प्रेमळ राजू
01) कुत्र्याचे पिल्लू
राजू शाळेतून घरी येत होता. त्याला रस्त्यावर एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू दिसलं. त्याच्या आसपास कोणीच नव्हतं. तो एकटाच होता, त्याची आईपण जवळ नव्हती. त्याला भूक लागली असेल असे राजूला वाटले. म्हणून त्याने दप्तरातील खाऊचा डबा काढला. त्यात एक-दोन बिस्कीट होते. दुपारच्या सुट्टीत खाल्ले नव्हते म्हणून शिल्लक होते. त्याने डब्यातून बिस्कीट काढला. त्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला खायला दिला. ते खाल्यावर त्याला बरे वाटले. म्हणून तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. ते कुत्र्याचं पिल्लू खूपच सुंदर होतं. गव्हाच्या रंगासारखं, गुबगुबीत नाकावर काळा रंग होता. म्हणूनच राजूला खूप आवडला होता. त्याला टाटा करून तो घरी आला. त्याच्या मनात त्या पिल्लाने घर केले होते. त्याचे मन कुठेही लागत नव्हते. रात्रीला त्याला झोप लागली नाही. सकाळ कधी होते ? त्या कुत्र्याच्या पिल्लूला कधी एकदा भेटतो ? असे त्याला झाले होते. दुसऱ्या दिवशी तो लवकरच तयार झाला. आज खाऊच्या डब्यात चार बिस्किटे जास्तच घेतली. तेव्हा आई त्याला म्हणाली, " राजू, नुसते बिस्किटे खाऊन राहणार आहेस का ? चपाती-भाजी काही खाणार आहेस की नाही ? " यावर राजू म्हणाला " हो आई, सर्वच खातो, काळजी नको, बाय" असे म्हणून दप्तर घेऊन तो शाळेला निघाला. राजू चौथ्या वर्गातील हुशार आणि अभ्यासू मुलगा. आई-बाबांचा एकुलता एक होता. पण त्याने कधी हट्ट करून त्रास दिला नाही. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत कामावर होते. सकाळी लवकर जात असत. रात्रीला उशिरा येत असत. राजुची आई मात्र खूपच प्रेमळ होती. ती त्याचा अभ्यास करवून घेई. छान छान गोष्टी सांगत. दोघे गप्पा मारत असत.
कालच्या कुत्र्याच्या पिल्लाला तो शोधू लागला. पण त्याला कुठेच दिसत नव्हतं. ते दिसत नाही हे पाहून त्याला दुःख वाटले. तो नाराज झाला होता. पण तेवढ्यात ते कुत्र्याचे पिल्लू शेपूट हलवत राजूकडे येत होता. राजू खूप आनंदी झाला. खाऊच्या डब्यातून दोन बिस्किटे त्याला खाण्यास दिली. आनंदाने शाळेला गेला. आज शाळा वेगळी वाटत होती. आपण काहीतरी मोठं काम केलोय, असे त्याला वाटत होतं.
सर वर्गात आले. त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा. त्यांना त्रास देऊ नका. असे आपल्या संतांनी सांगितले आहे. सर बोलत होते. राजू मन लावून ऐकत होता. सायंकाळी घरी जाताना ते पिल्लू राजूच्या जवळ आला. त्याने खाऊच्या डब्यातील शिल्लक दोन बिस्किटे दिली. राजूने बिस्किट खाणे बंद केले. आपले बिस्किटे त्या पिल्लाला देऊ लागला. राजूची आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाची छान मैत्री जमली. शाळेतून येता-जाता राजू त्याला बिस्किट खायला द्यायचा. ते पिल्लू राजूजवळ घुटमळायचा. कुत्र्याच्या पिल्लाला राजुची ओळख झाली होती. राजू दिसला की शेपूट हलवत उभा राहायचा.
