संघर्ष
संघर्ष
आज सुनंदाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते. तिचा एकूलता एक मुलगा सुनील नौकरीसाठी मुंबईला चालला होता. अतिशय कठीण परिस्थितीत सुनीलने आपले कॉम्प्युटर इंलिनिअरींग कोर्स पूर्ण केला होता. कॅम्पस इंटरव्ह्यू मधूनच त्याला टाटा कंपनीने नौकरीसाठी कॉल पाठविला होता. देवगिरी एक्सप्रेसमध्ये बसून सुनील जाऊ लागला तसे सुनंदाला अश्रू आवरणे कठीण झाले होते. सा-या गावक-यासह तिला सुद्धा आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. ज्या कारणांसाठी तिचा नवरा हे जग सोडून गेला त्यांचे स्वप्न साकार केल्याचा अभिमान तिला होत होता.
सुनंदा ही मध्सयवर्गीयातली मुलगी. दिसायला सुंदर जरी नसली तरी नाक सरळ आणि थोडीशी बुटकी त्यामूळे प्रत्येकाच्या नजरेत भरत होती. पाहुण्यातल्याच रमेश सोबत तिची सोयरीक झाली. रमेश काही तिला परका नव्हता. तो सुद्धा गणितात हुशार विद्यार्थी. कितीही अवघड गणित रमेश चुटकी सरशी सोडवीत असे. थोडासा भेळा परंतु मितभाषी रमेश आपला जास्तीत जास्त वेळ पुस्तक वाचण्यात घालवित असे म्हणून त्याला सारे पुस्तकी किडा म्हणून चिडवीत असे. त्यांची आजी त्याला "अरे रम्या, पुस्तकं वाचून वाचून वेडा होशील रे” म्हणून समजावित. बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले मात्र इंजिनिअरींग साठी थोडे कमी पडले. पेमेंट सीटवर प्रवेश मिळाला असता परंतु तेवढा पैसा घरदार विकून ही जमा झाले नसते. म्हणून सरळ बी.एस्सी.चा पर्याय स्विकारला आणि चांगल्या टक्केवारीत पदवी मिळविली. पदवीचा निकाल आणि लग्नाची तारिख एकच निघाली. पदवी आणि लग्न दोन्ही एकदाच. त्यामूळे घरातील सर्वांनाच अत्यानंद झाला. एक-दोन कॉम्पूटरचे चांगले कोर्स शिकून रमेश नौकरीसाठी या कंपनीतून त्या कंपनीत चकरा मारीत होता परंतु त्याला नौकरी काही मिळत नव्हती.
संसरात त्याचे काही मन लागत नव्हते. त्यातच सुनंदाला दिवस गेले आणि छान हसरा बाळ सुनिल त्यांच्या जीवनात आला. दिवसेंदिवस संसाराचा खर्च वाढतच होता, रमेशला काही नौकरी मिळत नव्हती. दिवसभर शहरात फिरून फिरून यायचा आणि रात्री पुस्तकं चाळत बसायचा. त्याच्या जवळ विद्वता होती, प्रमाणपत्र होतं, नव्हतं काय तर वशिला. असेच एका कंपनीत मुलाखतीला गेल्यानंतर रमेशने सा-याच प्रश्नांची उत्तरे दिली. परंतु त्यांनी रमेशला निवडले नाही. तेव्हा रमेशला खूप राग आला आणि त्याने कंपनीच्या मॅनेजरचे कॉलर धरून ओढले. लगेच तेथे पोलिस बोलाविण्यात आले रमेशला लॉक अप मध्ये टाकले. ही वार्ता थोड्याच वेळात गावात पोहोचली. गावातली प्रतिष्ठित मंडळी येऊन सात-बा-यावर त्याची सुटका केली. तेव्हापासून चार दिवस तो घराच्या बाहेर पडला नाही. त्याचा मनावरचा ताबा सुटला होता. तो घरातल्या लोकांवर चिडचिड करू लागला. विनाकारण सुनंदाला शिव्याशाप देत मारू लागला. एवढेच नाही तर घरासमोरून जाणा-या – येणा-या लोकांना काही बोलू लागला. रमेश आता पुरता वेडा झाला होता. सुनंदाला काय करावे कळत नव्हते. तिला तर धड रडताही येत नव्हतं. गावातल्याच चार शहाण्या लोकांनी रमेशला पुण्याच्या मेंटल दवाखान्यात सोडण्याचा सल्ला दिला. पुण्याला अनेक वेडे ठीक झाल्याची सुनंदा पण ऐकून होती. मग एके दिवशी रमेशला पुण्यात नेण्यात आलं.
