तीन गोष्टी
वाढदिवसाची भेट
आज पुनम फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. वैभव एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता. फोन लावले की, आपण डायल केलेला क्रमांक स्विच ऑफ आहे असे उत्तर मिळत होते त्यामुळे तिची अजुन काळजी वाढू लागली. अखेर रात्रीचे दहा वाजले होते. तिला आत्ता अजुन ज्यास्त काळजी वाटू लागली. काय झाले असेल ? फोन का लागत नाही ? तो अजुन घरी का आला नाही? असे अनेक शंका आणि प्रश्न तिच्या मनात घर करीत होते. स्वयंपाक करून गार होऊन गेले होते. तिची भूक मरून गेली होती. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. एवढ्यात दारावरची बेल वाजली तशी तीने दार उघडली. उघडल्याबरोबर तिला डोळ्यासमोर वैभव दिसल्याक्षणी ती त्याच्या गळ्याला पडून ओक्साबोक्सी रडू लागली. प्रेम कसे व्यक्त होते याची प्रचिती अश्या प्रसंगात दिसून येते. थोड्या वेळानंतर तीने त्याच्या शरीराकडे पाहिले तर अंगवारील कपडे रक्ताने माखले होते. हातापायाला बरेच खरचटले होते. बराच मार लागला होता. तीने काय झाले म्हणून त्याला विचारणा केली. तेंव्हा तो म्हणाला, मी नेहमीसारखे ऑफिसमधून वेळेला बाहेर पडलो. पाच-दहा मिनीटाचा प्रवास झाल्यानंतर माझ्या गाडीला मागून एका वाहनाने जोराची धडक दिली आणि काही कळायच्या आत माझी गाडी घसरली. मी खाली पडलो. रस्त्यावर मी जोरात आपटलो. हातापायाला मार लागले पण डोक्याला हेल्मेट होते म्हणून बरे झाले, मी वाचलो. अन्यथा काय झाले असते काहीच कळले नसते. माझ्या खिशातील मोबाईल जमिनीवर पडून खराब झाले. तेथील लोकांनी मला दवाखान्यात नेले. तेथे मलमपट्टी झाली. हे पोलिस केस असल्यामुळे पोलिस येईपर्यंत मला तिथेच दवाखान्यात रहावे लागले. आज हेल्मेटमुळे मी वाचलो आणि तुझी खुप आठवण आली. असे सांगताच तिला एक महिन्यापूर्वी तो प्रसंग आठवला. त्यादिवशी वैभवचा वाढदिवस होता. तेंव्हा वाढदिवसाला काय भेट द्यावे हे तिला सुचत नव्हते. दिवसभर खुप विचार केली. पण तिला काही सुचत नव्हते. ती सहज पेपर वाचू लागली होती. तिची नजर एका बातमीवर थांबली होती. रस्त्याच्या अपघातात एकाचा मृत्यू, हेल्मेट राहिला असता तर जीव वाचू शकले असते. लगेच तिच्या डोळ्यात प्रकाश पडला. त्यादिवशी सायंकाळी तिने वैभवला एक हेल्मेट वाढदिवसाची भेट म्हणून त्याला दिली. तेच हेल्मेट आज त्याला पुनर्जन्म दिल्यामुळे तिला मनोमन खुप बरे वाटले.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
खरी संपत्ती
अमित हा बँकेत कारकून. त्याची पत्नी नयना प्राथमिक शाळेत शिक्षिका. दोघांनाही चांगला पगार होता. त्यांचं कुटुंब सुखी व समाधानी होतं, अमन व पूजा नावाची दोन गोंडस मुलं देवाने त्यांच्या पदरात दिली होती. त्यांच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची वाणवा नव्हती,टुमदार घर,गाडी, कलर टीव्ही, फ्रीज आदी सा-याचैनीच्या वस्तू त्यांच्या घरात होत्या. जशी पगारात वाढ होऊ लागली. तशी चैनीच्या वस्तूंची गर्दी घरात वाढू लागली ; परंतु नयना ही वेगळ्या स्वभावाची होती. ती स्वार्थीपणाने विचार करणारी होती. त्यामुळे राजा-राणीच्या संसारात तिने सासू व सास-याला स्थानच दिले नाही. जेव्हा अमन जन्मला तेव्हा तिला एका बाईची गरज भासू लागली. त्यामुळे आता तरी ती आई-वडिलांना बोलविण्यास सांगेल हा अमितचा विचार पुरता फोल ठरला.
