शंकराची भक्ती
एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारण ही तसेच होते, शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची " मी एकटीच काम करू का ? संसार करायचं असेल तर काही काम बीम करावं लागेल की नुसतं ओम नम: शिवाय म्हटलं की पोट भरते का ?" तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे, रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदीर समोरील जागा झाडून स्वच्छ करायचे. त्यानंतर पाणी शिंपडायचे. मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदीराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा, तोंडाने ओम नम: शिवाय जप चालू ठेवायचा, तेल वाती टाकून दिवा लावायचा, घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा. चालुक्य घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदीर होती, खूपच आकर्षक आणि सुंदर होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरीत्या देखभाल करत होता. म्हणून तर मंदीर आणि त्याचा प...