सुनंदाला घर खायला आल्यासारखं वाटत होतं. ती पण बारावी पास होती परंतु नौकरीच्या मागे ती कधी धावली नाही. परंतु गावचा सरपंच खूप चांगला देवमाणूस होता म्हणून गावातल्या अंगणवाडीवर शिक्षिका म्हणून तिची नेमणूक केली. महिना शे-पाचशे रू. तेवढाच कुटुंबाला आधार होता. सुनील दहा वर्षाचा झाला. महिना दोन महिन्यांनी दवाखान्यातून पत्र येतच होती खुशालीची. कसेबसे कुढत कुढत दहा वर्ष संपले. दवाखान्याच्या प्रमुखांनी रमेश बरा झाला आहे, त्यास परत नेवू शकता असे पत्र पाठविल्यामूळे तब्बल दहा वर्षांनी रमेशला गावात आणलं. आत्ता तो सामान्य दिसत होता. अगोदरच मितभाषी त्यामूळे कोणाला ही जास्त बोलतच नव्हता. बस म्हटलं की बसायचं आणि कंटाळा आला की पांघरून घेऊन झोपायचा. राहून राहून आजीने बोललं वाक्य आठवायचा आणि डोळ्यात पाणी आणायचा. मनात कसलेही विचार न आणता त्याची दिनचर्या चालू होती.
गावातल्या कुजबुज कुजबुज बोलण्यामूळे रमेश मात्र अस्वस्थ व्हायचा. रात्र सरून जायची पण याला काही झोप यायची नाही. सरपंचाचं आणि बाईचं ट्युनिंग लई मस्त हाय, त्यात नवरा पागल हाय, तिनं तरी काय करील बिच्चारी, ती बी शेवटी बाईमाणूस हाय, किती म्हणून सोसलं? या अश्या बोलण्यामूळे रमेशचा माथा ठणकत होतं. अंगणवाडी शिक्षिका म्हणजे मिटींगला जावेच लागते. त्यामूळे कधी वेळ होते, मग रमेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. लोकं म्हणत्यात ते सारं खरं आहे असं त्याला वाटू लागलं. त्याच्या मनात विचाराचं वादळ उठलं. त्यादिवशी असेच सुनंदा मिटींगला गेली होती आणि सुनील शाळेला. घरात कोणी नाही हे पाहून रमेशने एन्ड्रीनचा डबा घेतला, घटाघटा घश्याखाली ओतला आणि चिरनिद्रेत झोपी गेला. सायंकाळच्या सुमारास सुनंदा घरी आली. एन्ड्रीनचा डबा पाहताच तिच्या काळजात धस्स केलं आणि ती धाय मोकलून रडू लागली. ज्याच्यासाठी एवढी मरमर करू लागली तोच हात सोडून निघून गेला म्हणून रडू लागली.