अमनचा सांभाळ करण्यासाठी एका कामवाली बाईला महिना पाचशे रूपयांच्या बोलीवर तिने ठेवून घेतले. अमनची जबाबदारी बाईवर सोपवून दोघेही आपापल्या नोकरीला जाऊ लागले. त्यांचे दिवस तसे मजेत व आनंदात जात होते. सुट्टीच्या दिवशीच त्यांना मोक्ळा वेळ मिळायचा, तोही कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाने निघून जायचा. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात कधी प्रेमाचे संवाद ऐकायला वा बघायला मिळतच नव्हते, नेहमी धावपळ असायची.
त्यांच्या शेजारीच लहानशा घरात मोहन व त्याची पत्नी सुमन यांचे कुटुंब राहत होते. मोहन एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता, त्याची पत्नी सुमन आपले घरकाम सांभाळून शिवण, मेहंदी क्लास चालवत होती. सुमन ही नावाप्रमाणेच चांगल्या मनाची होती. सासू-सासरे वृद्ध झाल्यामुळे त्यांच्याने काही काम करवत नाही म्हणून त्यांना येथेच बोलावून घेण्याचा हट्ट तिने मोहनजवळ धरला होता. मात्र मोहनचा तुटपुंजा पगार, त्यात आपलेच घर नीट चालत नाही, तेव्हा त्यांची कशी व्यवस्था करणार ?त्यापेक्षा ते गावाकडे जास्त आनंदी राहतील, अशी धारणा मोहनची होती ; पण सुमन ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे मोहनला अखेर आपल्या आई-वडिलांना बोलावून आणावे लागले. त्यांनीसुद्धा आपल्या मुलांची समस्या जाणून घेऊन एकाच खोलीतल्या त्या घरात अॅडजेस्ट झाले. आपल्यामुळे मोहनला त्रास होणार नाही. याकडे त्यांनी लक्ष ठेवले. त्यामुळे त्यांचा काडीमात्र त्रास वाटत नव्हता, उलट घरातील लहानसहान कामे ते करू लागले. सुमन आणि मोहनला सुधीर आणि सुधा अशी दोन मुलं होती. लहानाचे मोठ ेहोताना त्यांचा शिक्षणावरील खर्चही वाढू लागला. त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत टाकलं. सुमन बारावीपर्यंत शिकलेली होती. त्यामुळे सायंकाळी त्यांचा सराव घेऊ लागली. सायंकाळी आजोबाच्या तोंडून रामरक्षा स्त्रोत्र, रामायण, महाभारतातील गोष्टी, श्लोक ऐकून मुलं शांतपणे झोपू लागली.
