पण शाळा सोडू नका, शिकत रहा. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे त्यांनी कोठे ही मध्यंतरी शाळा न सोडता शिक्षण घेतले त्यामुळे आज रमेश मोठ्या अभिमानाने त्यांच्या घरी येऊन पास झाल्याची बातमी घेऊन आला. आज पवार सरांना करोडपती झाल्याचा आनंद वाटत होता. शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाणाऱ्या मुलांना रस्त्यावर आणल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होते. अंधारात लावलेला दिवा चांगल्या प्रकारे प्रकाश देत होता.
- नागोराव सा. येवतीकर
Comments
Post a Comment