रेल्वेचे तिकीट

रेल्वेतील पहिला प्रवास

गणू आज खूपच खुश होता. कारण ही तसंच होतं, तो उद्या सकाळी पहिल्यांदा रेल्वेने गावाला जाणार होता. आजपर्यंत तो बाबासोबत सायकलने किंवा बसने शहरात गेला होता. मात्र त्याने रेल्वेने कधी ही प्रवास केला नव्हता. त्याच खुशी मध्ये त्याला कधी झोप लागली हे त्याच्या लक्षात देखील आले नाही. गणू तसा शाळेत शिकला असता तर दहाव्या वर्गात राहिला असता मात्र त्याने चौथी पर्यंत शाळा शिकली आणि बाबांच्या मागे बैल घेऊन शेतात जाऊ लागला. गणू मदतीला मिळाल्यामुळे बाबांना ही तेवढाच हातभार होत होता. कधी कुठे जाण्याचा प्रसंग आला तर गणू वर बैलाची जबाबदारी सोडून बाबा जाऊन येत असत. पण आज बाबांना एवढं जबाबदारीचं काम पडलं की, त्यांना बाहेर जाणे होत नाही म्हणून गणू ला सामान आणण्यासाठी पाठवावे लागत होते. गणुला ती एक सुवर्ण संधी वाटत होती. सकाळी सूर्य उगवण्याची अगोदरच तो उठला. सकाळच्या सर्व क्रिया संपन्न करून लवकरच तयार झाला. न्याहरी केली आणि रेल्वे स्टेशनकडे जाण्यास निघाला. गावापासून एक दोन मैल अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. म्हणून बाबांकडून कामाचे पैसे घेतले आणि चालत स्वारी निघाली. तासभरात गणू रेल्वे स्टेशनवर पोहोचला. ते एक छोटे स्टेशन होते म्हणून फार कमी लोकं त्याठिकाणी दिसत होते. काही वेळात झुक झुक करत रेल्वे आली. तसा गणू रेल्वेत बसला. चांगली ऐसपैस जागा पाहून त्याला खूप आनंद झाला. बस मध्ये आणि रेल्वे मध्ये त्याला खूप फरक जाणवत होता. बसमध्ये गुदमरल्या सारखं होते. तेथे मोकळे बसता येईना, लघवी व संडास ची तर सोयच नाही. म्हणून गणू ला रेल्वे खूपच आवडू लागली. थोड्याच वेळात गणूचे डोळे इकडे तिकडे फिरू लागले. बस मध्ये ज्याप्रकारे कंडक्टर येऊन तिकीट देतो, तसे कोणी येतात का ? यासाठी त्याची नजर फिरू लागली. एक दोन स्टेशन गेले पण कंडक्टर काही येत नव्हता. तेवढ्यात एक व्यक्ती तिकीट तिकीट म्हणत गणूच्या जवळ आला. गणू म्हणाला " किती रुपये आहे तिकीट ? " तो टी सी होता. म्हणजे तिकीट देणारा नाही तर तिकीट चेकर होता. तो एक वेळ त्याच्या कडे टकमक नजरेने पाहत राहिला आणि म्हणाला, " मी तिकीट देत नसतो, मी तिकीट चेक करत असतो, दाखव तुझं तिकीट." यावर गणूच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक आठ्या पडल्या. तो म्हणाला, " साहेब, मला माहित नाही, रेल्वेत तिकीट काढून बसावं लागतं ते. मी पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करीत आहे. साहेब मला माफ करावं." त्याचे बोलणे ऐकून टी सी ला दया वगैरे काहीच आले नाही कारण असे मंडळी त्याला रोजच भेटत असतात. लगेच तो म्हणाला, " काही हरकत नाही, तिकीट न काढल्याबद्दल पन्नास रु. दंड भरावं लागंल." गणू ने का कु करत ते दंड भरला. बाजूचे सारेच लोकं गणू कडे आश्चर्य कारक नजरेने पाहत होते. मात्र यात गणूची काही एक चूक नव्हती. गणू एकदा बाबासोबत बस मध्ये गेला होता तेंव्हा बस मध्ये कंडक्टर येऊन त्यांचा तिकीट काढलं होतं. रेल्वेत सुद्धा अशीच सोय असेल असे त्याला वाटलं. पण झालं उलटंच. गणूचा रेल्वेचा हा पहिला प्रवास अजीवनभर लक्षात राहील असा झाला होता. सायंकाळी गावी परत येतना रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट घेऊन तो रेल्वेत बसला आणि सुखरूप घरी परत आला.

- नागोराव सा. येवतीकर

Comments

Popular posts from this blog

EK Tarikh ..... ( एक तारीख .....)

स्वातंत्र्य दिन ( Indispens Day )

जागतिक जल दिवस (World Water Day )