सुधीर, सुधा यांच्यावर चांगले संस्कार घडू लागल्याने त्यांची प्रगती होऊ लागली. याउलट अमित व नयना यांनी आपल्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला. त्यांना पैशाची काळजी नव्हती ; पण मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी खूप पैसा ओतून प्रसिद्ध असलेल्या शाळेत टाकले. मुलांना काय हवे काय नको हे पाहण्यासाठी या दोघांना नोकरीच्या धावपळीत वेळच मिळत नव्हता. आजी-आजोबांचे प्रेम तर त्यांना पुस्तकातूनच मिळायचे, त्यामुळे दोन्ही मुलं मानसिक दृष्ट्या खचू लागली. अमन शाळेत कमी व बाहेर जास्त राहू लागला. पॉकेटमनीचे पैसे उडवीत मित्रांसोबत मजा करू लागला. पूजा हट्टी स्वभावाची बनत गेली. त्यामुळे तिला कुणी मैत्रीण मिळाली नाही. शालांत परीक्षेचे दिवस जवळ आले तसे अमित व नयनाला मुलांची काळजी वाटू लागली. परीक्षा संपून निकाल लागला, तेव्हा अमन अगदी कमी गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर पुढे चांगले शिक्षण घेऊन सुधीर डॉक्टर होऊन जेव्हा मोहन व सुमनच्या पाया पडत होता तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुलून गेली. अमन मजा करण्यासाठीच कॉलेजला जात राहिला. त्यांचे पूर्ण जीवन आई-वडिलांच्या पैशावरच चालू होते. ते अखेरपर्यंत पैसा या बनावट संपत्तीच्या मागेच धावत होते ; परंतु खरी संपत्ती असलेल्या आपल्या लेकरांकडे कधी पाहिले नाही. त्यामुळे आज त्यांचा मुलगा बेकार बनून घरी बसला आहे. म्हणून म्हटले जाते संस्कारित मुलं हीच खरी आपली संपत्ती आहे.
नागोराव सा. येवतीकर,
येवती,ता.धर्माबाद,जि.नांदेड
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वातंत्र्य
ती खुप शिकलेली. तो देखील चांगला शिकल्यामुळेच त्याला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तसे दोघे पण पुरोगामी विचारांचे. एकमेकाला समजून घेणारे. मात्र घरात तसे वातावरण नव्हते. परिवारातील इतर सर्व जण त्याच्या वागण्याला नावे ठेवायाची. पण तो काही बोलत नव्हता. एके दिवशी व्हायचे तेच झाले. शेवटी दोघे स्वतंत्र राहण्याचा विचार केला. आई-बाबा आणि परिवारातील सर्व नातलगापासून विभक्त होऊन ते दोघी राजा राणी सारखे जीवन जगु लागले. त्याला बऱ्यापैकी पगार मिळत असल्यामुळे सर्व काही आनंदात होते. तो ऑफिसला गेला की तिला दिवसभर घर खायला उठत असे. टीव्ही तरी किती बघणार. तिचे शिक्षण चांगले झाले होते. मग या शिक्षणाचा काय फायदा ? त्या रात्री दोघे खुप चर्चा आणि विचारविमर्श केले. पण तीने आपला हट्ट सोडलीच नाही. कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी करण्याचा तिचा विचार पक्का होता. त्यामुळे घराला आर्थिक मदत तर होईलच शिवाय माझा वेळ देखील निघुन जाईल. अखेर हो नाही म्हणता म्हणता तीने एक कंपनी जॉइन केली. चार आठ दिवस खुप मजेत आणि वेगळ्या अनुभवामध्ये संपले. काही महिन्यानंतर तिच्या कंपनीने बाहेर गावी दोन दिवस थांबण्याचे नियोजन केले. त्याला सोडून ती दोन दिवस घराबाहेर राहण्याची पहिली वेळ होती. त्या दिवशी रात्री खुप शांतता होती. दोघे एकमेकाला काही बोलत नव्हते. अशीच रात्र सरली. सकाळी दोघे आपाआपल्या ऑफिस मध्ये गेले. सायंकाळी तो एकटाच घरी परतला. आज ती घरी येणार नव्हती. ते दोन रात्र त्याला खुप जड आणि कठीण गेले. तुझ्या नोकरीमुळे हे सर्व होत आहे असे तिला बोलता ही येत नव्हते. काय करावे त्याला काही कळेना. पुढील महिन्यात अशीच बाहेरगावी जाण्याची तिच्यावर वेळ आली. परत मागील दिवस आठवण