रमेशच्या जाण्याने तिचा जीव कश्यातच लागेना. तेव्हा पुन्हा एकदा सरपंचानेच तिला आधार दिला. परंतु सुनंदाच्या कानावर या सर्व गोष्टी पोहोचल्या होत्या. यापुढे सरपंचाचा आधार घ्यायचे नाही असे ठरविले. सरपंच खरोखरच देवमाणूस होता. त्याच्या मनात जरासुद्धा वासना नव्हती. पण लोकांचे तोंड कसे बंद करणार? घरात पैसा नसल्यामूळे सुनीलचं पुढील शिक्षण खोळंबू लागलं होतं. महिन्याच्या पगारीवर घर चालविणे अवघड होतं. काय करावं हे तिला ही कळेना. सगळ्या गावाला आपलं संबंध कळावे या हेतूने सरपंचाने मारोतीच्या पारावर सर्व लोकांसमक्ष नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुनंदाच्या हातून राखी बांधून घेतली तेव्हा कुजबुज कुजबुज करणा-या लोकांच्या तोंडात माती पडल्यासारखं झालं. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणं हीच माणूसकी आहे. यापुढील सुनीलच्या शिक्षणासाठीचा पूर्ण खर्च मी, त्याचा मामा उचलणार असे म्हणून सरपंचानी मारोती रायाच्या पाया पडला आणि घरी आणला. आज सुनंदाच्या मनात काही नव्हतं की लोकांच्या मनात, सुनीलच्या शिक्षणाचं प्रश्न ही सुटला होता.
दहावीचा निकाल लागला. सुनील चांगल्या गुणांनी पास झाला. त्याच्या वडिलांचे सर्वच्या सर्व गुण सुनीलच्या अंगात होता. बाराव्या वर्गात कॉम्प्यूटर सायन्स घेऊन नव्वद टक्के मिळविला. या दोन वर्षात सरपंचांनी त्याचा राहण्याचा, खाण्याचा, वह्या, पुस्तकांचा सारा खर्च उचलला होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्यूटर इंजिनियरींगला नंबर लागल्यावर सारे गावकरी, सरपंच आणि सुनंदा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुनील खूप अभ्यास करीत दरवर्षी चांगले गुण मिळवीत प्रगती करत होता.
त्याचं शेवटचं वर्ष चालू होतं. अचानक एके दिवशी सरपंचाला झटका आलं आणि ते सर्वांना सोडून गेले. सरपंच गेल्याचं निरोप सुनीलला कळविण्यात आलं परंतु त्याच दिवशी टाटा कंपनीची कॅम्पस इंटरव्यू होती. एक मन म्हणत होतं ज्यांनी संपूर्ण आयुष्य तुझयासाठी झटलं त्याचं शेवटचं एकदा तोंड बघून ये. तर दुसरं मन म्हणत होतं की, सरपंचानं तुला कश्यापायी एवढं शिकवलं. हातात आलेली नौकरी सोडून गेलास तर सरपंचाच्या आत्म्याला काय वाटलं? शेवटी सुनील तेथील इंटरव्यू संपवून दुस-या दिवशी गावी परतला.
गाव पूर्ण सुनं सुनं वाटत होतं. सुनंदा तर सुनीलला बिलगून लहान मुलासारखी रडत होती. ज्या सरपंचावर संपूर्ण गाव कुजबुजत होतं त्याच सरपंचाच्या जाण्याने गाव पूर्ण दु:खी होतं. सुनील महिनाभर गावीच थांबला होता. त्याची कॅम्पस इंटरव्यू झाली हे सुद्धा तो विसरला होता. परंतु टपालाने गावी आलेल्या नौकरीच्या कॉलने सर्वांना पुन्हा एकदा आनंदाच्या वातावरणात हरखून टाकलं. छोट्याश्या गावातला गरीब घरातला सुनील राजधानी मुंबईत नौकरी करणार या विचाराने सर्वांना अभिमान वाटत होता. सुनील आणि सुनंदा मनोमन सरपंचाचे आठवण करीत होते. तर गावातले लोक मिळालेल्या नौकरीला सुनंदाच्या संघर्षाचे फळ मानत होते.
नागोराव येवतीकर,
येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
Comments
Post a Comment