पंगूम लंगयते गिरीम
जागतिक अपंग दिनानिमित्त लघुकथा पंगूम लंगयते गिरीम देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी ॥ मंदिराच्या माईकवरून रोज सायंकाळी हरिपाठ सर्वजण ऐकत असत. त्या आवाजात अशी काही जादू होती की, हरिपाठ चालू झाला की सारेचजण ते ऐकण्यात गुंग होऊन जात असत. कारण ही तसेच होते त्याच गावातील विठ्ठल नावाचा एक हरिभक्त रोज सायंकाळी न चुकता हरिपाठाचे गायन करत असतो. गावातील लोकांना त्याचे विशेष कौतुक का वाटत होते तर तो विठ्ठल दोन्ही डोळ्याने आंधळा होता. त्याने कधी शाळेचे तोंड देखील पाहिलं नाही तरी संपूर्ण हरिपाठ अगदी तोंडपाठ म्हणतो. नुसतं हरिपाठच नाही तर अनेक अभंग आणि ओव्या त्याला तोंडपाठ होत्या. त्यामुळे नेहमी तो विठ्ठलाचे गुणगान करण्यात तल्लीन राहत असे. रोज पाच घरी माधुकरी मागून मिळेल ते अन्न खाऊन तो आपला जीवन आनंदात जगत होता. त्याला कोणत्याच गोष्टीची आस नव्हती, मनात कुठला स्वार्थ नव्हता. उद्याच्या जगण्याची त्याला अजिबात काळजी नव्हती. ज्याने जन्म दिला त्याला आपली काळजी आहे, आपण उगीच का काळज...