करून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. मात्र त्याच्या ऑफिसमधील मित्राने खुप दिलासा दिला. एकट्याने रात्र संपविण्याचे औषध त्याला मिळाले. सायंकाळी त्या दोघांची तास दीड तासाची बैठक जमली. डोके सुन्न पडले आणि सकाळ कधी झाले हेच त्याला कळले नाही. त्याला ते औषध खुप चांगले वाटू लागले. तिचे बाहेरगावी जाणे आणि ह्याचे औषध घेण्याचे सूत्र चांगले जुळले. त्याला औषधाची इतकी सवय जडली की आत्ता ती बाहेरगावी जरी गेली नाही तरी तो औषध घेऊन घरी येऊ लागला. चांगला युवराजासारखा दिसणारा तो दिवसेंदिवस कमजोर होत चालला होता. ती याविषयी खुप बोलत होती. तेंव्हा तो रागात येऊन एकच म्हणायचा तु नोकरी सोड मी औषध घेणे सोडतो. अश्या बोलण्याचा मात्र त्याचा काही परिणाम होत नव्हता. एके दिवशी त्याला खुप ताप आले म्हणून दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरानी सर्व तपासणी केली आणि औषध न पिण्याचा मोलाचा सल्ला दिला. जर त्यान हे असेच चालू ठेवले तर जास्त काळ आपल्या सोबत राहू शकणार नाही. पण तो औषधाशिवाय राहूच शकत नव्हता. या औषधामुळे त्याची नोकरी गेली, त्याचे शरीर कमजोर झाले. कोणतेही काम त्याच्याने करवत नव्हते. आत्ता तिच्यावर डबल जबाबदारी पडली. अखेर एके दिवशी याच औषधामुळे त्याचा अंत झाला. यात चूक कोणाची होती, त्याची की तिची ? हे दोघेही शेवटपर्यंत विचार करीत राहिले. खरोखरच आपले स्वातंत्र्य म्हणजे हेच आहे काय ? असा ही प्रश्न कधी कधी मनात येतो.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
काटकसर
जीवनात काटकसर खुप महत्वाचे आहे. त्या शिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घरा चा विकास तरी कसा होईल. म्हणून मराठीत एक म्हण आहे की, अंथरण पाहून पाय पसरावे. याचा विचार केल्यास काटकसर किती महत्वाचे आहे ते कळते. घरात सर्वात जास्त काटकसर कोण करतात पुरुष की स्त्री ? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी प्रत्येक घरात थोडा वेळ डोकावून पहावे लागेल.
तो एका छोट्या कंपनी मध्ये काम करीत होता. कुटुंबाला पोटभर खायला मिळेल एवढे त्याला वेतन मिळत होते. घरापासून ऑफिस दूर असल्यामुळे रोज ये जा करणे त्याला त्रासदायक होते मात्र त्याच्या समोर पर्याय देखील नव्हता. ऑटोला जास्त भाडे द्यावे लागते म्हणून सकाळी तो पायी चालत जायचा तेवढेच हातापायाची हालचाल व्हायची आणि सायंकाळी बसने यायचा म्हणजे रोज वीस एक रूपयाची बचत करायचा आणि महिन्याकाठी पचशे सहाशे रूपयाची बचत करून काटकसर करीत तो जीवन जगयाचा. सुखाचा संसार करण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करून होईल तेवढी बचत करायचा आणि त्या उलट त्याची बायको वागत होती. तिला पैशाची अजिबात बचत करण्याची सवय नव्हती. तिला चैनीत ऐशोआरामात जीवन जगण्याची सवय होती. घरातल्या वस्तू ची तिने कधी ही काळजी घेतली नाही त्यामुळे बहुतांश वेळा घरातील वस्तू खराब होण्यावरुन दोघांचे वाद होत असत. दिवसा लाईट चालू ठेवणे, नेहमी टीव्ही पहाणे यामुळे विजेचे बिल भरमसाठ येत होते. त्यात कधी काटकसर करीत नव्हती. दर पंधरा वीस दिवसांनी चित्रपट पाहणे आणि हॉटेलात जाऊन खाण्याचा तिचा हट्ट कायम असायचा. यामुळे तो पुरता वैतागला होता. एवढेच नाही तर एखादे सण किंवा कोणाचे कार्यक्रम म्हटले की दागिने आणि साड्या यावर खुप दंगल व्हायची आणि त्यात तिचाच जय व्हायचा. तिच्या अश्या वागण्याचा त्याला खुप त्रास होत असे मात्र तो काही करू शकत नव्हता. त्यामुळे त्या घराची काहीच प्रगती होऊ शकली नाही.
