देविदास नारमोड ( Devidas Narmod )

कर्तव्याशी प्रामाणिक असलेले देविदास नारमोड
प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवानिवृत्तीचा दिवस येतोच येतो. नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कार्यमुक्त होणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना गरजेचे असते. त्याच नियमानुसार आज पंचायत समिती उमरी येथील सिंधी बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी देविदास नारमोड हे आपल्या वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यामुळे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा. 
धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पाटोदा खु. येथे देविदास नारमोड यांचा जन्म 07 फेब्रुवारी 1967 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव तर आईचे नाव गंगाबाई असे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आई-वडील शेती काम करत होते. त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते बिलोलीच्या आत्याबाईकडे राहून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल बिलोली येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डी. एड. शिकण्याचा निर्णय घेतला. धर्माबाद येथील शासकीय अध्यापक विद्यालयातून त्यांनी डी. एड. चे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजे चेहऱ्यावर अजून मिसरूड देखील फुटले नव्हते तेव्हा प्राथमिक शिक्षकांची नोकरी मिळाली. नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत किनवट तालुक्यात राजगड येथे 18 जानेवारी 1986 रोजी त्यांची प्रथम नेमणूक झाली. त्या काळात किनवट तालुका हा नक्षलाच्या कारवाईने त्रस्त होता. तेथे दळणवळणाची सुविधा नव्हती. भरपूर झाडी व डोंगराळ भाग, संदेशवहनात अनेक अडचणी होत्या. निरोपाची देवाणघेवाण पत्र व्यवहाराद्वारे होत असे. पत्राची वाट पाहण्यात आठवडा उलटून जात असे. कोणीही तिथे नोकरी करायला तयार राहत नसत. पण घरची परिस्थिती सुधारण्यासाठी नोकरी करणे गरजेचे आहे म्हणून त्यांनी आपले जीव धोक्यात घालून ही नोकरी पत्करली. त्या राजगडच्या शाळेवर एक-दोन वर्षे नाही तर तब्बल 14 वर्षे सेवा केली. तेथील विद्यार्थी आज भारतीय सैन्यात, वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. येथील अनुभव सांगताना ते म्हणतात, " या शाळेवर जाताना माझ्या डोळ्यात अश्रू होते पण माझी बदली झाली व 14 वर्षांनी मी शाळा सोडतांना गावकऱ्याच्या डोळ्यात मात्र अश्रू होते." आपल्या पहिल्याच शाळेत देविदास नारमोड यांना अनेक गोष्टीचा अनुभव मिळाला. ज्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध बनले. संकटकाळात सापडलेल्या लोकांना मदत करण्याची वृत्ती येथूनच निर्माण झाली. त्यानंतर 12 जुलै 1999 मध्ये त्यांची बदली धर्माबाद तालुक्यातील आपल्या गावाजवळील जारीकोट येथील केंद्रीय शाळेवर झाली. कठीण तपश्चर्येचे हे फळ होय. याठिकाणी त्यांनी 5 वर्षे सेवा दिली. येथील विद्यार्थी शिक्षक, पोलिस आणि बँकेत अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.त्यानंतर 06 जुलै 2004 मध्ये त्यांची बदली त्याच केंद्रातील सायखेड येथे झाली. याठिकाणी 8 वर्ष सेवेच्या काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आणि शाळेचे नाव तालुकाभर पसरविले. चौथ्या वर्गाला पाचवा वर्ग जोडण्याचे काम करून ते थांबले नाही तर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्याचसोबत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक बनविण्यात देविदास नारमोड यांचा सिंहाचा वाटा होता. तालुक्यातील सेवा जेष्ठतेमुळे 01 जून 2013 मध्ये त्यांची बदली बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी संकुलातील हज्जापुर येथे झाली. याठिकाणी त्यांनी 5 वर्ष सेवा केली. येथील गावातील लोकांशी संपर्क करून लोकसहभागातून हज्जापूरची शाळा डिजिटल केली आणि अनेक लहान-लहान उपक्रमाने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रेरित केले. त्यानंतर 29 मे 2018 रोजी बदली पोर्टलद्वारे त्यांची ऑनलाईन बदली धर्माबाद तालुक्यातील बाळापूर संकुलातील आलूर येथे झाली. याठिकाणी त्यांनी 6 वर्ष सेवा दिली. आलूरच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण, निसर्गरम्य वातावरण व डिजिटल असल्याने आजूबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येत असत.  त्यानंतर त्यांची पंचायत समिती उमरी अंतर्गत सिंधी बिटमध्ये 20 मार्च 2024 मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती मिळाली. पर्यवेक्षण अधिकारी पद मिळाले असले तरी त्यांनी कधी ही कोणावर अधिकार दाखविला नाही. सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने राहणे हा त्यांचा मूळ स्वभाव जशास तसे राहिले. त्यांनी आपल्या पूर्ण सेवेमध्ये कर्तव्याशी प्रामाणिक राहिले. आपल्या सहकार्यांना कधीही दुखावले नाही म्हणूनच त्यांचा मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासोबतच त्यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाना वाचा फोडण्याचे काम देखील नेटाने केले आहे. ते इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन संघटनेचे बिलोली व धर्माबाद तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 
कोणत्याही पुरुषाच्या यशस्वीतेमागे स्त्रीचा हात असतो. तसे त्यांच्या पत्नी सौ. अनुसया देविदास नारमोड यांच्या अखंड सहकार्याने ते आजपर्यंत यशस्वी कार्य करू शकले. त्यांना श्रीकांत नावाचा मुलगा असून तो नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत आहे तर मुलगी शुभांगी ही रायगड जिल्ह्यात आणि मनिषा ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत आहेत. 
विद्यार्थी प्रिय आणि कर्तव्याशी अत्यंत प्रामाणिक असलेले देविदास नारमोड आज जिल्हा परिषद नांदेड मध्ये 40 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांना भावी आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा ......!

शब्दांकन - नासा येवतीकर, मुख्याध्यापक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्य दिन ( Indispens Day )

जागतिक जल दिवस (World Water Day )

EK Tarikh ..... ( एक तारीख .....)