त्या दिवशी रविवार होता. राजूने आईला त्या कुत्र्याच्या पिल्लूबद्दल माहिती देतांना म्हणाला, " आई, कुत्र्याच्या पिल्लाला घरी आणू का, प्लिज" यावर आई म्हणाली, " नको बाळा, बाबांना हे मुळीच आवडत नाही." तो खूप नाराज झाला. राजुचे बाबा कडक शिस्तीचे होते. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती. त्यामुळे राजूला ही सुट्टी होती. पण त्या कुत्र्याच्या पिल्लूला काय माहीत ? आज रविवारची सुट्टी असते. तो राजूच्या दिशेने डोळे लावून बसला. पण राजू काही आलाच नाही. पिल्लू नाराज झाला. त्याला भूक लागली होती. काही तरी खायला मिळते का ? म्हणून तो इकडे-तिकडे भटकू लागला. त्याला काहीच भेटले नाही. तेवढ्यात त्याला रस्त्यावर काहीतरी दिसले. ते खाण्यासाठी तो पळत सुटला. तेवढ्यात दुसरीकडून वेगात एक कार आली. त्या कारने पिल्लाला उडवले. कुत्र्याचे पिल्लू जागेवरच गतप्राण झाले. मेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला एकाने रस्त्याच्या बाजूला फेकून दिलं.
राजूला दिवसभर चैन पडले नाही. पिल्लू आज काय खाल्ले असेल ? उपाशीच झोपला असेल का ? असे नाना विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. त्याला घरी आणायला हवे होते ? असा विचार करतच तो झोपी गेला. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे शाळेला निघाला. त्याठिकाणी आल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला. पण त्याला कुठेच कुत्र्याचे पिल्लू दिसत नव्हते. राजूला पाहताच ते पिल्लू धावत येत होतं. पण आज तसे काही घडले नाही. काही तरी विपरीत झालंय. शंकेची पाल राजूच्या मनात चुकचुकली. बराच वेळ वाट पाहिला. तरीही ते पिल्लू आले नाही. तेव्हा राजूने तेथील एका माणसाला विचारलं, " अहो काका, येथे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं. ते कुठं गेलंय ? दिसत नाही" यावर त्याने काल रस्त्यावर घडलेली घटना सांगितली. ते पिल्लू या जगात नाही, हे ऐकून तो खूप नाराज झाला. शाळेत त्याचे मन कुठेही लागत नव्हते. दिवसभर तो त्या पिल्लाच्या विचारात मग्न होता. घरातही त्याचे मन लागत नव्हते, यावर त्याची आई म्हणाली, " काय झालं राजू, बरं वाटत नाही का ? एवढा उदास का आहेस ? " यावर राजू काही बोलला नाही. डोळ्यातून अश्रू गाळत राहिला. तेव्हा आईने त्याला जवळ घेतलं. प्रेमाने त्याला कुरवाळलं. तेव्हा रडक्या स्वरात तो म्हणाला, " आई, ते कुत्र्याचे पिल्लू मेलंय गं ! " आईला ही खूप दुःख झालं. राजुची इच्छा अपूर्ण राहिली. तो दुःखी आहे, असे आईला वाटू लागले. रात्रीला आईने ही घटना राजूच्या वडिलांना सांगितली. त्यांनी राजूला आनंदी करण्यासाठी एक योजना आखली. रविवारी सकाळी ते दोघे बाहेर फिरायला गेले. येतांना गोंडस छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला घेऊन आले. राजूला हाक मारली, " राजू बेटा, बाहेर ये, बघ कोण आलंय ? " राजू बाहेर येतो. आई - बाबांच्या हातात छोटं कुत्र्याचं पिल्लू पाहतो. ते पाहून खूप आनंदी होतो. टाळ्या वाजवत उड्या मारायला लागतो.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
02) पंगूम लंङ्मयते गिरीम
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥
मंदिराच्या माईकवरील हरिपाठ सर्वजण ऐकत असत. त्या आवाजात विलक्षण जादू होती. हरिपाठ चालू झाला की, सारेचजण ऐकण्यात गुंग होत असत. कारण ही तसेच होते. त्याच गावात विठ्ठल नावाचा एक हरिभक्त होता. तो दररोज हरिपाठाचे गायन करतो. गावातील लोकांना त्याचे विशेष कौतुक वाटत होते. कारण तो दोन्ही डोळ्याने आंधळा होता. त्याने कधी शाळेचे तोंडही पाहिला नाही. तरी संपूर्ण हरिपाठ तोंडपाठ म्हणतो. नुसतं हरिपाठच नाही, तर अभंग आणि ओव्याही तोंडपाठ होत्या. नेहमी तो विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन राहत असे. रोज पाच घरी माधुकरी मागत होता. तेच खाऊन आनंदात जगत होता. त्याला कोणत्याच गोष्टीची आस नव्हती. मनात कुठला स्वार्थ नव्हता. उद्याच्या त्याला अजिबात काळजी नव्हती. ज्याने जन्म दिला त्याला आपली काळजी आहे. आपण उगीच का काळजी करायचं ? असा तो नेहमी बोलत असे. पण फार पूर्वी तो असा बोलत नव्हता. आंधळा असल्याने तो स्वतःवर खूप दुःखी होता. मी नेहमी अंधारातच वावरतो. मला काही पाहता येत नाही. मी दुर्दैवी आहे. स्वतःवर नेहमी बोलत होता. देवाला शिव्याशाप देत होता. विठ्ठलाचे वडील गंगाधर आणि आईचे नाव सुनंदा होते. दोघेही पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीची वारी करत असे. लग्न होऊन दहा वर्षे उलटली होती. तरी त्यांच्या घरी पाळणा हलला नव्हता. पुत्रप्राप्तीसाठी पांडुरंगाला ते नेहमी साकडे घालायचे. त्यांना स्वतःची शेतजमीन नव्हती. मोलमजुरी करून ते आपले जीवन जगत होते. राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीतून सदा न कदा पांडुरंगाचेच नाव ऐकू येई. नित्यनेमाने हरिपाठ चालत असे. काही दिवसांनी पांडुरंगाची कृपा झाली. सुनंदाला दिवस गेले. गर्भवती असल्यामुळे तिची पंढरीची वारी चुकली. म्हणून गंगाधर एकटाच वारीला गेला. त्यांनी मनोमन प्रार्थना केली. पांडुरंगाने त्याची प्रार्थना ऐकली. पाऊस पडत होता. विजा चमकत होते. ढगांचा आवाज होत होता. त्यावेळी सुनंदाने एका मुलाला जन्म दिला. जन्मलेलं मूल सुदृढ होतं पण दोन्ही डोळे नव्हते. आंधळे मूल जन्माला आले. म्हणून सुनंदा धाय मोकलून रडू लागली. ' हे देवा, असं का ? माझ्याच नशिबात हे काय दिलंस, पांडुरंगा ? ' म्हणून ती रडू लागली. त्यावेळी गंगाधर तिला समजावत होता, ' आजपर्यंत मूल नाही म्हणून रडत होतीस. पांडुरंगाने आपल्या पदरात मूल दिलंय ना ! आंधळा दिलंय म्हणून रडतेस, वेडी मूल नसल्यापेक्षा असलेलं बरे नव्हे का, मग तो आंधळा का असेना. आपण दोघे त्याचे डोळे बनून त्याला वाढवू या.' पुत्रप्राप्ती बद्दल गंगाधरने परमेश्वराचे आभार मानले. पांडुरंगच आपल्या घरी आला आहे. म्हणून त्याने त्या मुलाचे नाव विठ्ठल ठेवले.
विठ्ठल नावाप्रमाणे पांडुरंगासारखाच होता. तो आंधळा असल्याने सुनंदा त्याला सोडून राहत नव्हती. विठ्ठलावर तिचे नेहमी लक्ष असायचे. मी एक वेळा वारीला गेली नाही. म्हणून देवाने माझ्यावर अशी वेळ आणली. सुनंदा नेहमी बोलत असे. भक्तिमय वातावरणात विठ्ठल चंद्रकलेप्रमाणे वाढत होता. गंगाधर रोज हरीचे नामस्मरण करायचा. विठ्ठल अभंग, ओव्या, श्लोक ऐकत मोठा होत होता. आंधळ्या मुलाला शाळेत पाठवून काय फायदा ? त्याला काही दिसतच नाही तर तो अभ्यास काय करणार ? त्यापेक्षा आपल्या सोबत राहिला तर काही काळजी राहणार नाही. म्हणून गंगाधरने विठ्ठलला शाळेत पाठविले नाही. त्याच्या शेजारी त्याच्याच वयाचा माधव नावाचा एक मुलगा होता. तो रोज शाळेत जायचा. शाळेतल्या गंमतीजमती, गप्पा, गाणी, गोष्टी विठ्ठलला सांगायचा. त्याला गाणी म्हणून दाखवायचा. गोष्टी वाचून दाखवायचा. शाळेत न जाता विठ्ठल शाळेचा अभ्यास शिकू लागला. पण त्याला एका गोष्टीची खंत वाटत होती. ती म्हणजे, तो डोळ्याने काही पाहू शकत नव्हता. माधवसारखा उड्या मारू शकत नाही. म्हणून तो नेहमी उदास राहायचा. हे पाहून त्याचा मित्रही उदास व्हायचा. विठ्ठलाला आनंदी ठेवण्यासाठी तो म्हणायचा, ' विठ्ठल, तुला डोळ्याने दिसत नाही. तरीही तू माझ्यापेक्षा खूप हुशार आहेस.' यावर विठ्ठल हसायचा आणि म्हणायचा, ' उगी काही बोलू नकोस. तुला पुस्तक वाचता येते. मला वाचता येते का ? वाचून तुझे ज्ञान वाढत राहते. माझे ज्ञान कसे वाढणार ?' यावर माधव म्हणायचा, ' बघ विठ्ठल, हे सारे बरोबर आहे. पण देवाने तुला एक दैविक शक्ती दिली आहे.' प्रश्नार्थक चेहरा करून विठ्ठल म्हणतो, ' कोणती दैविक शक्ती दिली आहे ? मला तर काही कळत नाही, तूच सांग.' यावर माधवने लहानपणापासून जे पाहिलं ते सांगतो, ' हे बघ, मला एक कविता पाठ करायला दहा वेळेस वाचावे लागते. ती कविता तुला एक-दोनदा ऐकलं की पाठ होते. आहे की नाही दैविक शक्ती.' माधवचे बोलणे ऐकून विठ्ठल विचार करू लागला. माधव जे बोलला ते खरंच आहे. मला डोळे नाहीत. मला वाचन करता येत नाही. तरी संपूर्ण हरिपाठ मला तोंडपाठ आहे. अभंग, ओव्या पाठ आहेत. पुस्तकातील कविता, गाणी आणि गोष्टी माहीत आहेत. असा तो स्वतःशी बोलू लागला. त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यादिवसापासून त्याचे जीवन पार बदलून गेले. तो स्वावलंबी बनण्याचा निर्धार केला. स्वतःची कामे स्वतः पूर्ण करू लागला. कोणावरही अवलंबून राहू नये असा त्याने निर्धार केला. प्रत्येक गोष्ट तो काळजीपूर्वक ऐकू लागला. त्यानुसार कृती देखील करू लागला. एक-दोनदा लक्ष देऊन ऐकले की, सर्व पाठ होऊ लागलं. त्याचे दोन कान हे दोन डोळे झाले होते. हळूहळू तो हरिभक्तात तल्लीन होऊ लागला. गावोगावीच्या कीर्तनात तो गायन करू लागला. अनेक संत मंडळीचा सहवास लाभत गेला. त्यामुळे त्यात तो मिसळत गेला. तबला-पेटी हे वाद्य वाजविण्यास शिकून घेतला. पंचक्रोशीत त्याचे नाव होऊ लागले. माधव ही त्याच्यासोबत राहू लागला. गंगाधर आणि सुनंदाला आता त्याची काळजी वाटत नव्हती. तर त्याचा अभिमान वाटत होता. जन्मभर पांडुरंगाची सेवा करण्याचे व्रत त्याने घेतले. वृद्धापकाळाने गंगाधर आणि सुनंदा यांचे निधन झाले. आंधळ्या विठ्ठलाच्या जीवनात अंधार निर्माण झाला. पण माधवने त्याचा धीर खचू दिला नाही. ' मूकं करोती वाचालम, पंगूम लंङ्मयते गिरीम' या ओवीची आठवण करून दिली. तो परत सकारात्मक विचाराने काम करू लागला. आनंदाने जीवन जगू लागला. गावातील लोकांनी विठ्ठलाला मंदिरात रोज हरिपाठ गायनाची विनंती केली. तो आनंदाने ते काम स्वीकारलं. बदल्यात त्याने फक्त पाच घराची माधुकरी मागून घेतली. समर्थ रामदास स्वामी यांच्या ' केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे ' या उक्तीनुसार तो आपले चांगले कर्म करत राहिला. मी आंधळा आहे असे त्याला कधीच वाटले नाही. धन्य ती मैत्री. धन्य ती विठ्ठलाची भक्ती. धन्य तो हरी पांडुरंग.
- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769
Comments
Post a Comment