जीवनात अनेक प्रसंग अनुभवास येतात. त्यात हा दूसरा प्रसंग पाहू या
ती घरात नेहमी राबराबते. तो पैसे कामविण्यासाठी बाहेर काम करतो तर ती घरातील सर्व सामानाची देखभाल करीत करीत सर्व वस्तू ची काळजी घेते. स्वयंपाकातिल वस्तू पासून तर घरातल्या अति महत्वाच्या वस्तुची ती खुप काळजी घेते. यामुळे त्यांचा संसार सुखाचा चालतो पण त्याने कुठे ही काटकसर न करता पैश्याची उधळपट्टी करू लागला की घरातील तिची बचत काही कामाची राहत नाही. ती घरात पाई पाई वाचवित राहते आणि तो आपल्या मित्रां सोंबत रोज सायंकाळी औषध घेऊन हलत-डुलत येतो. घरी आल्या वर चुपचाप झोपतो तो नवरा कसला ? छोट्या छोट्या कारणा वरुन तिला शिव्या देणे, नाही नाही ते टाकून बोलणे, तिच्यावर वेगवेगळे संशय घेणे, हे सर्व जेव्हा लहान मुलांसमोर घडते तेंव्हा ती अर्धमेली होते. त्यावेळी काय करावे हे तिला कळत नाही. कधी कधी तर त्याच्याजवळ औषध घेण्यासाठी पैसे नसतील तर तिच्या जवळची जमा पुंजी मगायला देखील मागे पुढे पाहत नाही. तिने देण्यास नकार दिला की, मग सुरु होते जीवघेणा त्रास. त्याच्या अश्या वागण्याने त्या घराचा विकास काय होणार ? त्यांच्या मुलांवर काय संस्कार होणार ? अश्या घरातील किंवा परिसरातील मुलांवर शाळेने किती ही संस्काराचे डोस दिले तरी त्याच्यावर काही परिणाम होणार काय ? शाळे पेक्षा ते मूल घरातील आणि परिसरातील परिस्थिती चटकन आत्मसात करतात. घरात लागणाऱ्या वस्तूची काळजी न घेणारे सायंकाळच्या व्यवस्थेच्या काळजीमध्ये राहतात. त्याला अनेक गोष्टीचे वाईट व्यसन लागलेले असते. ज्याचा सर्वात मोठा फटका तिला बसतो. तंबाखू खाणे, पत्ते खेळणे, किंवा अश्या अन्य बाबी तो बिनधास्तपाणे करतो. त्याचे परिणाम मात्र सर्वाना भोगावे लागते. एखादी बाब करताना शंभरदा विचार करणे आवश्यक आहे. त्यापेक्षा एकदा तरी विचार करावा. संसार दोघानी मिळून करायचा असतो. संसार म्हणजे एक रथ आहे. ज्यातील एक चाक तो असतो तर दूसरे ती असते. तो आणि ती एकादिलाने चालले तर रथ उत्तम चालेल. त्यापैकी एकही कमकुवत किंवा खराब झाले तर रथ पुढे जाणार नाही. म्हणून जीवनात दोघांनी एकमेकास समजून घेत काटकसर करीत राहिल्यास जीवनात नक्की प्रगती साधता येईल.
वरील दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटतात ? जीवन सुखी करण्यासाठी दोघांची काटकसर महत्वाची आहे की नाही ? यावर आपण सर्वजण नक्की विचार करावे.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
श्रावणातील पोळ्याचा पाऊस
आज रामराव खुपच चिंताग्रस्त होऊन बसला होता. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याला शेतातील पिकाची काळजी लागली होती. त्याला आपल्या सर्जा आणि राजा या दोन बैलाची काळजी लागली होती. नव्हे त्याला परिवारातील सर्वांची काळजी लागली होती. कारण पावसाळा सुरु होऊन महिन्याचा काळ संपला होता तरी मनासारखा पाऊस अजुन तरी पडला नव्हता. थोड्या पावसाने रामरावने शेती पेरली होती. पीके ही जोमाने लहरत होती. पिकांची वाढ चांगली झाली होती मात्र पिकांना कसदार फळे येण्यासाठी पाण्याची खरी गरज होती. आभाळात रोजच काळे ढग येत होते मात्र पावसाचा एक ही थेंब जमिनीवर पडत नव्हता. हवामान खात्याकडून सांगितले जायचे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार ! पण पाऊस कुठे पडला हे ऐकण्यात सुध्दा येत नव्हते. असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात खुप पाऊस पडतो, एक दोन दिवस मुसळधार पडतो. म्हणून रामरावला श्रावण महिन्यावर पूर्ण भरोसा होता. पण या महिन्यात पाऊस तर सोडा उन्हाळ्यासारखे कडक उन पडू लागले. पीके करपू लागली तशी अजुन काळजी वाटू लागली. यावर्षी रामरावने आपल्या बायकोच्या अंगावरील घरातील सोने गहाण ठेवून बियाणे आणि औषधी खरेदी केले होते. त्याची वेगळी काळजी त्याला खात होती. आत्ता काय करावे ? रोज त्याला प्रश्न पडत होता. शेतात जात होता माना खाली टाकलेल्या पिकांना पाहून त्याचे मन हेलावून जात होते. देवाला करुण अंतःकरणाने हाक मारीत होता ' देवा एक दिवस पाऊस म्हणून येऊन जा '. पोळ्याचे दिवस जवळ येत होते. श्रावणातील नागपंचमी आणि रक्षाबंधन सण असे तसेच साजरे झाले. घरात स्मशान शांतता होती. यावर्षी पोळ्याला सर्जा-राजा ला रंग लावण्यास देखील रामरावची हिम्मत होत नव्हती. बैलाला सजवावे असे मन मानत नव्हते. यावर्षी पोळ्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बातम्या देखील वृतमानपत्रातून झळकले. बातमी वाचून रामरावच्या डोळ्यात पाणी आले. यावर्षी पीके आपल्या हातून जाणार हे नक्की होते. त्यादिवशी रामराव असाच रेडियो ऐकत बसला होता की आकाशवाणीवरुन एक सूचना देण्यात आली. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. ही बातमी ऐकून रामरावला आनंद ही वाटले आणि दुःखही कारण हवामान खात्याचा अंदाज म्हणजे रामभरोसे असते. पण यावेळी तसे झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशात काळे ढग जमा झाले. सूर्यदर्शन झाले नाही. भरपूर पाऊस पडणार अशी एकदंरीत परिस्थिती होती. मात्र एक ही थेंब न पडता दिवस संपला. परत एकदा हवामान खात्यावरचा रामरावचा पूर्ण विश्वास उडाला होता. चार दिवसावर पोळ्याचा सण होता. देवाने रामरावची आर्त हाक ऐकली होती म्हणून आकाशवाणीच्या तिसऱ्या दिवशी सकाळ पासून जे पावसाला सुरुवात झाली ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालूच होती. पाऊस पडताना पाहून रामरावला खुप आनंद होत होता. या पावसाने सर्वांचे प्रश्न सोडविले होते. शेतातील पीके वाचली होती. सर्व खड्यात पाणी जमा झाले त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. नदी नाले तुडूंब झाली त्यामुळे माणसासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील संपला होता. रामरावचे नाही तर समाजातील सर्वांचे प्रश्न या एका पावसाने संपविले. म्हणून रामराव आजच्या पोळ्याला आपल्या सर्जा आणि राजा बैलाला खुप सजवून वाजत गाजत नाचत नाचत पोळा सण साजरा केला.
नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment